অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॅरामिशियम

पॅरामिशियम

प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील सिलिएटा वर्गातील हा एक आदिजीव आहे. या वर्गातील प्रण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शरीरावर पक्ष्माभिका (ज्यांच्या लयबद्ध फटकार्‍यांनी प्राणी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करतात अशा पेशींपासून निघालेल्या केसांसारख्या वाढी) असतात आणि त्यांचा उपयोग संचलनाकरिता (हालचालीकरिता) होतो. कुजणारे गवत किंवा वनस्पती असणार्‍या गोड्या पाण्याच्या डबक्यात पॅरामिशियम विपुल असतात. डबक्याकले थोडेसे पाणी परीक्षानलिकेत घेऊन ती उजेडासमोर धरली, तर त्या पाण्यात बारीक ठिपक्यांसारखे पॅरामिशियम इकडेतिकडे हिंडत असलेले दिसतात. ते अतिशय बारीक असल्यामुळे त्यांची संरचना सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावरच दिसू शकते. पॅरामिशियमाच्या आठनऊ जातींपैकी पॅरामिशियम कॉडेटम आणि पॅरामिशियम ऑरेलिया या दोन सामान्य जाती होत. येथे दिलेले वर्णन पॅरामिशियम कॉडेटम या जातीचे आहे.

आंतररचना

शरीर एकाच कोशिकेचे (पेशीचे) बनलेले असून लांबट असते. त्याची लांबी ०.३ मिमी. असते. पुढचे टोक बोथट असून मध्य भागाच्या मागे शरीर रूंद असते. पुढचे टोक बोथट असून मध्य भागाच्या मागे शरीर रूंद असते व ते मागच्या टोकाकडे निमुळते झालेले असते. शरीराचे बाह्य पृष्ठ एका लवचिक कलेनेतनुच्छदाने (पातळ त्वचेने) – झाकलेले असते आणि त्यांच्यावर सारख्या लांबीच्या सूक्ष्म पक्ष्माभिकांच्या अनुदैर्ध्य (उभ्या) ओळी असतात. मागच्या टोकावर लांब पक्ष्माभिकांचा गुच्छ असतो. तनुच्छदाच्या आत दाट व स्वच्छ बहि:प्रद्रव्याचा पातळ थर असतो आणि त्याच्या आतली सगळी जागा कणिकामय व पातळ अंत:प्रद्रव्याने भरलेली असते. बहि:प्रद्रव्यामध्ये पुष्कळ तर्कूच्या (चातीच्या) आकाराची दंशांगे असून ती पक्ष्माभिकांच्या बुडांमध्ये एकाआड एक याप्रमाणे असतात. ही लांब सूत्रांच्या (तंतूच्या) रूपात बाहेर टाकली जातात व त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता किंवा स्वसंरक्षणाकरिता होता. पुढच्या टोकापासून एक उथळ खोबण (मुख-खाच) निघते; ही तिरकस होऊन शरीराच्या मध्याच्या मागे अधर (खालच्या) पृष्ठावर जाते; या खोबणीच्या मागच्या टोकाशी मुख अथवा कोशिकामुख असते. कोशिका-मुख एका आखूड नलिकाकार कोशिका-ग्रसनीचा अंत;प्रद्रव्यात शेवट होता. अंत:प्रद्रव्यामध्ये अन्नरिक्तिका (कोशिकेतील अन्नपदार्थयुक्त पोकळी) असून त्यात पचन होत असलेले अन्न असते. शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकांकडे एकेक मोठी संकोची रिक्तिका (आकुंचन पालणारी कोशिकेतील जलमय विद्राव व स्त्राव असलेली पोकळी) असते. शरीरात एक लहान लघुकेंद्रक (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर लहान पुंज) आणि एक मोठा बृत्-केंद्रक असतात.

विशिष्ट अभिरंजन (रंजक द्रव्याचा विद्राव) वापरून पॅरामिशियमाचे सूक्ष्मदर्शकाखाली परीक्षण केले, तर तनुच्छदाच्या खाली तंतुकांच्या एका तंत्राचे (संरचनेचे) अस्तित्व दिसून येते. पक्ष्माभिकांच्या आधार कणिका (आधार देणारे तळाशी असलेले बारिक कण) या तंतुकांनी एकमेकींना जोडलेल्या असतात. उच्च श्रेणीच्या प्रण्यांच्या तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) सारखेच तंत्र असते, म्हणून याला तंतुक-तंत्र म्हणतात.

संचारण

पॅरमिशियम पक्ष्माभिकांचे फटकारे मारून पाण्यात जलद पोहत जातो. सामान्यत: पक्ष्माभिका मागच्या बाजूकडे वाकवून हे फटकारे मारलेले असतात त्यामुळे प्राणी पुढे जातो; पण फटकारे उलट्या बाजूला मारले म्हणजे प्राणी मागे पोहत जातो. तथापिपॅरामिशियम सरळ रेषेत पोहत जात नाही. त्याचा मार्ग नागमोडी असतो. त्याचप्रमाणे शरीर त्याच्या लंब अक्षाभोवती वाटोळे फिरत असते.

अन्नपचन

पाण्यातील जंतू आणि बारीक आदिजीव हे मुख्यत: पॅरामिशियमाचे भक्ष्य होय. पक्ष्माभिकांच्या हालचालींनी हे अन्न प्रथम मुख-खोबणीत जाऊन तेथून मुखातून कोशिका-ग्रसनीत जाते. हिच्यात असणार्‍या आंदोल-कलेच्या आंदोलनांनी अन्न ग्रसनीच्या टोकाशी जमा होऊन एका पाण्याच्या थेंबात (रिक्तिकेत) गोळा केले जाते, ही अन्नरिक्तिका होय. ही अन्नाने पूर्णपणे भरल्यावर ग्रसनीपासून अलग होते. अंत:प्रद्रव्याच्या अभिसरणामुळे अन्नरिक्तिकेचे शरीरात एका ठराविक मार्गाने अभिसरण होते आणि ते होत असताना अन्नरिक्तिकेत पाचक एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) स्त्रावाने अन्नाचे पचन होते. अन्नरिक्तिका लागोपाठ तयार होऊन शरीरात फिरत असतात. पचलेले अन्न भोवतालच्या जीवद्रव्यात (जिवंत कोशिकाद्रव्यात) शोषले जाते आणि न पचलेले अन्न मुख व शरीराचे मागचे टोक यांच्या मधे असणार्‍या गुदद्वारातून बाहेर पडते.

श्वसन आणि उत्सर्जन

ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची अदलाबदल तनुच्छदामधून होते. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन विसरणाने (रेणू एकमेकांत मिसळण्याच्या क्रियेने) शरीरावरील लवचिक आवरणातून आत जातो आणि शरीरात उत्पन्न झालेला कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. संकोची रिक्तिकांच्या मार्गाने कार्बन डाय-ऑक्साइड बहुतकरून काही प्रमाणात बाहेर पडत असावा.

संकोची रिक्तिका दोन असून त्या बहि:प्रद्रव्यात उत्तर (वरच्या) पृष्ठाजवळ असतात आणि त्यांच्या भोवती असणार्‍या अरीय नालांच्या (त्रिज्यीय मार्गांच्या) द्वारे त्यांचा शरीराशी संबंध असतो. प्रत्येक संकोची रिक्तिकेच्या भोवती सहा ते अकरा अरीय नाल असतात. शरीरात योग्य प्रमाणापेक्षा जास्त झालेले पाणी हे नाल गोळा करतात व संकोची रिक्तिकेत थेंबाथेंबांनी टाकतात. रिक्तिका पूर्ण भरली म्हणजे तिचे आकुंचन होऊन पाणी एका छिद्रातून बाहेर जाते. अशा प्रकारे संकोची रिक्तिकांच्या नियंत्रणाने शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखले जाते. अमोनिया, यूरिया यांच्यासारखील निरूपयोगी नायट्रोजनी द्रव्ये संकोची रिक्तिकांमधून बाहेर टाकली जातात.


स्त्रोत: मराठी विश्कोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate