অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाजरा

बाजरा

बाजरा

हा सस्तन प्राणी ⇨मांसाहारी गणातील आहे. याचे कुल मुस्टेलिडी असून याची जाती मेलिव्होरा कॅपेन्सीस आहे. हे प्राणी आफ्रिकेत, तसेच आशियात अरेबिया ते तुर्कस्तान, नेपाळ व भारत या भागांत आढळतात. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत यांची वस्ती आहे. या प्राण्यास रॅटेल किंवा हनी बॅजर असेही म्हणतात.

बाजरा

बाजऱ्याचे डोके व शरीराची मिळून लांबी ६॰ ते ७७ सेंमी., शेपटाची लांबी २॰ ते ३॰ सेंमी व खांद्यांपर्यंतची उंची २५ ते ३॰सेंमी. असते. याचे शरीर बळकट असते. डोक्यापासून शेपटीपर्यंतचा पाठीचा भाग करडा ते फिकट पिवळा किंवा पांढरा असतो. याउलट अधर (खालचा) भाग तपकिरी किंवा काळा असतो. सबंध काळ्या रंगाचे बाजरेही आफ्रिकेत आढळले आहेत. बाजऱ्याचे रंग भितिसूचक असे असतात. अधर भागावर केस तुरळक असतात. शरीरावरील कातडे सैल व चिवट असते. पाय व शेपूट लहान असतात. मुस्कट नळीसारखे लांब नसते. कान लहान असतात. पुढचे पाय मोठे असून त्यांवर बिळे करण्यास उपयुक्त अशी मजबूत नखे असतात. हे जमिनीत बिळे करून, दगडाच्या कपारीत किंवा कधीकधी जोडीने संचार करतात. हे जरी रात्रिंचर प्राणी असले, तरी कधीकधी दिवसाही बाहेर पडतात. मुख्यत्वेकरून जमिनीवरून चालत असले, तरी झाडावर चढण्यातही हे पटाईत आहेत. हे सर्वभक्षी प्राणी आहेत; पण त्यातल्या त्यात कीटक, बिळात राहणारे लहान सस्तन प्राणी, पाली सरडे, कासवे व विषारी अगर बिनविषारी साप यांवरही हे आपली उपजीविका करतात. हे मेलेल्या प्राण्याचा व वनस्पतीचाही अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना मध फार आवडतो. बाजरा कधीकधी मेंढरावरही हल्ला करतो व त्याला मारून प्रथम त्याची जीभ, नंतर श्वासनलिका, डोळे, मेंदू आणि वक्ष व उदरातील इतर भाग या क्रमाने त्याला खातो. सैल कातडे, बळकट नखे आणि बळकट दात यांचा त्यांना भक्ष्य मारण्यास फार उपयोग होतो. बाजऱ्याच्या गुदग्रंथीमधून अत्यंत दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर येतो व त्याच्या वासाने पुष्कळदा शत्रूस पळवून लावण्यास मदत होते. यांच्या विणीच्या काळात जर कोणी दुखविले, तर ते न घाबरता हल्ला करतात. घोडे, बैल, म्हशी, हरणे यांसारख्या मोठया जनावरांवरही त्यांनी हल्ला केल्याची माहिती आहे. त्यांना मारणे फार कठीण असते. त्यांचे कातडे इतके कणखर असते की, कुत्र्याने हल्ला केला तर त्याचे दात या कातड्यात शिरू शकत नाहीत. सैल कातड्यामुळे हे आपले डोके फिरवून पाठीवर असलेल्या शत्रूवर हल्ला करू शकतात. साळूचे काटे किंवा मधमाशीच्या चाव्याचा यांच्या कातड्यावर काही परिणाम होत नाही. सापाचे दातही या कणखर कातड्यात शिरू शकत नाहीत. हे उडया मारत धावतात व आपले भक्ष्य पकडतात. सर्वसाधारणपणे हे आवाज करत नाहीत; पण कोणी त्रास दिल्यास एक विशिष्ट प्रकारचा कर्कश आवाज काढतात..

आफ्रिकेतील उष्ण कटिबंधीय प्रेदशात राहणाऱ्या बाजऱ्यात आणि इंडिकेटर इंडिकेटर या पक्ष्यात एक प्रकारचे  सहभोजितेचे नाते निर्माण झालेले आढळते (या पक्ष्यास हनी डिव्हायनर असे म्हणतात). हे दोन्ही प्राणी मिळून मधमाश्यांच्या पोवळ्याचा नाश करतात. व त्यातील मध खातात. हा पक्षी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढून मधमाश्यांचे पोवळे जवळपास असल्याची वर्दी देतो. जर बाजऱ्याने त्याचा आवाज ऐकला, तर पक्ष्याच्या मागोमाग जाऊन तो पोवळे तोडतो व मध पितो आणि पोवळ्याचे काही तुकडे व त्यात असलेला मध हा या पक्ष्याच्या पदरात पडतो.

बाजऱ्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच जर त्याला पकडले, तर त्याला माणसाळविता येते. पूर्ण वाढ झालेला बाजरा जर पिंजऱ्यात ठेवला, तर तो पिंजऱ्याची व बाहेर पडून इतर वस्तूंची नासधूस करतो.

मादी एका वेळी दोन पिलांना जन्म देते. तिच्या उदरावर स्तनांच्या दोन जोडया असतात. गर्भाची वाढ सहा महिन्यांत होते. पिंजऱ्यात ठेवलेल्या बाजऱ्याचे आयुष्य २४ वर्षे असते, असे आढळले आहे.

भारतात असलेले बाजरे वाळवंट व कोरड्या प्रदेशात आढळतात. यांची बिळे नदीच्या काठी किंवा पाण्याजवळ प्रामुख्याने आढळतात. अशी एक समजूत आहे की, बाजरे प्रेते उकरून खातात. यावरून त्यांना ‘ग्रेव्ह डिगर’ (थडगे उकरणारे) हे नाव प्राप्त झाले आहे. मात्र या त्यांच्या वर्तवणुकीचा सबळ पुरावा मिळालेला नाही. काही वेळा बाजरा मेल्याचे सोंग घेऊनही पडून राहतो.

-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate