অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वानर

वानर

वानर(हनुमान माकड). वानराचे शास्त्रीय नाव सेम्नोपिथेकस एन्टेलस आहे. पश्चिम हिमालयातील वानर जास्त वजनदार म्हणजे १५ ते २५ किग्रॅ. वजनाचे असतात. उंची ३० - ४५ सेंमी. असते. शेपूट ३० - ४५ सेंमी. लांब असते. इतर प्रदेशातील वानर १२ - १४ किग्रॅ. वजनाचे असतात.

वानराची मुख्य वसती हिमालय ते कन्याकुमारी व श्रीलंका येथे असून पश्चिम वाळवंटात तो आढळत नाही. वानराच्या एकूण १४ पोटजाती आतापर्यंत आढळल्या आहेत. हिमालयात सु. ४,००० मी. उंचीवर जेथे नेहमी बर्फ पडते तेथे वानर राहतात. अतिशय थंडी पडली, तर ते कमी उंचीवर येतात. इतक्या उंचीवर उगवणाऱ्या सूचिपर्णी वृक्षांची पाने, फळे, फुले हे यांचे मुख्य खाणे आहे. डोंगराळ भागांतील खडकावर व दऱ्यांतून पाण्याची उपलब्धता असेल तेथे ते वसती करतात.

तीर्थस्थळांच्या ठिकाणी देवळे व पाण्याच्या टाक्या असतील तेथे वानरांचे कळप आढळतात. येथील वानर आता इतके धीट झाले आहेत की, न भिता ते माणसांच्या हातांतील वस्तू व खाण्याचे पदार्थ हिसकावून घेतात. भल्या पहाटे वानरांची टोळी अन्न शोधार्थ बाहेर पडते. एका कळपात तीस ते चाळीस वानर असतात. कळपात नर, माद्या व लहान पिले असतात. कळपाचा प्रमुख नर इतरांवर हुकमत गाजवतो. प्रमुख नर इतरांचे अंग साफ करीत नाही पण स्वतःचे अंग इतरांकडून साफ करून घेतो. मादी माजावर आल्यावर अनेक नरांशी तिचा संबंध येतो. गर्भधारणेनंतर १७० दिवसांनी एक किंवा दोन पिले होतात. पिलाचे वजन ०.४० किग्रॅ.पेक्षाही कमी असते. पिलाची वाढ सात वर्षांपर्यंत होते. जन्मल्यानंतर पिलू आईच्या पोटाला घट्ट बिलगून तिच्याबरोबर हिंडते. सुमारे एक महिन्यानंतर ते आईपासून थोडे दूर हिंडू लागते. अगदी कोवळ्या वयात लैंगिक प्रवृत्तीकडे कल असतो. एखादी मादी नरापेक्षा जास्त ताकदवान असेल, तर ती इतरांवर हुकमत गाजवते.

जंगलात राहणारे वानर माणसांपासून शक्यतो दूर पळतात. तसेच चित्ता, वाघ दिसताच त्यांच्यात एकच घबराट उडून ते मोठ्यामोठ्याने चित्कार करून इतर प्राण्यांना सावध करतात. वानर पाने, फुले, कोवळे अंकुर व फळे खात असल्याने शेताची व बागायती पिकांचेही अतोनात नुकसान करतात.

कळपाचा प्रमुख पुष्कळ वेळा तरुण नरावर हल्ला करतो म्हणून तरुण नर आपला स्वतंत्र ब्रह्मचारी गट करून मुख्य कळपापासून काही अंतरावर हिंडतात. तांबड्या तोंडाच्या माकडांमध्ये हे क्वचित दुपारी मिसळतात पण रात्र होताच ठराविक ठिकाणी जाऊनच विश्रांती घेतात. चित्ता व वाघ यांनी हल्ला करू नये म्हणून शक्यतो झाडावर उंच जाऊन बसतात. झोपायच्या आधी एकमेकांत जागेसाठी खूप भांडतात. पायांनी व हातांनी फांदीला लोंबकळून इकडून तिकडे अगदी सहज जातात. ते ६ मी. लांब उडी लीलया घेतात. जमिनीवरून चालताना हातांवर व पायांवर चालतात.

वानराचे तोंड, हात व पाय संपूर्ण काळे असतात. त्याची कातडीही काळी असते. सर्वांगावर मऊ राखी रंगाचे केस असतात. डोक्यावरचे पांढरे केस किंचित पुढे येतात. डोळे बहुधा तपकिरी रंगाचे असतात. वानराचे सुळे फार तीक्ष्ण असतात. माणसाला चावून ते चांगलाच जखमी करतात. हिमालयातील वानरांच्या अंगावर जास्त दाट पांढरट केस असतात. वानराच्या गालात दोन पिशव्या असतात. त्यांत ते भराभर अन्न साठवून मग सावकाश खात बसतात

तांबड्या तोंडाच्या माकडाप्रमाणे वानर माणसाळले जाऊन कसरतीची कामे शिकत नाहीत.

सुप्रसिद्ध निसर्ग अभ्यासक ई. पी. गी यांनी सोनेरी लंगूर याचा हिमालयातील संकोश व मानसरोवर येथे शोध लावला आहे. सोनेरी लंगूर भारत व भूतान यांच्या सरहद्दीवर उंच व घनदाट अशा जंगलात १० ते २० च्या टोळ्यांनी भटकतात. त्याचें तोंड तांबूस व अंगावर सफेद दाट पांढरे केस असतात.

 

पहा : नरवानर गण माकड.

दातार, म. चिं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate