অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेवंडा

शेवंडा

शेवंडा : पायांना सांधे असणारा एक अपृष्ठवंशी प्राणी. आर्थोपोडा (संधिपाद) संघाच्या कस्टेशिया (कवचधर) वर्गातील डेकॅपोडा गणात त्याचा समावेश होतो. ते जलचर असून पाण्यात दिवसा खडकातील बिळांत राहतात व रात्री भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडतात. त्यांचे काटेरी व बिनकाटेरी असे दोन प्रकार आहेत. बिनकाटेरी शेवंडाच्या नांग्या मोठया व फुगीर असतात. त्याचे कवच गुळगुळीत असते. यामध्ये होमॅरस गॅमॅरस, हो. अमेरिकॅनस या जातींचा समावेश होतो. भारतात आढळणाऱ्या शेवंडांना ‘ काटेरी शेवंडा ’ म्हणतात. त्याच्या नांग्या मोठया नसतात व त्याचे पाय काटेरी असतात. यामध्ये पॅन्युलिरस होमॅरस व पॅ. पॉलिफेगसया जातींचा समावेश होतो.

याच्या शरीराचे शिरोवक्ष व उदर असे दोन भाग असतात. शीर्ष व वक्ष यांच्या एकत्रीकरणाने शिरोवक्ष हा भाग बनतो. शीर्षात पाच व वक्षात आठ खंड असतात. उदरात सहा खंड असतात. सर्व शरीर कायटिनमय असते. कवचाची खंडवलये पडून ती लवचिक पातळ पटलांनी एकमेकांना जोडलेली असतात. त्यामुळे या प्राण्यांना हालचाली करणे शक्य होते.

शिरोवक्षाच्या शीर्ष भागावर उपांगाच्या पाच जोड्या असतात. लघुशृंगिकांची (सांधे असलेल्या लहान स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, लांब शृंगिकांची (जोड असलेल्या स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, त्याच्या मागे जंभांची (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणाऱ्या संरचनेची) एक जोडी व तिच्या मागे जंभिकांच्या (ज्यांचे विविध कार्याकरिता अनेक प्रकारे रूपांतर होते अशा उपांगाच्या) दोन जोड्या असतात. वक्षावर उपांगांच्या आठ जोड्या असतात, त्यांपैकी पहिल्या तीन जोड्या जंभपादाच्या (अन्न मुखाकडे नेणाऱ्या उपांगाच्या) असून त्याच्या मागे चालण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या पायांच्या पाच जोड्या असतात.

डोळा व लांब शृंगिकेच्या साहाय्याने ते अन्नाचा शोध घेतात. ऑक्टोपस, मोठा मासा व मोठे प्राणी जवळ आल्यास ते पुच्छपादाची जोरदार हालचाल करून संरक्षणासाठी बिळात शिरतात.

लहान मासे, लहान मृदुकाय प्राणी, सागरतळाशी राहणारे अपृष्ठवंशी प्राणी, पाणवनस्पती हे त्याचे अन्न आहे. जंभपाद व जंभिका यांच्या साहाय्याने अन्न मुखाकडे नेले जाते व तेथे जंभाच्या साहाय्याने त्याचे तुकडे होऊन ते मुखात जाते.

आहारनाल सरळ असून त्याचे तीन भाग पडतात. मुख गसिकेत उघडते व गसिका जठरात उघडते. जठराचे दोन भाग असतात. जठरपेषणीव्दारे दातांनी अन्न दळले जाते. दळलेले अन्न केसांच्या गाळणीतून पुढे जाते. यकृत दोन भागांचे असून त्याचा स्राव वाहिन्यांमधून मध्यांत्रात येऊन अन्नात मिसळतो व त्यामुळे अन्नाचे पचन होते.

प्रत्येक शृंगिकेच्या बुडाजवळ असलेल्या हरित गंथींनी नायट्रोजनयुक्त निरूपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य केले जाते.

कल्ल्यांमार्फत शेवंडे श्वसन करतात. शिरोवक्षाच्या दोन्ही बाजूंस क्लोम-कक्ष असतात. क्लोम-कक्षात एकूण २१ कल्ले असतात. क्लोम-कक्षात पाणी मागच्या बाजूने शिरते व दुसऱ्या जंभिकेच्या एकसारख्या हालचालीमुळे ते क्लोम-कक्षातून बाहेर ढकलले जाते. अशा तऱ्हेने क्लोम-कक्षात पाण्याचा प्रवाह सतत चालू राहतो. पृष्ठीय हृदयातील रक्त सात रोहिण्यांमधून सगळ्या शरीराला पुरविले जाते. शिरा नसतात. रक्त लहान कोटरांत (खळग्यांत किंवा गुटिकांत) गोळा होऊन अखेरीस एका मोठया कोटरात जाते. तेथून ते क्लोमात जाऊन ऑक्सिजनीकृत होऊन परत हृदयात जाते.

तंत्रिका तंत्र हे पुष्कळसे गांडुळा च्या तंत्रिका तंत्रासारखे असते.

लिंगे भिन्न असतात. लिंगभेद ओळखता येतो. नर व मादीच्या जनन गंथी आकाराने व दिसण्यास सारख्याच असतात. मादी पाचव्या वर्षी अंडी घालते. नर मीलनाच्या वेळी शुक्राणूच्या पिशव्या (नराच्या पक्व जनन कोशिका) मादीच्या वक्षाच्या अधर बाजूस चिकटवितो. शुक्राणूमुळे अंड्याचे निषेचन होते. सर्व अंडी त्यातून पिले बाहेर पडेपर्यंत पुच्छपादावर राहतात. अनेक निर्मोचनानंतर (कात टाकल्यावर) पिले हळूहळू मोठी होतात.

शेवंडाचा एखादा अवयव जेव्हा शत्रू पकडतो त्यावेळी तो अवयव शेवंडा स्नायूच्या जोरदार आकुंचनाने शरीरापासून वेगळा करतो व स्वतःची सुटका करून घेतो. अशा तुटलेल्या अवयवाच्या जागी कलिका तयार होते व त्यापासून पुनर्जननाने नवीन अवयव तयार होतो.

शेवंडे सामान्यतः १५ वर्षे जगतात. त्यांचे मांस रूचकर असते. भारतात शेवंड्याच्या पॅ. होमॅरस (पॅ. डॅसिपस), पॅ. बर्गेरी, पॅ. पॉलिफेगस, पॅ. ऑर्नॅटस व पॅ. व्हर्सिकलर या जाती आढळतात. नेफ्रास नॉर्वेजिकस,जासस लॅलांडी, पॅ. एलिफस (पॅ. व्हल्गॅरीस), पॅ. आरगसव पॅ. इंटरप्टस या जाती भारताखेरीज नॉर्वे, ब्रिटिश बेटे, अमेरिका व कॅनडा येथे मोठया प्रमाणावर आढळतात.

 

लेखक - चंद्रकांत प. पाटील

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate