অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवाढव्य ऍट्लास मॉथ...

अवाढव्य ऍट्लास मॉथ...

अवाढव्य ऍट्लास मॉथ...

साधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघीतले तेव्हा जाणवले की ते एक फुलपाखरू नसून ती दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंकमधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता.

बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहीत झाले आणि त्यांनी सांगीतले की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून गणला जातो. याशीवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरीत स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी छायाचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी १०० एक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थे मधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावत पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात तर मादी पुढे अंडी घालून लगेच मरते. या काळात अळी असतानी त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरार चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला.

पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजुनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच्या आसपास, बागांमधे अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात पण आपल्याला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात हे सर्व काही नविन होते. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती त्यांच्याकडी आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर "छान किती दिसते" हे १९९४ मधे पुस्तक लिहीले. बहुतेक ते मराठीत फुलपाखरांवर खास असलेले पहिलेच पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव आहे.

त्यानंतर पुढे काही वर्षांनंतर मला माझा स्वत:चा कॅमेरा घेणे शक्य झाले. त्या ऍटलास पतंगाला मी बघितले असले तरी त्याचे छायाचित्र काही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे नंतरच्या प्रत्येक पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मी या पतंगाला शोधायला लागलो. मुंबई आणि मुंबईच्या आसपासची अनेक जंगले पालथी घातली पण परत काही तो पतंग दिसला नाही. त्याच्या अन्नझाडावर त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेतल्या वाढणाऱ्या अळ्या दिसल्या पण प्रौढ पतंग काही सापडत नव्हता. अनेक मित्रांना राजमाची आणि इतर किल्ल्यांवर भेटी देतानासुद्धा हा पतंग दिसला पण बहुदा त्याची आणि माझी वेळ काही जुळत नव्हती.

२००६ मधे अरुणाचल प्रदेशात “बटरफ्लाय मीट” करता गेलो असताना तिथे आम्ही रात्री पांढऱ्या चादरीच्या वर प्रखर दिवा लावायचो आणि त्यावर आकर्षित होणाऱ्या पतंगांचे निरिक्षण, छायाचित्रण करायचो. दुसऱ्याच रात्री त्या पांढऱ्या चादरीवर एक वेगळ्या प्रकारचा ऍटलास पतंग आकर्षित झाला. अगदी समोरच तो बसला असल्यामुळे आम्हाला त्याची भरपूर छायाचित्रे घेता आली. पण खरे तर त्या छायाचित्राला मजा नव्हती कारण एका पांढऱ्या फटफटीत चादरीवर तो पतंग बसला होता. त्यामुळे परत एकदा माझे त्या ऍटलास पतंगाला शोधणे सुरू झाले.

नुकताच कल्याण जवळच्या मुरबाड तालुक्यातील पळू गावात छायाचित्रण कार्यशाळा आयोजित केली होती. त्या ग्रीन व्हॅली रिसॉर्टमधेच एवढी फुलपाखरे आणि किटक दिसले की आम्ही दिवसभर त्यांचे यथेच्छ छायाचित्रण केले. रात्री जेवणानंतर कोणी तरी टूम काढली की आपण “नाईट ट्रेल”ला जाउ या. सगळेच छायाचित्रणात नविन असल्यामुले सगळ्यांनी उत्साहाने कॅमेरे आणि इतर साहित्य बाहेर काढले आणि आम्ही रिसॉर्ट्च्या आवारातच फेरफटका मारायला बाहेर पडलो. मी त्यांना वाटेन दिसणारे कोळी, छोटे पतंग दाखवत होतो आणि त्यांचे छायाचित्रण सुरू होते.

एका ठिकाणी मला बांबूच्या फांदीवर कात टाकणारा नाकतोडा दिसला, सगळे त्यांच्या लेन्स वर करून त्याचे छायाचित्रण करायला लागले. एवढ्यात आमचे बाजूला लक्ष गेले तर एका झुडपावर हा भलामोठा, आवढव्य ऍटलास पतंग पंख पसरवून बसला होता. आता अर्थातच सगळ्यांनी त्या नाकतोड्याला सोडून या पतंगाकडे मोर्चा फिरवला. हे पतंग निशाचर असल्यामुळे रात्रीच कार्यरत असतात त्यामुळे मी त्यांना आधी लांबूनच छायाचित्रे घ्यायला सांगीतली आणि मी धावत माझ्या खोलीकडे कॅमेरा घ्यायला पळालो. कॅमेरा घेउन परत पळतच मी त्या ऍटलास पतंगाच्या ठिकाणी धाव घेतली. मी येइपर्यंत जवळपास सर्वांचे छायाचित्रण करून झाले होते.

मी आधी सावकाश त्याची लांबूनच छायाचित्रे घेतली आणि मग हळूहळू त्याच्या जवळ सरकलो. तो बहुदा नुकताच कोषातून बाहेर आलेला असावा कारण त्याचे पंख अगदी तजेलदार होते आणि कुठेही त्याला ईजा पोहोचली नव्हती. मी जवळ गेल्यावर मग सगळेच त्याच्या जवळ पोहोचले आणि छायाचित्रण करायला लागले. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग हा कॅमेरात बंदिस्त झाला. जवळपास दिड तास आम्ही त्याचे छायाचित्रण करत होतो. रात्रीचे बारा वाजले होते आणि आम्ही तृप्त मनस्थीतीत तिथून परतलो.

 

 

 

 

 

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate