অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलपाखरू

फुलपाखरू

प्रतिवर्षी पावसाळ्याच्या सुमारास आपणास फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व चित्रविचित्र नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे उडताना आढळतात. फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखांमुळे हे कीटक उडताना लहानथोरांचे लक्ष आपणांकडे सहजतेने आकर्षून घेतात. हे कीटक लेपिडॉप्टेरा गणातील आहेत. ‘लेपिडॉप्टेरा’ या शब्दाचा अर्थ‘ज्याच्या पंखावर विपुल खवले आहेत असा प्राणी’ असा आहे. याच गणात पतंगांचाही अंतर्भाव होतो [⟶ पतंग-२]. फुलपाखरांच्या पंखाला हात लावला असता आपल्या हाताला धुरळ्यासारखे लहान रंगीत कण लागतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता हे कण बारीक, चपट्या खवल्यांसारखे दिसतात. हे खवले पोकळ, बारीक पिशवीसारखे असतात व या पोकळीत अत्यंत सूक्ष्म रंगीत कण भरलेले असतात. तसेच काही रंगीत कण खवल्यांच्या आतील बाजूला चिकटलेले असतात. या खवल्यांतील रंगीत कणांमुळेच पंख रंगीत भासतो.

लेपिडॉप्टेरा हा कीटकांचा एक मोठा गण आहे. पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी या गणाचे दोन उपगणांत विभाजन केले. त्यांपैकी पहिला गण ऱ्होपॅलोसेरा व दुसरा हेटेरोसेरा. ऱ्होपॅलोसेरात फुलपाखरे व हेटेरोसेरात पतंगांचा समावेश केला आहे. या वर्गीकरणामुळे फुलपाखरांना बरेच महत्त्व प्राप्त झाले. तसे पाहिल्यास सर्व फुलपाखरांचा एकाच अधिकुलात समावेश होतो. याउलट पतंगांची विभागणी सतरा अधिकुलांत होते. नंतर या गणाची विभागणी मायक्रोलेपिडॉप्टेरा आणि मॅक्रोलेपिडॉप्टेरा अशी केली गेली. ही विभागणी बाह्य आकारावर आधारलेली होती व ती शास्त्रदृष्ट्या बरोबर नव्हती. यानंतर लेपिडॉप्टेरा वर्गीकरणाकरिता शरीररचनेतील फरक विचारात घेतले गेले. पंखाच्या रचनेवर होमोन्यूरा (ज्यूगाटी) व हेटेरोन्यूरा (फ्रेनाटी) असे दोन विभाग पाडले गेले; पण हीही पद्धत विशेष सर्वमान्य झाली नाही. यानंतर मादीच्या शरीररचनेतील जनन तंत्रावर (प्रजोत्पादन संस्थेवर) आधारित वर्गीकरण प्रचारात आले. यानुसार लेपिडॉप्टेराचे झ्युग्‍लॉप्टेरा, मोनोट्रायसीया आणि डायट्रायसीया असे तीन उपगण होतात. सर्वसाधारणपणे या तीनही उपगणांत मिळून १७ अधिकुलांत पतंगांची विभागणी होते. हेस्पेरिआयडीया या अधिकुलात ‘स्किपर्स’ या सामान्य नावाने ओळखण्यात येणाऱ्या आणि खऱ्या फुलपाखरांशी जवळचा संबंध असलेल्या कीटकांचा, तर पॅपिलिओनॉयडीया या अधिकुलात सर्व फुलपाखरांचा समावेश होतो.

फुलपाखरे दिवसा संचार करतात व रात्री विश्रांती घेतात. त्यांच्या शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये) नेहमी तोंडासमोर धरलेल्या असतात. हे कीटक फुलांवर बसले म्हणजे त्यांचे चारही पंख एकास एक जुळून त्यांच्या पाठीवर सरळ उभे राहतात. फुलपाखरे फार चपळ असतात. पतंग रात्री संचार करतात व दिवसा विश्रांती घेतात. त्यांच्या शृंगिका तोंडासमोर धरलेल्या नसतात. हे कीटक निश्चल बसले असता त्यांचे पंख एकाशी एक न जुळता तसेच पसरलेले राहतात व त्यामुळे त्यांचे शरीर झाकलेले राहते. पतंगांचे शरीर बोजड असल्याने त्यांची हालचाल फुलपाखरांसारखी चपळ नसते. लेपिडॉप्टेरा गणात जवळजवळ १,१२,००० जातींची नोंद झाली आहे. या गणातील कीटक ओळखण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : या कीटकांना पातळ पंखांच्या दोन जोड्या असतात. शरीर, पंख व पाय यांवर असंख्य खवले असतात. या कीटकांना जबडे अजिबात नसतात. त्यामुळे त्यांना घन पदार्थ चावा घेऊन खाता येत नाहीत. त्यांचे अन्न फुलांतील मध हे होय. त्यांच्या तोंडात एक शुंड (सोंडेसारखी लांब नळी) असते. ती घड्याळातील स्प्रिंगेप्रमाणे गुंडाळलेली असते. अन्नभक्षण करण्याच्या वेळी ही गुंडाळलेली शुंड उलगडली जाऊन तिच्या साहाय्याने फुलांतील मधाचे चोषण (वर ओढून घेण्याची क्रिया) केले जाते. या कीटकांच्या जीवनक्रमात अंडे, डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील असणारी पूर्व अवस्था; अळी वा सुरवंट), कोश व प्रौढ कीटक अशा चार अवस्था असतात. अंडी झाडांवरील पानांच्या खालील बाजूवर घातलेली असतात व अंड्यांतून बाहेर पडणारे डिंभ ही पाने खातात. डिंभांचे रंग व आकार निरनिराळ्या प्रकारचे असतात.

आ. १. फुलपाखराची बाह्य शरीररचना : (१) शुंड, (२) ओष्ठीय स्पर्शक, (३) संयुक्त डोळा, (४) श्रृंगिका, (५) वक्ष, (६) पुढचे पाय, (७) मधले पाय, (८) मागचे पाय, (९) उदर, (१०) मागचे पंख, (११) पुढचे पंख.

बाह्य शरीररचना

फुलपाखराचे शरीर लांबट असून त्याचे डोके, वक्ष (छाती) व उदर (पोट) असे तीन भाग पडतात. डोके लहान व गोलाकार असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर दोन मोठे, बहिर्गोल, संयुक्त डोळे [→डोळा] असतात. प्रत्येक संयुक्त डोळ्यात असंख्य पैलुदार डोळे असतात. संयुक्त डोळ्यांमधील जागेत दोन साधे डोळे (अक्षिका) व दोन शृंगिका असतात. शृंगिका लांबट असून टोकाला किंचित जाडसर असतात. डोक्याच्या खालच्या बाजूला शुंड असते.

फुलपाखरांचे वक्ष तीन खंडांचे असून मजबूत असते. पहिला व तिसरा खंड आकारमानाने लहान असतो. दुसरा खंड त्यामानाने बराच मोठा असतो. प्रत्येक वक्ष-खंडावर पायांची एक जोडी असते. सर्व पायांची लांबी व रचना बहुधा सारखी असते; परंतु निंफॅलिनी या उपकुलातील फुलपाखरांच्या पायांची पहिली जोडी लांबीला बरीच कमी असते व ह्यामुळे त्यांना चांगले चालता येत नाही. फुलपाखरांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वक्ष-खंडांवर पंखांची प्रत्येकी एक जोडी असते. पंख मोठे, रंगीबेरंगी व खवल्यांनी आच्छादिलेले असतात. प्रत्येक पंखावर आडव्या व उभ्या रेषांचे एक जाळे तयार झालेले असते. फुलपाखरांचे शरीर हलके आणि पंख मजबूत व मोठे असल्याने बराच वेळपर्यंत ती हवेत सारखी उडत राहतात. इकडून तिकडे उडत जाताना फुलपाखरू सरळ रेषेत कधीही जात नाही. एकदा वर, तर एकदा खाली ह्याप्रमाणे नेहमी नागमोडी मार्गाने ते उडत जाते. त्याच्या अशा प्रकारच्या उडण्यामुळे किटकभक्षक पक्ष्यांना व फुलपाखरे जमविण्याचा छंद असलेल्या लोकांना त्याचा पाठलाग करून पकडणे फार कठीण जाते.

फुलपाखराच्या उदराचे दहा खंड असतात. पहिला खंड बराच लहान असतो. दुसरा ते आठवा खंड सामान्य असतात. नववा आणि दहावा खंड प्रजोत्पादनाच्या कामासाठी किंचित बदललेले असतात.

अंतर्रचना : पचन तंत्र

(पचन संस्था). फुलातील मध हे फुलपाखरांचे अन्न आहे. फुलांवर बसल्यावर गुंडाळलेली शुंड सरळ करून फुलामध्ये शिरते व तिच्या साहाय्याने मध चोषून घेतला जातो. तो आहारनालात (अन्नमार्गात) येतो. आहारनालाचे अग्रांत्र (आतड्याचा पहिला भाग), मध्यांत्र (आतड्याचा मधला भाग) व पश्चांत्र (आतड्याचा शेवटचा भाग) असे तीन भाग पडतात. अग्रांत्राचा सुरूवातीचा भाग म्हणजे ग्रसनी (घसा) हा स्‍नायूंनी युक्त असून शुंडेवाटे मधाचे चोषण करण्यास मदत करतो. हा मध नंतर पिशवीसारख्या अन्नपुटामध्ये साठविला जातो. तेथून तो सावकाशपणे सरळ व आखूड मध्यांत्रात उतरतो. येथे मधाचे पचन व अभिशोषण होते. न पचलेला अन्नाचा भाग पश्चांत्रात ढकलला जातो. पश्चांत्र लांब व वेटोळ्यांनी युक्त असते. मध्यांत्र ज्या ठिकाणी पश्चांत्राला मिळते तेथून सहा मालपीगी नलिका (शरीरातील निरूपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याच्या कार्यात भाग घेणाऱ्या व मार्चेल्लो मालपीगी या इटालियन शरीररचनाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिका) निघतात. या नलिका बारीक व लांब असून त्या रक्तातील निरूपयोगी द्रव्यांचे शोषण करून ती पश्चांत्रात आणून टाकतात व न पचलेल्या अन्नासमवेत ती गुदद्वारावाटे शरीराबाहेर पडतात. अग्रांत्राच्या दोन्ही बाजूंस लांब, नळीसारखे लालापिंड असतात. त्यांतून स्रवणारी लाळ मधात मिसळून त्याचे पचन करण्यास मदत करते.

तंत्रिका तंत्र

(मज्‍जासंस्था). फुलपाखरांच्या डोक्यामध्ये अधिग्रसिका गुच्छिका (अन्ननलिकेच्या वरील बाजूचा तंत्रिका कोशिकांचा –मज्‍जापेशींचा-समूह) व अधोग्रसिका गुच्छिका (अन्ननलिकेच्या खालील बाजूचा तंत्रिका कोशिकांचा समूह) एकमेकींस जोडलेल्या असतात. दोहोंमध्ये एक रंध्र असते. त्यांतून अग्रांत्र जाते. अधोग्रसिका गुच्छिकेपासून वक्षाकडे अधर तंत्रिका रज्‍जू जाते. वक्षामध्ये दोन गुच्छिका असतात व त्यांपासून पाय, पंख, स्‍नायू व इतर अवयवांकडे तंत्रिका जातात. उदरामध्ये चार गुच्छिका असून त्यांपासून उदरातील स्‍नायूंकडे व अवयवांकडे तंत्रिका जातात.

परिवहन तंत्र

शरीराच्या पृष्ठभागाखाली पृष्ठवाहिका असते. तिचे हृदय व महारोहिणी असे दोन भाग पडतात. हृदयाचा भाग उदरात असतो, तर महारोहिणीचा भाग वक्ष व शीर्षात असतो. हृदयाचे आठ उपभाग असून प्रत्येक उपभागाच्या बाजूवर रंध्रांची एक जोडी असते. या रंध्रांवाटे शरीर पोकळीतील रक्त हृदयात येते. हृदय आकुंचन पावते व रक्त महारोहिणीमध्ये पुढे जाते. महारोहिणीला रंध्रे नसतात व तिचे तोंड पुढील बाजूस उघडे असते. त्यामधून रक्त शरीरात जाते. रक्ताचा प्रवाह नेहमी हृदयाकडून महारोहिणीकडे म्हणजेच उदराकडून डोक्याकडे वाहत असतो. रक्त पिवळसर रंगाचे असून त्यात असंख्य रूधिरकणिका (सूक्ष्म पेशी) असतात.

आ. २. प्रौढ नर फुलपाखराची शरीररचना : (१) शुंड, (२) ओष्ठीव स्पर्शक, (३) संयुक्त डोळा, (४) श्रृंगिका, (५) अक्षिका, (६) ग्रसिका, (७) गुच्छिका, (८) तंत्रिका रज्‍जू, (९) मध्यांत्र, (१०) वृषण, (११) शुक्रवाहक, (१२) श्वासनाल, (१३) स्खलनवाहिनी, (१४) झडप, (१५) शिस्‍न, (१६) गुदद्वार, (१७) मालपीगी नलिका, (१८) श्वासरंध्र, (१९) हृदय, (२०) अन्नपुट, (२१) महारोहिणी.

जनन तंत्र

फुलपाखरे भिन्नलिंगी असतात. नरामध्ये दोन्ही वृषण (पुं-जनन ग्रंथी) एकजीव झालेले असतात. त्यांचा रंग लालसर असतो. त्यांपासून दोन शुक्रवाहक (पुं-जनन कोशिका वाहून नेणाऱ्या नलिका) निघून ते एकमेकांस मिळतात. हा संयुक्त शुक्रवाहक बराच लांब असून तो उदराच्या नवव्या खंडाच्या खालील बाजूस असलेल्या प्रवेशी अंगात (मैथुनांगात) शिरतो. शुक्रवाहकांना दोन लांब नळीसारख्या ग्रंथी जोडलेल्या असतात. त्यांत उत्पन्न होणारा स्राव रेतात मिसळला जातो.

मादीमध्ये दोन अंडाशय असतात. त्यांपासून निघणाऱ्या अंडवाहिन्या एकमेकींना मिळतात. ही संयुक्त अंडवाहिनी उदराच्या आडव्या खंडावर खालील बाजूस एका रंध्रावाटे उघडते. अंडवाहिनीच्या शेवटच्या भागाजवळ मैथुन-स्यून (मादीचे मैथुनांग) असून तिच्यात पडणारे रेत शुक्रग्राहिकेत साठविले जाते. श्लेष्म (बुळबुळीत चिकट पदार्थ स्रवणाऱ्या) ग्रंथींची एक जोडी अंडवाहिनीला मिळते व त्यांतून पाझरणाऱ्या चिकट स्रावाच्या साहाय्याने मादी अंडी पानांवर घट्ट चिकटवून टाकते.

आ. ३. फुलपाखराचा जीवनक्रम : (१) पानावर घातलेली अंडी, (२) अंड्यातून बाहेर पडलेला व अंड्याचे कवच खाणारा डिंभ, (३) पानांवर उपजीविका करणारा डिंभ, (४) झाडाच्या फांदीस चिकटलेला कोशावस्था सुरू होण्याच्या वेळचा डिंभ, (५) डिंभाचे कोशात रूपांतर होण्याची प्रथमावस्था, (६, ७ व ८) कोशाच्या विकासातील निरनिराळ्या अवस्था, (९) कोशातून फुलपाखरू बाहेर पडण्याची अवस्था, (१०) कोशातून बाहेर पडलेले फुलपाखरू.

श्वसन तंत्र

फुलपाखराच्या वक्षावर आणि उदरावर दोन्ही बाजूंस अनुक्रमे दोन व आठ श्वासरंध्रांच्या जोड्या असतात. श्वासरंध्रांपासून असंख्य श्वासनलिका निघून त्यांचे एक प्रकारचे जाळे तयार होते. श्वासरंध्रावाटे हवा या नलिकांच्या जाळ्यात शिरते व अशा प्रकारे ऑक्सिजनाचा पुरवठा केला जातो. श्वसनक्रियेत निर्माण होणारा कार्बन डाय-ऑक्साइड वायू व पाण्याची वाफ श्वासरंध्रातून व काही प्रमाणात शरीराच्या पृष्ठभागावाटे बाहेर जाते.

जीवनक्रम : पावसाळ्याच्या सुमारास असंख्य फुलपाखरे फुलझाडांवर बागडताना आढळतात. या वेळी नरमादीचा संयोग होतो व मादी झाडांच्या पानांवर अंडी घालते. फुलपाखरे आपली अंडी अशा ठिकाणी घालतात की, अंड्यांमधून बाहेर पडणाऱ्या डिंभांना अन्न मिळविण्यास सहसा त्रास पडत नाही. काही जातींच्या माद्या झाडांवरील पानांच्या खालच्या बाजूंवर आपली अंडी चिकटवून टाकतात. यामुळे जोरदार वाऱ्याने अगर पावसाने ती पानांवरून उडून किंवा धुऊन जात नाहीत. सहसा जी पाने डिंभ खातात अशा पानांवरच मादी अंडी घालते. काही जातींच्या माद्या आपली अंडी झुडपांवर घालतात. ती पानांवर चिकटविलेली नसतात.

अंडे : मादी तिच्या आयुष्यात १०० ते ५०० पर्यंत अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा, पिवळट अगर विटकरी असतो. त्यांचा आकार गोल, चपटा अगर अर्धवर्तुळाकार असतो. अंड्यांच्या कवचावर एक प्रकारचे नक्षीकाम आढळते. काही फुलपाखरांची अंडी १ ते २ दिवसांत फुटतात, तर काहींची १० ते ३० दिवसांनी फुटून त्यांतून डिंभ बाहेर पडतात. ही दुसरी जीवनावस्था आहे. डिंभ अंड्यावरील कवच आपल्या जबड्यांनी फाडतो व ते खाऊन झाल्यानंतर झाडांवरील पाने खाण्यास सुरूवात करतो.

डिंभावस्था : डिंभाचे शरीर फार मऊ असते. त्याच्या शरीराचे १४ खंड असतात. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग पडतात. पहिला खंड डोके, नंतरचे तीन खंड वक्ष व उरलेले दहा खंड उदर होय. डिंभाचे तोंड पहिल्या खंडावर असून गुदद्वार शेवटच्या उदर खंडावर असते. डोके इतर शरीर खंडांप्रमाणे मृदू नसून कठीण असते. डोक्यावर एक आखूड व तीन भागांची शृंगिकांची जोडी असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येकी सहा साधे डोळे असतात. संयुक्त डोळे नसतात. डिंभाच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंवर मजबूत व तीक्ष्ण जंभ (जबडे) असतात. यांच्या साहाय्याने डिंभ पानांचे बारीक तुकडे करून खातो.

वक्षाचे तीन खंड असतात. प्रत्येक खंडावर खालच्या बाजूस पायांची एक जोडी असते. हे डिंभाचे ‘खरे’ पाय होत. प्रत्येक पायाच्या शेपटास एक नखर (नखी) असतो. उदर १० खंडांचे असते; परंतु वरवर पाहिल्यास आपणास फक्त नऊच उदर खंड मोजता येतात. शेवटचा खंड संयुक्त असतो व तो नवव्या व दहाव्या खंडांच्या एकीकरणाने झालेला असतो. उदरावर पूर्वपादांच्या (चालण्याच्या कामी मदत करणाऱ्या मांसल वाढींच्या) पाच जोड्या असतात. हे पूर्वपाद उदराच्या ३, ४, ५, ६ व १० या क्रमांकाच्या खंडांवर असतात. या पादांचा शेवटचा भाग हत्तीच्या पायांप्रमाणे रुंद व वाटोळा असतो व त्याच्या कडेला काचेच्या हंड्या अडकविण्याचे आकडे ज्या आकाराचे असतात, त्या आकाराच्या आकड्यांची झालर लावलेली असते. हे पाद फक्त डिंभावस्थेतच असतात व लांबट डिंभाला या पादांवर शरीर तोलून धरता येते. फुलपाखरांना फक्त वक्षांवरच पाय असतात.

आ. ४. फुलपाखराचा डिंभ : (१) शृंगिका, (२) डोके, (३) अक्षिका, (४) वक्ष, (५) श्वासरंध्र, (६) गुदाजवळील पूर्वपाद, (७) उदरावरचे पूर्वपाद, (८) वक्षावरचे पाय, (९) जंभ.

डिंभ चालू लागला म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणे पुढचे पाय उचलीत नाही. प्रथम शेवटच्या उदर खंडावरील पूर्वपाद उचलून ते सहाव्या उदरखंडावरील पादांजवळ आणून ठेवतो व ते जागेवर घट्ट बसले म्हणजे सहाव्या खंडावरील पाद उचलून पाचव्या खंडावरील पायांजवळ, पाचव्याचे चवथ्याजवळ, चवथ्याचे तिसऱ्याजवळ याप्रमाणे पुढे नेतो आणि अगदी अखेरीला पहिल्या वक्ष-खंडावरील पाय उचलून पुढे नेतो. अशा तऱ्हेने चालताना डिंभाचे शरीरखंड लाटेप्रमाणे पुढे सरकतात.

काही डिंभांच्या शरीरावर अतिशय बारीक, आखूड व विरळ केस असतात, तर काहींच्या अंगावर केस अजिबात नसतात. डिंभांचे रंग चित्रविचित्र गडद व आकर्षक असतात; परंतु काहींचे रंग अगदी फिके असतात.

आ. ५. फुलपाखराच्या डिंभाच्या शरीराची रचना : (१) तनित्र (रेशमी धागा तयार करणारा अवयव), (२) जंभ, (३) अक्षिका, (४) प्रमस्तिष्क (मेंदूच्या मुख्य भागातील) गुच्छिका, (५) श्वासरंध्र, (६) हृदय, (७) गुदद्वार, (८) लाला ग्रंथी, (९) वक्षावरील पाय, (१०) कक्षांग (पाय जेथे शरीराला जोडलेला असतो तो सांधा), (११) पूर्वपाद.

डिंभाचे अन्न मुख्यतः झाडांची पाने हे आहे; परंतु काही डिंभ फळे व पानांचे देठ खातात, तर काही पाने व खोड पोखरतात. पूर्वी सांगितल्याप्रमाणे डिंभाचे जंभ मजबूत व तीक्ष्ण असतात व त्यांच्या साहाय्याने तो पानांचे अगर फळांचे बारीक तुकडे करतो. डिंभ एकूण चार वेळा कात टाकतो. प्रत्येक वेळी कात टाकल्यावर डिंभाच्या शरीराची वाढ होते व केव्हा केव्हा त्वचेचा रंगही बदलतो. डिंभावस्था ३ ते ८ आठवड्यांची असते. यानंतर डिंभाचे कोशात रूपांतर होते. [⟶ सुरवंट].

कोश : डिंभाचे कोशात रूपांतर होण्यापूर्वी पूर्ण वाढ झालेला डिंभ अन्न खाणे थांबवून कोशावस्थेत पडून राहण्यासाठी सोयीस्कर जागा शोधतो. अशी जागा सापडल्यानंतर डिंभ आपल्या अन्ननलिकेतील सर्व अन्न बाहेर काढून टाकून ती रिकामी करतो. कोश बनण्याच्या सुमारास डिंभ एका जागी सुस्तपणे पडून राहतो. त्याच्या कातडीचा रंग गडद होतो. शरीर आखडले जाऊन फुगीर बनते. जुन्या त्वचेखाली नवीन त्वचा निर्माण होते व जुनी त्वचा नव्या त्वचेपासून सुटी होते. काही वेळाने डिंभाचे कोशात रूपांतर होते. कोश बहुधा पानांना चिकटविलेले असतात. स्वॅलोटेल किंवा व्हाइट्‌स या फुलपाखरांचे कोश उदरखंडाच्या शेवटच्या भागाने पानांना चिकटविलेले असतात. तसेच त्यांच्या कमरेचा भाग कमरपट्ट्यासारख्या एका रेशमासारख्या धाग्याने पानाला चिकटविलेला असतो. अशा कोशांचे डोके वरील बाजूकडे असते. हे कोश लोंबते असले, तरी धाग्याच्या बंधनामुळे वाऱ्याने हालत नाहीत. इरिसिनीड्‌स, टॉरटाइझ शेल व फ्रिटीलॅरी या फुलपाखरांचे कोश लोंबते असतात व ते फक्त शेवटच्या उदरखंडाच्या साहाय्याने पानांस चिकटविलेले असतात. ब्ल्यू व कॉपर या फुलपाखरांचे कोश सर्व अंगाने पानांवर चिकटून राहतात. त्यांच्या सर्व अंगावर रेशमी धाग्यांचे एक जाळेच तयार झालेले असते. त्यामुळे त्यांना योग्य ते संरक्षण मिळते. स्किपर कीटकांचे कोश एका रेशमासारख्या धाग्याने बनविलेल्या घरट्यात संरक्षित राहतात व हे घरटे पानांमध्ये दडलेले असते.

काही कोश एका पातळ कवचाने झाकलेले असतात व हे कवच पारदर्शक असल्याने कोशांची दर दिवशी होणारी वाढ आपण सहज पाहू शकतो. कोशाच्या वरील बाजूने पाहिले असता डोके, वक्ष व उदर हे तीन भाग स्पष्ट दिसतात. बाजूने पाहिले असता पंख व पाय हे अवयव दिसतात व खालच्या बाजूने पाहिले असता तोंडाजवळील शुंड, शृंगिका वगैरे अवयव दिसतात. कोशावस्थेत याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही व हा अन्न खात नाही. ही अवस्था सु. ३ ते ४ आठवडे टिकते. या मुदतीनंतर कोशावरील पातळ आवरण तडकते व पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडून फुलांतील मध खाण्यासाठी उडू लागते.

अशा तऱ्हेने फुलपाखरांच्या जीवनक्रमात अंडे, डिंभ, कोश व पूर्ण (प्रौढ) कीटक या चार अवस्था असतात. प्रत्येक अवस्थेची कालमर्यादा वातावरणातील तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश यांवर अवलंबून असते. हिवाळ्यात प्रत्येक अवस्था दीर्घकालीन असते, तर उन्हाळ्यात ती अल्पकालीन असते. काही फुलपाखरांच्या एका वर्षात २ ते ३ पिढ्या निर्माण होतात, तर काहींची फक्त एकच पिढी तयार होते.

स्थलांतर

कित्येक जातींची फुलपाखरे टोळांप्रमाणे एका भागातून दुसऱ्या भागात, केव्हा केव्हा एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतात. अशी स्थलांतरे बहुधा ठराविक ऋतूत दक्षिणेकडून उत्तरेकडे केली जातात. फुलपाखरे आपल्या आयुष्यात एक ते दोन वेळा स्थलांतरे करतात. जगातील बहुतेक सर्व देशांत फुलपाखरांनी केलेल्या स्थलांतराविषयी माहिती गोळा झालेली आहे. स्थलांतर करण्यापूर्वी हजारो फुलपाखरे एकत्र जमून हवेत एकदम उड्डाण करतात. हजारो फुलपाखरांचे थवे अशा वेळी आकाशात पावसाच्या ढगाप्रमाणे दिसतात व केव्हा केव्हा सूर्य झाकू शकतात. ही फुलपाखरे हवेत तासनतास उडत राहतात व डोंगर, नद्या, समुद्र इ. अडथळे सहज पार करू शकतात. एरवी उडताना फुलपाखरे फार उंचीवरून उडत नाहीत त्यामुळे त्यांचे पंख गवताला अगर पानांना घासले जाऊन मोडतात; परंतु स्थलांतराच्या वेळी फुलपाखरे बऱ्याच उंचावरून उडत असल्याने त्याच्या पंखांना काहीही इजा न होता ती सुखरूप प्रवास करू शकतात. भारतात पिरीडी या कुलातील कॅटोप्सिलापिरीस या वंशांची फुलपाखरे व निंफॅलिडी या कुलातील डनायसव्हॅनेसा या वंशांची फुलपाखरे नियमितपणे हिमालयातील थंड प्रदेशाकडे स्थलांतर करतात, असे आढळून आले आहे. या फुलपाखरांचे थवे थंड प्रदेशात शिरल्यावर तेथील थंडीने शेकडो फुलपाखरे मरण पावतात. काही जिवंत राहिल्यास उलट दक्षिणेकडे फिरून आपल्या मूळच्या भागात येतात; परंतु या परतीच्या प्रवासाच्या वेळी ती थव्याने एकदम न येता एकएकटी येतात (उदा., ॲपिआसकॅटोप्सिला या वंशांतील फुलपाखरे).

फुलपाखरे स्थलांतर का करतात याचा शास्त्रज्ञांना अद्याप निश्चितपणे उलगडा झालेला नाही. काहींच्या मते वातावरणातील फरकांमुळे व फुलपाखरांची संख्या अगणित झाल्याने त्यांना स्थलांतर करण्याची इच्छा होते, तर काहींच्या मते डिंभांच्या बेसुमार खादाडपणामुळे झाडांवरील सर्व पाने नष्ट झालेली असतात व माद्यांना अंडी घालण्यासाठी भरपूर पाने मिळत नाहीत. यामुळे फुलपाखरे काही दिवसांपुरते स्थलांतर करतात. परत मूळ भागात येईपर्यंत झाडांना नवीन पालवी आलेली असल्यामुळे नंतर पानांवर अंडी घालणे शक्य होते. स्थलांतराचे निश्चित कारण अद्याप उमगू शकलेले नाही. [ ⟶ प्राण्यांचे स्थलांतर].

सुप्तावस्था

फुलपाखरांना हवेतील ठराविक तापमान मानवते. जेव्हा तापमान फार खाली जाऊन हवा थंड होते अशा वेळी फुलपाखरे अगर त्यांची कोणतीही जीवनावस्था दीर्घकाल टिकते. अशा स्थितीला ⇨ शीतनिष्क्रियता असे म्हणतात. थंडीच्या मोसमात अंडे, डिंभ, कोश अगर फुलपाखरू यांपैकी जी अवस्था असेल ती अवस्था दीर्घकाल टिकते. यावेळी अन्न भक्षण केले जात नाही. श्वसन फार मंद चालते, हालचाल अजिबात नसते व शरीरातील सर्व क्रिया फार मंद चालतात. सॅटिरिडी या कुलातील फुलपाखरांचे डिंभ थंडीत झाडांवरून खाली उतरतात व झाडांच्या बुंध्याजवळ सुप्तावस्थेत पडून राहतात. कित्येक डिंभ आपल्या लाळेच्या साहाय्याने पानांमध्येच एक छोटेसे घरटे तयार करून त्यात राहतात. कित्येक डिंभ पानांवरच सुप्तावस्थेत पडून राहतात. अशा वेळी ते उघड्यावर असल्याने शत्रूपासून त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डिंभ लाळेच्या साहाय्याने पानांची एक सुरनळी करून त्यात लपून राहतात. कित्येकदा ही पाने झाडांवरून गळून पडल्यास त्यांच्याबरोबर डिंभही जमिनीवर पडून त्यांचा नाश होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी डिंभ आपल्या लाळेने पानांचे देठ खोडावर चिकटवून टाकतात. अशा प्रकारे ज्या गुंडाळलेल्या पानांत डिंभ पडू राहतात व जी झाडांवरच चिकटलेली असतात अशा पानांना इंग्रजी भाषेत ‘हायबर्नक्युलम’ असे म्हणतात.

कित्येक वेळा अंडी अगर कोशही सुप्तावस्थेत जातात. यावेळी त्यांची प्रतिकारशक्ती फार वाढलेली असते. ती जरी पाण्यात बुडाली अगर त्यांच्यावर विषारी द्रव्ये शिंपडले तरी मरत नाहीत. व्हॅनोसिडी या कुलातील फुलपाखरे आपली सुप्तावस्था बहुधा झाडांवर न काढता गुदाम, पडकी व ओसाड घरे अशा ठिकाणी लपून राहतात.

उन्हाळ्यात जेव्हा हवेतील उष्णतामान वाढते त्या वेळी बहुधा फुलपाखरे अगर त्यांच्या इतर जीवनावस्था एक प्रकारच्या सुप्तावस्थेत जातात. या स्थितीला ⇨ ग्रीष्मनिष्क्रियता असे म्हणतात. ती स्थिती थंडीतील सुप्तावस्थेसारखीच असते.

शत्रूंपासून संरक्षण : फुलपाखरे व त्यांच्या इतर जीवनावस्था निसर्गतः च कमकुवत असतात. पक्षी, सरडे, मासांहारी कीटक व कोळी हे त्यांचे प्रमुख शत्रू होत. शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी डिंभांना अगर फुलपाखरांना तीक्ष्ण जबडे, विषारी नांगी इ. संरक्षक अवयव नसतात. पक्षी व सरडे यांची दृष्टी तीक्ष्ण असते व यामुळे त्यांना अंडी, डिंभ, कोश अगर फुलपाखरे सहज सापडू शकतात. यामुळे शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी या जीवनावस्थांचा रंग व आकार आसपासच्या परिस्थितीशी एकरूप होईल असा असतो. याला

मायावरण म्हणतात. मांसाहारी कीटक व कोळी या शत्रूंची दृष्टी त्यामानाने फार तीक्ष्ण नसते. अशा शत्रूंपासून संरक्षण मिळण्यासाठी मायावरण उपयोगी पडत नाही. अशा वेळी शरीरावरील विषारी केस, अंगाला येणारा दुर्गंध, शरीराचा बेचवपणा यांमुळे त्यांचे संरक्षण होते. [⟶ अनुकृती].

निरनिराळ्या जीवनावस्थांत कोणकोणत्या प्रकारांनी संरक्षण मिळते त्याचे सविस्तर विवरण खाली दिले आहे.

अंडे अवस्था : फुलपाखरे शेकडो अंडी घालतात. झुरळांसारखे कीटक अनेकदा ही अंडी खातात, तर हायमेनॉप्टेरा गणातील कित्येक परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारे) कीटक या अंड्यांवर आपली अंडी घालतात. या अंड्यातून बाहेर पडणारी अळी फुलपाखरांच्या अंड्यातील साठविलेले अन्न खाऊन वाढते व कोशावस्थेत जाते. नंतर कोश फुटून अंड्यातून फुलपाखराच्या ऐवजी हाच परजीवी कीटक बाहेर पडतो.

फुलपाखरांची अंडी चपटी, लहान वा पानांच्या खालच्या बाजूस चिकटविलेली असतात. काही फुलपाखरांच्या अंड्यांचे मुंग्या रक्षण करतात, तर काही फुलपाखरांच्या माद्या आपल्या अंड्यांवर एका कठीण पदार्थाचे आवरण घालतात.

डिंभावस्था : पूर्वी म्हटल्याप्रमाणे पक्षी, सरडे, मांसाहारी कीटक व कोळी हे डिंभांचे प्रमुख शत्रू होत. तसेच हायमेनॉप्टेरा गणातील इक्‌न्युमोनीडी, कॉल्‌सिडी इ. कुलांतील गांधील माश्यांच्या जातीचे कीटक आपली अंडी डिंभांच्या शरीरामध्ये घालतात. या अंड्यांमधून बाहेर पडणाऱ्या अळ्या डिंभाच्या शरीरावरील अवयवांचे भक्षण करतात. अळीचा कोश तयार होतो व पूर्ण कीटक बाहेर पडण्याच्या सुमारास डिंभ मरणोन्मुख झालेला असतो. अशा शत्रूंपासून आपले संरक्षण डिंभ निरनिराळ्या प्रकारांनी करतो. स्वॅलोटेल या फुलपाखरांच्या डिंभाच्या डोक्यावर एक शिंगासारखा अवयव असतो. त्याच्या टोकाकडील भाग चिमट्यासारखा असतो. त्यातून एक प्रकारचा स्राव पाझरत असतो. शत्रू जवळ आल्याबरोबर हा शिंगासारखा अवयव एकदम शत्रूच्या दिशेने पुढे येतो. यामुळे शत्रू दचकतो व दूर पळतो.

लायकिनिडी व पिरीडी या कुलांतील कित्येक फुलपाखरांच्या डिंभांच्या शरीरातून मधासारखा गोड पदार्थ झिरपत असतो व तो खाण्यासाठी अनेक मुंग्या त्यांच्या आसपास राहतात व त्यांचे संरक्षण करतात. या डिंभाचे कोशात रूपांतर होण्यापूर्वी मुंग्या त्यांना आपल्या वारुळात नेतात व कोश तेथेच ठेवतात. कोशातून फुलपाखरू बाहेर पडताना सुद्धा मुंग्या त्याचे रक्षण करतात. निफॅलिडी कुलातील कॅरेंक्झिस डनाइडी या वंशांच्या फुलपाखरांच्या डिंभांच्या अंगावर विषारी केस असतात. यामुळे त्यांचे शत्रूपासून रक्षण होते.

पक्षी व सरडे बहुधा जे डिंभ खातात त्यांच्या शरीरावरील रंग व रंगीत पट्ट्यांमुळे ते भोवतालच्या पानांसारखे व खोडासारखे दिसतात आणि त्यांच्याशी एकरूप होतात. तसेच हे डिंभ रात्री अन्न भक्षण करीत असल्यामुळे त्याचे शत्रू दिवसा ज्या वेळी अन्न शोधीत असतात तेव्हा हे डिंभ पानांआड दडून राहतात (उदा., पँटोपोरिया, लिमेनिटीस, यूथेलिया इ. फुलपाखरांचे डिंभ). काही स्वॅलोटेल फुलपाखरांचे डिंभ पक्ष्यांच्या विष्ठेसारखे दिसतात त्यामुळे ते शत्रूला ओळखता येत नाही.

काही डिंभ बेचव असतात. त्यांच्या शरीराला दुर्गंधी येते व त्यांच्या अंगावर विषारी केस असतात. असे डिंभ शत्रूला आपले अस्तित्व उघड करतात. त्यांच्या शरीराचा रंग संरक्षित नसून भडक असतो. ते शत्रूपासून लपण्याचा प्रयत्‍न करीत नाहीत. आपले अन्न हे डिंभ दिवसा खातात. केवळ ते बेचव असल्याने शत्रू त्यांच्यावर हल्ला करीत नाही.

पॅपिलिओनिडी व निंफॅलिडी या कुलांतील फुलपाखरांच्या डिंभाच्या पहिल्या वक्ष-खंडावर खालच्या बाजूस बेचकीत एक पिशवीसारखी ग्रंथी असते. डिंभाला डिवचले असता ही पिशवी फुग्याप्रमाणे बाहेर येते व तिच्यातून एक प्रकारचा दुर्गंधयुक्त पदार्थ बाहेर पडतो. या दुर्गंधामुळे शत्रू डिंभाच्या वाटेस जात नाही.

कोशावस्था : काही कोशांवर एका कठीण पदार्थाचे आवरण असते व यामुळे परजीवी कीटक कोशामध्ये अंडी घालू शकत नाहीत. तसेच कोशांचा रंग व आकार भोवतालच्या परिस्थितीशी एकरूप झाल्याने शत्रूला ते ओळखता येत नाहीत

पूर्णावस्था : कीटकभक्षक पक्षी, सरडे व मांसाहारी कीटक इ. प्राणी फुलपाखरांचा नाश करतात. अशा शत्रूंपासून फुलपाखरे आपले संरक्षण पुढील प्रकारांनी करतात : (१) शत्रूपासून दूर उडणे, (२) शरीरावरील व पंखावरील संरक्षक रंगव्यवस्था व नक्षीकाम, (३) शत्रू नसलेल्या भागात संचार, (४) शरीराला येणारा दुर्गंध व बेचवपणा आणि (५) दुसऱ्या सुरक्षित फुलपाखराची नक्कल.

वरील पाच संरक्षण प्रकारांचे सविस्तर वर्णन खाली दिले आहे.

(१) निंफॅलिडी या कुलातील स्वॅलोटेल, पॅपिलिओ, सायरेस्टिस व नेप्टिस या फुलपाखरांची उडण्याची पद्धत मोठी विचित्र असते. ही फुलपाखरे पक्ष्याप्रमाणे एका सरळ रेषेत न उडता कधी वरून तर कधी खालून, कधी जोराने तर कधी सावकाश अशी उडतात. या प्रकारच्या उडण्यामुळे शत्रूला त्यांचा पाठलाग करणे कठीण जाते.

(२) काही फुलपाखरांचे रंग आसपासच्या प्रदेशात सहज मिसळून जातात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. अशा प्रकारच्या रंगांना ‘संरक्षित रंग’ असे म्हणतात. व्हॅनेसा या फुलपाखराचा रंग भोवतालच्या झाडाझुडपांसारखा असतो. हेबोमोईया या फुलपाखराचा रंग ते आढळणाऱ्या नदीकिनाऱ्यावरील रेतीसारखा असतो. कॅलिमा, मेलॅनायटीस, प्रेसिस या फुलपाखरांचा रंग व आकार वाळलेल्या पानांसारखा असतो. अमाथुसिड या फुलपाखरांच्या पंखांवर घुबडाच्या डोळ्याप्रमाणे दिसणारे व साधारण त्याच आकाराचे दोन ठिपके असतात. या फुलपाखराचा हा भाग अगदी घुबडाच्या डोक्यासारखा दिसतो म्हणूनच पक्षी त्याच्या वाटेला जात नाहीत व या नाजूक फुलपाखराचे रक्षण होते. अॅब्रोटा, सिंब्रेटिया, पँटोपोरिया इ. फुलपाखरांच्या पंखांवर रंगीबेरंगी विविध आकारांचे पट्टे व आकृत्या असतात. त्यामुळे झाडाझुडपांतून त्यांना ओळखता येत नाही.

(३) स्किपर, अमाथुसिड इ. फुलपाखरे पहाटे अगर संध्याकाळी अन्नभक्षण करण्यासाठी उडत असतात कारण अशा वेळी कीटकभक्षक पक्षी विसावा घेत असतात. हे पक्षी जेव्हा दिवसा भक्ष्य शोधीत असतात तेव्हा ही फुलपाखरे पानांच्या खालच्या बाजूवर दडून बसतात.

(४) कित्येक फुलपाखरांच्या शरीराला दुर्गंध येतो व ती खाण्याला बेचव असतात. यामुळे त्यांचे शत्रूपासून रक्षण होते.

(५) कित्येक फुलपाखरे बेचव असतात. अशा फुलपाखरांना पक्षी, सरडे इ. शत्रूंपासून भय नसते. शत्रूकडून धोका असलेली इतर फुलपाखरे या बेचव फुलपाखरांचा रंग, आकार, पंखावरील नक्षीकाम इ. बाबतींत तंतोतंत नक्कल करून स्वतः चे रक्षण करतात. ही नक्कल इतकी हुबेहुब असते की, ही फुलपाखरे बेचव आहेत, असे समजून शत्रू त्यांच्या वाटेला जात नाही. या नकलीला ⇨ अनुकृती असे म्हणतात. भारतात अनेक फुलपाखरे बेचव फुलपाखरांची नक्कल करतात. त्यांपैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत.

बेचव फुलपाखरे

त्यांची नक्कल करणारी फुलपाखरे

ट्रॉस हेक्टर

ट्रॉस अॅरिस्टोलॉकी

पॅपिलिओ पोलिटीस रोम्यूलस (मादी)

पॅपिलिओ पोलिटीस स्टिचिअस (मादी)

डनायस क्रिसीपस

डनायस क्रिसीपस

डनायस प्लेक्सिपस

यूप्लोइया मलसिव्हेर

अर्‌जिनीस हायपर्‌व्हियस (मादी)

हायपोलिमनास मिसीपस (मादी)

सिथोसिआ निटनेरी

इआलिमनीस मलेंबास

मानवाच्या दृष्टीने फुलपाखरांच्या जीवनक्रमात डिंभावस्था ही उपद्रवी असून पूर्णावस्था ही उपयोगी आहे. फुलपाखरे ज्या झाडांवर आपली अंडी घालतात त्या झाडांची पाने हे डिंभ अधाशीपणे खातात. डिंभ आपल्या वजनाच्या कितीतरी पट अधिक वजनाचे अन्न खातात. पाने खाण्याची क्रिया एकसारखी चालू असते व त्याचबरोबर न पचलेले अन्न विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकले जाते. डिंभाची विष्ठा बारीक काळ्या गोळ्यासारखी असून अशा असंख्य गोळ्या डिंभ असलेल्या झाडांभोवती आढळतात. त्यांमुळे डिंभाच्या संरक्षित रंगामुळे तो जरी झाडावर चटकन ओळखता आला नाही, तरी या विष्ठेच्या गोळ्यांमुळे त्याचे अस्तित्व सहज ओळखता येते.

लेपिडॉप्टेरा या गणातील बहुतेक सर्व कीटकांच्या डिंभावस्था फार उपद्रवी असून त्या तृणधान्ये, फुलझाडे, फळझाडे, गवत, साठविलेले धान्य, कपडे इत्यादींचा अमाप नाश करतात; परंतु असे उपद्रवी डिंभ बहुतकरून पतंग या कीटकांचेच असतात. फारच थोड्या फुलपाखरांचे डिंभ उपद्रवी असतात. याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

(१) निंफॅलिडी कुलातील : (अ) मेलॅनायटीस इस्‌मिनी - भाताच्या रोपांची पाने, (आ) अरगोलीस मेरीओनी-एरंडाची पाने, (इ) यूथेलिया गरूडा-आंब्याची पाने; (२) पॅपिलिओनिडी कुलातील : पॅपिलिओ डिमोलियस- लिंबू, संत्रे, मोसंबे यांची पाने; (३) लायकिनिडी कुलातील : कॅटोक्रिसॉपस नेजस- तुरीच्या शेंगा व पाने. डिंभांनी पाने कुरतडून खाल्ल्याने झाडांची वाढ खुंटते व केव्हा केव्हा ती मरतात.

डिंभांचा नाश गॅमेक्झिन, एंड्रीन, लिंडेन, डीडीटी इ .कीटकनाशक द्रव्ये पानांवर फवारून करता येतो. ही पाने जेव्हा डिंभ खातात तेव्हा हे विषारी पदार्थ त्यांच्या पोटात जातात किंवा पानावरून चालताना शरीराला लागतात व त्यामुळे डिंभ मरतात.

फुलपाखरे ही अवस्था उपयोगी आहे कारण हे कीटक फुलांना इजा न करता फक्त त्यांतील मध खातात. या वेळी त्यांच्या पायाला फुलांतील परागकण चिकटतात. फुलपाखरे जेव्हा दुसऱ्या फुलावर मध खाण्यासाठी बसतात त्या वेळी हे परागकण त्या फुलातील किंजल्कावर (स्त्री-केसराच्या टोकावर) पडून फलधारणा होते. [⟶ परागण].

फुलपाखरांच्या आकर्षक व रंगीबेरंगी पंखांमुळे, तसेच हे रंग फुलपाखरू मरण पावल्यावरही तसेच राहत असल्याने हे कीटक जमविण्याचा बऱ्याच जणांना छंद असतो. फुलपाखरांच्या पंखांवरील विविध रंगीबेरंगी नक्षीकाम कापडधंद्यातील लोकांना कापडावर निरनिराळ्या रंगांची व आकृतींची छपाई करण्यासाठी नमुन्यादाखल उपयोगी पडते. पापुआ न्यू गिनीतील पाचशेहून अधिक खेड्यांत फुलपाखरांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यात येत आहे. याकरिता फुलझाडांची मंडलाकार लागवड करून मधल्या भागात डिंभांना खाण्यासाठी उपयुक्त असलेल्या पानांच्या झुडपांची लागवड करण्यात येते. असंख्य वन्य फुलपाखरे येथे येत असल्यामुळे त्यांची सतत पैदास होत राहते. येथील लाखो फुलपाखरे पकडून ती कीटकवैज्ञानिक, संग्रहालये, खाजगी संग्राहक इत्यादींना विकण्यात येतात. सामान्यतः पंख प्लॅस्टिकमध्ये बसवून शोभिवंत वस्तू बनविण्याकरिता वापरण्यात येतात. फुलपाखरांच्या पैदाशीची ही पद्धती नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या फुलपाखरांच्या जातींचे संरक्षण करण्यासाठीही वापरणे शक्य आहे. (चित्रपत्रे).

फुलपाखरे (विदेशी)

 

फुलपाखरू (भारतीय)


 

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate