অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलपाखरे करतात बचावासाठी नक्‍कल

फुलपाखरे करतात बचावासाठी नक्‍कल

जगामध्ये भक्ष्यकापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्‍त्या वापरल्या जातात. आसपासच्या परिस्थितीत मिसळून जातील असे रंग फुलपाखरांच्या अळ्या घेत असतात. काही कीटकांना वाळलेल्या काडीसारखे, तर काही अळ्यांना पक्ष्यांच्या विष्ठेसारखा रंग मिळालेला दिसतो. याच पद्धतीने फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना काही फुलपाखरे ही अन्य काही घटकांची नक्कल करत असल्याचे आढळले आहे. भक्ष्यापासून बचावाबरोबरच प्रजननासाठी विजातीयांना आकर्षित करण्याच्या मूलभूत प्रेरणेतून हे बदल घडून येतात. हे बदल अळ्यांपेक्षा प्रौढ फुलपाखरांमध्ये अधिक वेगाने होत असल्याचे आढळले आहे. निसर्गामध्ये भक्ष्यकाच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी त्यांच्या दृष्टीने अखाद्य गोष्टीसारखा आभास निर्माण केला जातो. वेगळ्याच भडक रंगसंगतींचा वापर पंखांवरती असल्याने भक्ष्यक घाबरून दूर राहतो. काही फुलपाखरे वनस्पतीतील विषारी रासायनिक घटकांचा वापर करून तीव्र गंध निर्माण करतात.

फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने यावर संशोधन केले आहे. त्यांनी या रंगसंगतींच्या संशोधनासाठी न्युओट्रॉपिकल फुलपाखरांच्या दोन प्रजातींवर लक्ष केंद्रित केले होते. त्यातील दनाईनी ही कॅरेबियन बेटावर तर दुसरी प्रजाती इथोमायनी पूर्व इक्वेडोरमध्ये आढळते. या दोन्ही प्रजातींच्या पंखांवरती भडक रंगाच्या विविध प्रकारच्या नक्षी आढळतात. हा भक्ष्यकांसाठी इशारा असतो.

इक्वेडोरमध्ये आढळणाऱ्या 41 पैकी 22 प्रजातींची इथोमायनी फुलपाखरेसुद्धा इशारा देण्यासाठी रंगाचा वापर करतात. त्यांच्या रंगसंगतींमध्ये आतापर्यंत आढळून न आलेले पॅटर्न दिसून आले. याबाबत बोलताना संशोधक सौराकाव्ह म्हणाले, की प्रौढ कीटकांच्या गडद, तेजस्वी रंगाचा उपयोग मादी किंवा नराना आकर्षित करण्यासाठी होतो. मात्र त्यामुळे काही वेळा ते भक्ष्यकांचे भक्ष्य बनतात. त्यामुळे काही कालावधीनंतर रंगाच्या या पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे आढळले आहे. ही प्रक्रिया अळ्यांपेक्षा प्रौढ फुलपाखरांमध्ये जास्त वेगाने होते.

या प्रक्रियेकडे आतापर्यंत संशोधकांचे फार कमी लक्ष गेले आहे. प्रयोगशाळेमध्ये अळी ते प्रौढ या अवस्थेतून स्थित्यंतर होत असताना अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडत असतात. याला अनेक आठवड्यांचा कालावधी लागत असतो. त्यातही अंड्यांपासून फुलपाखरांपर्यंत विकसन होताना या रंगसंगतींचा अंदाज लावणे कठीण बाब असते. मात्र फ्लोरिडा विद्यापीठात झालेल्या या संशोधनामुळे कीटकांच्या विविध अवस्थांमध्ये होणारे बदल, त्या बदलामागील प्रक्रियांची ओळख होण्यास मदत मिळणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष "एन्टमॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका' च्या वार्षिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.


स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate