অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंकी पझल

मंकी पझल

हे एक विचित्र नाव असलेले पण अतिशय छान दिसणारे छोटेसे फुलपाखरू आहे. कुसूमच्या झाडाच्या लालभडक कोवळ्या पानांवर हे आपल्याला मार्च / एप्रीलच्या महिन्यात बसलेले आढळते. हे फुलपाखरू सहसा जमिनीच्या आसपास उडते. पण असे असले तरीही त्याची उडण्याचे पद्धत अतिशय जलद असते आणि त्याच्या पिवळ्या, काळ्या रंगामुळे ते उडताना कळतसुद्धा नाही. बऱ्याच वेळेला सकाळच्या कोवळ्या उन्हात ते पानांवर पंख उघडून बसलेले आढळते. याचा आकार इतर "ब्लू" फुलपाखरांप्रमाणेच अतिशय लहान असतो. पंखांची वरची बाजू गडद तपकीरी असते आणि वरच्या बाजूला पांढरट / पिवळट २-३ ठिपके असतात. खालच्या पंखाच्या वरच्या बाजूला पिवळसर ठिपक्यांची किनार असते आणि ३ शेपट्या असतात. पंखाच्या खालच्या बाजूला मात्र असमान नक्षी असते.

मुख्य रंग तपकीरी पिवळा असला तरी काळ्या पांढऱ्या रेषांची नक्षी त्यावर असते. फुलपाखरांची "ब्लू" ही जात जगात संख्येने जवळपास सर्वात मोठी म्हणून मानली जाते. आज भारतातसुद्धा यांच्या ४५०हून अधीक उपजाती सापडतात. ही फुलपाखरे आकाराने छोटी असतात. सर्वसाधारणपणे यांच्या पंखांचा वरचा रंग नीळा किंवा जांभळा असतो म्हणून यांना "ब्लू" असे म्हणतात. यांच्यात नरांचे आणि माद्यांचे रंग वेगवेगळे असतात आणि नरांचे रंग अधीक गडद आणि झळाळणारे असतात. त्याचप्रमाणे हवामान आणि ऋतूंप्रमाणे यांचे रंग बदलतात किंवा कमी अधीक गडद होतात.

बऱ्याच उपजातींचे नर हे कोवळ्या उन्हात आपले पंख उघडून बसलेले दिसतात. ही फुलपाखरे फुलांवर आकर्षीत होतात पण त्याच वेळेला काही उपजाती मेलेल्या प्राण्यांवर, त्यांच्या विष्ठेवर, झाडाच्या डिंकावर पण आकर्षीत होतात. ही फुलपाखरे नाजूक, चिमुकली असली तरी त्यांना पण शत्रू असतात, आणि त्यांच्यापासून बचाव करायला त्यांच्याकडे काही खास युक्त्या आहेत. पहिली युक्ती म्हणजे त्यांच्या पंखांच्या टोकाला असणाया शेपट्या. या शेपट्या, त्या बाजूला असणारी ठिपक्यांची डोळ्यासारखी दिसणारी नक्षी यामुळे तो भाग एकदम डोक्यासारखा भासतो.

ही फुलपाखरेसुद्धा बसताना या शेपट्या एकसारख्या हलवत रहातात यामुळे तो पंखाचा शेवटचा भाग त्याच्या डोक्यासारखा दिसतो आणि शेपट्या ह्या स्पृशांसारख्या वाटतात. यामुळे भक्षक खऱ्या डोक्याकडे हल्ला न करता ह्या खोट्या डोक्याकडे करतो आणि त्याच्या तोंडी फक्त पंखाचा काही भाग लागतो, आणि फुलपाखराचा जीव वाचतो. दुसरी युक्ती म्हणजे काही उपजातींच्या अळ्या ह्या मुंग्याबरोबर रहातात. या अळ्यांच्या शरीरावर एक गोड द्राव देणारी ग्रंथी असते. हा द्राव मुंग्यांना आकर्षीत करतो, म्हणून या मुंग्या ह्या अळ्यांना संपुर्ण संरक्षण देतात आणि त्याबदल्यात त्यांना या अळ्यांकडून हा गोड द्राव मिळतो. या प्रकारच्या सहजीवनामुळे दोनही कीटकांचा आपापसात फायदा होतो.

अतिशय दिमाखदार आणि देखण्या अश्या या फुलपाखराला जंगलात शोधता शोधता मात्र नाकी नऊ येतात. आकार एकदम लहान, जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत उडण्याची सवय आणि निसर्गात लपणारे रंग यामुळे ते पटकन सापडत नाही. जरी सापडले तरी ते छायाचित्र काढायच्या आत इतक्या वेगाने तिकडून उडून जाते की आपण त्याल फक्त "कुठे गेले कुठे गेले" म्हणून शोधत रहातो. मला आतापर्यंत यांची अनेक छायाचित्रे मिळाली पण त्याचे पंख उघडलेल्या स्थितीत काही छायाचित्र मिळत नव्हते. जरा त्यांच्या जवळ गेलो की ते लगेच एकतर पंख बंद तरी करायचे किंवा अर्धे पंख मिटून घ्यायचे. मात्र जेंव्हा दिवाळीच्या दिवसात आंबोलीला गेलो असताना तिकडच्या जंगलात जरा आत गेल्यावर, थंडी जबरदस्त असल्यामुळे वन खात्याच्या नर्सरीमधे ही फुलपाखरे मोठया प्रमाणावर पंख उघडून दिसली.

दोन वर्षापुर्वी तर नागलाच्या जंगलात फिरताना मला हे फुलपाखरू दिसले, त्याची उडण्याची पद्धत जरा वेगळी वाटत होती आणि ते त्याच्या अन्नझाडाच्या आसपास घोटाळत उडत होते. बहुतेक ती मादी असून ती अंडे घालायला योग्य ती जागा शोधतेय असा अंदाज मी बांधला आणि खरोखरच तीने आपले पोट वक्राकार करून एक / दोन अंडी त्या झाडाच्या लालचुटूक पानावर घातली. हे सगळे इतके काही क्षणार्धात झाले के काही कळायच्या आत ते फुलपाखरू तिकडून उडून गेले होते, अर्थात मी आणि माझा कॅमेरा तयार असल्यामुळे मला एकतरी छायाचित्र जरूर मिळाले.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate