অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंकोल

अंकोल

(हिं. अंकोरा, अकोली; गु. ओंकला; इं. सेजलीव्ह‌्‌डअ‍ॅलँजियम; लॅ.अ‍ॅलँजियम साल्व्हिफोलयम; कुल-अ‍ॅलॅंजिएसी). हा एक पानझडी, काटेरी, ६-१२ मी. उंच व ०.६-०.९ मी. घेराचा लहान वृक्ष असून भारतात (उपहिमालय ते सह्याद्री व मद्रासपर्यंत) तो साधारण रुक्ष ठिकाणी आढळतो; शिवाय श्रीलंका, दक्षिण चीन, मलाया फिलिपीन्स येथेही आढळतो. साल कोवळेपणी पिवळट पण जून झाल्यावर करडी दिसते. हा दुरून फालसा व धामण यांच्यासारखा दिसतो. पाने साधी, पातळ, एकाआड एक व काहीशी केसाळ; पानांच्या बगलेत झुबक्यावर द्विलिंगी, हिरवट पांढरी, सुगंधी फुले एप्रिल-जूनमध्ये येतात. फळ मांसल, अश्मगर्भी (कोय असलेले), लंबवर्तुळाकार, लालजांभळट, लवदार व लिंबोणीएवढे (चित्रपत्र ५५) आणि बी एकच असून ते आंबट, स्तंभक (आकुंचन करणारे) व खाद्य मगजाने वेढलेले असते. लाकूड कठीण, सुगंधी व सुंदर असून त्याला उत्तम झिलई होते; ते कातीव व कोरीव कामासाठी फार उपयुक्त असून मुसळे, लाटणी, वाद्ये इत्यादींकरिता वापरतात. खोडाच्या सालीतील ‘अ‍ॅलँजीन’ हे अल्कलॉइड रक्तदाबावर गुणकारी असते. मुळाची साल रेचक व कृमिनाशक असून तापावर व कातडीच्या रोगांवर उपयुक्त असते; मात्र ती विषारीही आहे. या वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे  अंबेलेलीझ  गणात वर्णिल्याप्रमाणे आहेत.

लेखक :  शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate