অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनंतमूळ

अनंतमूळ

अनंतमूळ

(उपरसाळ, अनंतवेल; हि. हिंदी सालस; क. मगरबू; इं. इंडियन (कंट्री) सार्सापरिला, लॅ. हेमिडेस्मस इंडिक्स, कुल—ॲस्क्लेपीएडेसी). ⇨रुई व मांदार यांच्या कुलातील ही वनस्पती झुडुपासारखी किंवा जमिनीसरपट वाढणारी असून भारतात उत्तर प्रदेश कोकण, दख्खन, पश्चिम घाट इ. प्रदेशांत बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळते. शिवाय श्रीलंकेत, पाकिस्तान व उष्ण कटिबंधात इतरत्रही रानटी अवस्थेत आढळते. ही वेलीसारखीही चढते. खोड बारिक असून पेरी जाड असतात. पानांची मांडणी समोरासमोर असून काही पाने साधी निमुळती व अरुंद तर काही रुंद असतात. पुष्कळ वेळा पानांवर लहान-मोठे पांढरे ठिपके असतात. पाने वरील बाजूस गडद हिरवी व खालील बाजूस पांढरट असून त्यावर लव असते. देठ लहान असून पानांच्या बगलेत फुलांचे कुंठित फुलोरे [→ पुष्पबंध] असतात. फुले लहान असून (सु. ०·५ ते ०·६ सेंमी. व्यासाची) बाहेरून हिरवी व आतून जांभळी असतात. पेटिकाफळे [→ फळ] सु. १० ते १५ सेंमी.लांब व सु. ०·६ सेंमी. रुंद गोल, गुळगुळीत, शेंड्याकडे टोकदार, सरळ किंवा किंचित वाकडी असतात; बिया काळसर असतात. इतर सामान्य लक्षणेॲस्क्लेपीएडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.

खऱ्या सार्सापरिलाखेरीज त्याच गुणधर्माचे दुसरे उत्तम औषध म्हणजे या भारतीय वनस्पतीची मुळे. ही गोड, शोथशामक (दाह कमी करणारी), रक्तशुद्धिकारक, मूत्रल, पौष्टिक व स्वेदक (घाम आणणारी) असतात. त्यांचा उपयोग अग्निमांद्य, ताप, कातडीचे रोग, पांढरा विटाळ, मुरलेला कफ इत्यादींसाठी करतात. या मुळांपासून केलेली खळ सूज आलेले भाग, गळवे किंवा संधिवात यांसाठी वापरतात.


लेखक: हर्डीकर, कमला श्री.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate