অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंबुटी

आंबुटी

(अंबुती; हीं. चंगेरी, चंपामेथी, अमरूल; गु. आंबोलो; क. हुळितिन्निचेगिड; सं. अम्लिका, शुक्लिका; इं. इंडियन सॉरेल, क्रीपिंग सॉरेल; लॅ. ऑक्सॅलिस कॉर्निक्युलेटा; कुल-ऑक्सॅलिडेसी). ही लहान, तीव्र वासाची व चवीची भुईसरपट वाढणारी  ओषधी बागांमध्ये एक तण म्हणून वाढते. तिचा प्रसार भारताच्या उष्ण भागात सर्वत्र असून हिमालयात २,७०० मी. उंचीपर्यंत व श्रीलंकेतही आहे. पाने संयुक्त, हस्ताकृती, त्रिदली व बारीक पण लांब देठाची; दले फार लहान देठाची, व्यस्त हृदयाकृती, फुले कक्षास्थ, अर्धवट चवरीसारख्या फुलोऱ्यात ऑक्टोबर-मेमध्ये येतात. पाकळ्या पाच, सुट्या, पिवळ्या व लांबट; बोंड लांबट, पंचकोनी व टोकदार असून त्यात अनेक गोलसर, भुऱ्या व अध्यावरणयुक्त बिया असतात [ बीज] अध्यावरण बियांच्या कठीण सालीपासून अलग होताना बी बाहेर फेकले जाते.

कच्ची पाने भाजीसारखी खातात. ती ज्वरनाशक, थंडावा देणारी, भूक वाढविणारी व क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या स्कर्व्ही या रोगावर उपयुक्त असतात. या वनस्पतीत पोटॅशियम अम्‍ल ऑक्सॅलेट असते.

ऑक्सॅलिस बोवी ही जाती लहान, सुंदर शल्ककंदयुक्त (खवलेदार कंद असलेली) ओषधी असून तिची मुळे गाठाळ व पाने वरच्यापेक्षा थोडी मोठी असतात. फुले गर्द गुलाबी असून थंडीत स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात [पुष्पबंध] येतात. बागेत कुंड्यांत किंवा खडकाळ जागी शोभेकरिता नेहमी लावतात. सावली थंड व दमट हवा हिला मानवते. नवीन लागवड कंदापासून करतात. ऑ. अॅसिटोसेला (इं. वुड-सॉरेल) ही जाती ब्रिटनमध्ये सामान्यपणे आढळते;  हिच्यावर उघडी व बंद फुले आढळतात. ऑक्सॅलिस वंशातल्या कित्येक जातींत केसरदले व किंजदले [ फुल] यांच्या लांबीत एका जातीतील भिन्न वनस्पतींत फरक असून त्यांचा परपरागणास उपयोग होतो.

लेखक :  ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate