অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एक्विसीटेलीझ

एक्विसीटेलीझ

(इं. हॉर्सटेल्स). जुन्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे टेरिडोफायटा विभागात [वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] ह्या वनस्पतींचा गट अंतर्भूत असे. त्याऐवजी हल्ली कॅलॅमोफायटा या नावाच्या विभागातील एक्विसीटीनी या एकमेव वर्गात समाविष्ट असलेल्या चार गणांपैकी तो एक गण मानला जातो. एक्विसीटेलीझ गणातील काही वनस्पती प्राचीन व जीवाश्मरूप (अवशेषरूप) असून त्यांचा अंतर्भाव कॅलॅमाइटेसी कुलात व इतर काही जीवाश्मरूप व विद्यमान जातींचा समावेश एक्विसीटेसी कुलात केला जातो. उत्तर डेव्होनियन ते उत्तर कार्‌बॉनिफेरस कल्प (सु. ३२ कोटी वर्षांपूर्वीपासून ते २५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) ह्या कालखंडात या गणातील अनेक वंश व जाती उदयास आल्या, परंतु पुढे पर्मियन कल्पात (सु. २४–२० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या कालखंडात) त्यांपैकी बहुतेक सर्व नामशेष झाल्या असून आजमितीस फक्त एकाच वंशाच्या [एक्विसीटम] जाती शिल्लक आहेत.

ह्या गणातील वनस्पतींची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : विद्यमान जाती ओषधीय [ओषधि] परंतु जीवाश्म जाती अनेक वृक्ष व थोड्या ओषधीय; बीजुकधारीचे (प्रजोत्पादक भाग म्हणजे बीजुक असलेल्या जातीचे) खोड शाखायुक्त व शाखा बहुतांशी मंडलित; खोड व फांद्या यांच्या कांड्यांवर उभ्या खोलगट खोबणी (सीता) व उत्तरोत्तर कांड्यावरच्या सीता बहुधा एकांतरित (एकाआड एक); पेर्‍यांवर तळाशी जुळलेल्या लहान खवल्यासारख्या पानांचे अंशत: कांड्याभोवती वेष्टन करणारे मंडल; वाहक चिती (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारा दंडगोलाकार पेशीसमूह) अंतर्वर्धी (आतून बाहेर वाढत जाणारी), नलिकारंभी, पेर्‍यांमध्ये अखंड परंतु कांड्यांमध्ये उभी विवरे; काही वंशांत द्वितीयक वाढ असते; शंकूसारख्या प्रजोत्पादक प्ररोहामध्ये (कोंबामध्ये) बीजुककोशदंडांची मंडलित मांडणी व प्रत्येक बीजुककोश धारण करणारा प्रत्येक दंड (बीजुकपर्ण नव्हे) टोकास बिंबाप्रमाणे (छत्राकृती); काही वंशांत शंकूमध्ये छदमंडले (फुले वा फुलोरा ज्यांच्या बगलेत येतो अशा पानांची वलये); काही जाती समबीजुक (एकाच प्रकारची बीजुके असलेल्या) व इतर असमबीजुक.

लेखक : प्र. भ. वैद्य

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate