অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कक्कटशिंगी

कक्कटशिंगी

(काकडशिंगी; हिं. गुर्गू, काक्रर; गु. काक्रा शिंग; सं. कर्कटशृंगी; इं. चायना टर्पेंटाइन ट्री; लॅ. पिस्टाशिया इंटेजेरिमा; कुल-अ‍ॅनाकार्डिएसी). आंब्याच्या कुलातील हा विभक्तलिंगी (द्विलिंगी) पानझडी वृक्ष वायव्य हिमाचल (४७० — २,४८० मी. उंचीपर्यंत), सुलेमान पर्वत, काश्मीर ते सिमला, कुमाऊँ इ. भागांत आढळतो. पंजाबात लागवडीत आहे. पाने संयुक्त व पिसासारखी; दले ७ — ११, दल ६ — १३ सेंमी. लांब व तळ असमान, ती कोवळेपणी लाल असतात. पुष्पबंध-परिमंजरी; फुले लाल, एकलिंगी; पाकळ्या नसतात; संदले चार ते पाच; परागकोश लाल [ फूल]; अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ लहान, सुरकुतलेले व एकबीजी. पाने, देठ व फांद्या ह्यांवर किटकांच्या कारवाईमुळे लहान (१५ — २० सेंमी. लांब)शिंगासारखी पोकळ,कठीण व दोन्ही टोकांस निमुळती अशी गाठ (गुल्म) बनते व हीच बाजारात ‘काकडशिंगी’ म्हणून मिळते. ती कडू, उष्ण व तुरट असते. तिच्यात ७५ % टॅनिक अम्‍ल असते. कातडी रंगविणे व कमाविणे यांसाठी काकडशिंगी व साल वापरतात. अतिसार, राजयक्ष्मा, दमा, खोकला, अग्‍निमांद्य, ज्वर इत्यादींवर काकडशिंगी देतात. ती पित्तवर्धक, कफोत्सारक, स्तंभक (आकुंचन करणारी) व उद्दीपक असते. लाकूड तपकिरी; त्यात पिवळ्या व काळसर रेषा असून ते कठीण व टिकाऊ असते; त्यास घासून व रंधून उत्तम झिलई येते. सजावटी सामान, चरखे, छप्पर इत्यादींस फार चांगले. पाला गुरांना चारा म्हणून घालतात.

लेखक : प्र. भ. वैद्य

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate