অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कमळ

कमळ

(हिं. कमल, कनवाल, अंबुज; गु. सुरिया कमळ; क. तवरिगड्डे; सं. पद्म, पंकज, सरसिज, अंबुज, कमल; इं. इंडियन लोटस, सेक्रेड लोटस; लॅ. निलंबो न्युसीफेरा; निलंबियम स्पेसिओजम; कुल-निंफिएसी). ही सुंदर, बळकट, जलवनस्पती मूळची चीन,जपान व भारत ह्या देशांतील असावी; हिचा प्रसार भारतात सर्वत्र व इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत आहे. प्राचीन संस्कृत वाङ्‌मयात व वेदांत हिच्याबद्दल उल्लेख आहेत, तसेच महाकवी कालिदास व इतर भारतीय कवींनी वारंवार उल्लेख केला आहे ती हीच असावी.

ही सामान्यतः गोड्या व उथळ पाण्यात वाढते. या वनस्पतीत दुधी चीक असतो. खोड (मूलक्षोड, जमिनीखालील खोड) लांब व पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने साधी, छत्राकृती, ६०-९० सेंमी. व्यासाची, वर्तुळाकृती, लांब देठाची; त्यांच्या कडा वर वळलेल्या, शिरा पात्याच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या व देठावर तुरळकपणे काटे असतात.

फुले सुगंधी, एकाकी (एक एकटी), मोठी,१०-१५ सेंमी. व्यासाची, आकर्षक व लांब देठाची, पांढरी किंवा गुलाबी असून जुलै-ऑक्टोबरमध्ये येतात. संदले चार-पाच, पाकळ्या अनेक, पुष्पस्थली मोठी,भोवर्‍यसारखी, ५-१० सेंमी., टोकास सपाट व त्यामध्ये स्वतंत्र पोकळ्यांतून किंजदले असतात [Ž फूल]. पक्व किंजदले (कृत्स्‍नफळ) लंबगोल, गुळगुळीत व एकबीजी; बीजावरण सच्छिद्र.

नवीन लागवड गड्डे व बियांपासून करतात. गड्डे (मूलक्षोड) भाजून खातात, वाळविलेले काप आमटीत घालतात, तळून खातात किंवा लोणचे करतात. त्यामध्ये रिबोफ्लाविन, निअ‍ॅसीन व क आणि इ जीवनसत्त्वे असतात.

कोवळी पाने व बियाही खातात. जून व वाळविलेली पाने पत्रावळीसारखी वापरतात. कमळांचा मध गुणकारी असतो. फुले थंड, स्तंभक (आकुंचन करणारी) असून पटकी व अतिसार यांवर देतात; ज्वर व यकृताच्या तक्रारीवर उपयुक्त; हृदयास शक्तिवर्धक असतात. बी ओकारी थांबविण्याकरिता, मुलांना लघवी होण्यास व ज्वरावर देतात; ती चर्मरोगांवर व कुष्ठावर थंडावा येण्यासाठी देतात. मुळांची भुकटी मूळव्याध, आमांश, अग्‍निमांद्य इत्यादींवर गुणकारी असून नायटा आणि इतर चर्मरोगांवर लेप लावतात. श्री गणपति-पूजेत  कमलपुष्पाला महत्त्व आहे

कमळ (निलंबियम स्पेसिओजम) : (१) पान, (२)फुलाचा उभा छेद, (३) किंजमंडल, (४) केसरदल, (५) बीज. लाल कमळ (निंफिया प्यूबिसेन्स) :(६) पान, (७) फुलाचा उभा छेद, (८) किंजमंडल, (९)पाकळ्या व केसरदले, (१०) बीजाचा उभा छेद.

लाल कमळ

(रक्तकमळ; हिं. कनवाल; गु. निलोफल; क. बिलितवरई, न्यादलेहबू; सं. अलिप्रिय, शेषपद्म, रक्तोपल; इं. इंडियन रेड वॉटर-लिली; लॅ.निंफिया प्यूबिसेन्स; कुल-निंफिएसी). या ð ओषधीय जलवनस्पतीचे मूलक्षोड आखूड, उभे, गोलसर, व ग्रंथिल असून ती भारतातील उष्ण भागात, उथळपाण्यात, सर्वत्र व आफ्रिका, हंगेरी, जावा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळते.

पाने साधी, वर्तुळाकार, कोवळेपणी शराकृती (बाणासारखी), छत्राकृती, १५-२५सेंमी. व्यासाची, तळाशी हृदयाकृती, तरंगित (लाटेसारखी) दंतुर, लांब व गुळगुळीत देठाची. त्यांची खालची बाजू लोमश (लवदार) असते. फुले सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतात व ती एकाकी, ७.५-१० सेंमी. व्यासाची, गर्द लाल ते पांढरी असून फक्त सकाळी उमलतात. फुलात ४ संदले, १२ पाकळ्या व सु. ४०केसरदले आणि किंजल्काच्या किरणांवर उपांगे असतात.

[Ž फूल]. मृदूफळ सच्छिद्र, मांसल, हिरवे व गोलसर असते. टंचाईच्या काळात या वनस्पतीचे सर्व भागखातात. मूलक्षोड (गड्डे) कच्चे किंवा उकडून खातात. फुले व अपक्व फळांची भाजी करतात, बिया कच्च्या किंवा भाजून त्यांच्या पिठाची भाकरी किंवा कांजी करून खातात. अतिसेवनाने विषबाधा होते. फुलांचा काढा हृदयास शक्तिवर्धक; मूलक्षोड आमांश, अतिसार, अग्‍निमांद्य, मूळव्याध इत्यादींवर उपयुक्त. फुलांचे घिल्लड, गुलकंद इ. पदार्थ करतात.

धार्मिक महत्त्व वर दिल्याप्रमाणे

उपल्या कमळ

(पोयानी, कृष्णकमळ; हिं. व गु. नीलकमल, नीलपद्म, सं. नीलोत्पल; इं. ब्ल्यू लोटस ऑफ इंडिया, इंडियन ब्ल्यू वॉटर-लिली; लॅ. निंफिया स्टेल्लॅटा; कुल-निंफिएसी). कमळाची ही जात बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी असून तिचे मूलस्थान आग्‍नेय आशिया होय.

मूलक्षोड लंबगोल; पाने १२-२० सेंमी., वर्तुळाकृती, साधी पण तळाशी अरुंद खंडित भाग असतो; कडा तरंगित किंवा अखंड, दोन्ही बाजूस गुळगुळीत व खालच्या बाजूस किरमिजी ठिपके; फुले मोठी, फिकट निळी, जांभळी, पांढरी व गुलाबी, क्वचित मंद वासाची व दिवसभर उमललेली; किंजल्क किरणांना उपांगे नसतात. बियांवर उभ्या रेषा असतात. सर्व भाग खाद्य असून बिया दीपक (भूक वाढविणाऱ्या) आणि मूलक्षोडाचे चूर्ण वरच्याप्रमाणेच औषधी असते.

 

लेखक: ज. वि.जमदाडे

कमळ

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate