অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलांचो

कलांचो

कलांचो

(हिं. हैझा, तातरा; लॅ. कलांचो स्पॅथ्युलॅटा, कलांचो इंटेग्रा; कुल क्रॅसुलेसी), फुलझाडांच्या कलांचो नावाच्या वंशातील पुष्कळ जाती विशेषेकरुन आफ्रिका व मादागास्कर येथे आढळतात.

भारतात ११ जाती असून त्यांतील क. स्पॅथ्युलॅटा ही उष्ण व उपोष्ण हिमालयात, काश्मीर ते कुमाऊँमध्ये ३१०-१,२४०मी. उंचीपर्यंत, सिमल्याजवळ १,८६० मी. उंचीपर्यंत, शिवाय दख्खनमध्ये आणि चीन, ब्रह्मदेश, जावा इ. प्रदेशांतही आढलते. ती मांसल, सरळ, ०.३-१.२ मी. उंच व बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणारी)⇨औषधी असून खोड चौधरी व पाने साधी, चमच्यासारखी, लांबट, विशालकोनी, तळाशी शंकूसारखी, स्थूलदंतूर (कमीअधिक समान गोल दातेरी कडा असलेली) व गुळगुळीत, शेंड्याकडची बिनदेठाची व अरुंद आणि क्वचित त्रिदली असतात. फुले पिवळी ते लाल, आकर्षक, पुष्कळ व दाट परिमंजरीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरात येतात. पुष्पमुकुट नलिकाकृति, १.२५ सेंमी. लांब; संवर्त त्यापेक्षा बराच लहान [→ फूल]; पेटिकाफळ गुळगुळीत आणि पापुद्र्यासारखे; बिया विपुल, लांबट व रेषायुक्त असतात.

कलांचो स्पॅथ्युलॅटा : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२)फूल, (३)पुष्पमुकुट (उघडलेला) व केसरदले, (४) फळ.

पाने पटकीवर देतात व त्यांची राख जखमांवर व गळवांवर लावतात; रस मासिक पाळीच्या तापावर देतात, तो रेचक व पौष्टीक असतो.

गुरे पाने खात नाहीत; शेळ्या व बोकड यांनी पाने खाल्ल्यास विषबाधा होते. कलांचोच्या अनेक जाती बागेत, विशेषतः खडकाळ जागी, शोभेकरिता लावतात. बिया व कलमांनी लागवड होते. कलांचो सिलिंड्रिका या जातीत पानांच्या किनारीवर लहान कंदिका (लहान किंवा द्वितीयक कंद) येतात व त्या खाली पडून नवीन झाडे येतात.

 

 

लेखक: ज. वि.जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate