অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कळक

कळक

कळक

(वेळू; हिं. बास, कोटा; गु. बांस; क. बिदरू; सं. वंश, कीचक; इं. थॉर्नी बांबू; लॅ. बांबुसा   अ‍ॅरुंडिनॅशिया; कुल-ग्रॅमिनी). ही परिचित प्रचंड गवताची जाती हिमालयाखेरीज भारतात सर्वत्र, ब्रह्मदेशात व श्रीलंकेत, शिवाय अधिक पावसाठी जंगलात, नद्या व ओढे यांच्या काठाने निसर्गत:च  आढळते; याची लागवडही केली जाते. भूमिस्थित (जमिनीतील) मूलक्षोडापासून वर  हवेत सरळ वाढणारे संधिक्षोड [→खोड] काटेरी, २४-३० मी. उंच व १५-१८ सेंमी. व्यासाचे, पिवळट  रंगाचे असून अनेकांचे एकत्र बेट बनलेले असते.  तळाजवळच्या पेऱ्यांपासून मुळे व वरच्या पेऱ्यांपासून  आडव्या काटेरी फांद्या येतात. कांडे पोकळ, ४५ सेंमी.  लांब असून पाने लांबट, भाल्यासारखी व खरबरीत कडांची असतात. आवरक (खोडास वेढणारा देठाचा भाग) चिवट, रेषांकित, विविध आकाराचे व गोलसर टोकाचे असतात.

सु. ३०-४० वर्षांतून एकदा प्रचंड परिमंजिरी (फुलोरा) व त्यावर कणिशकांचे झुबके येतात [→पुष्पबंध]. कणिशके व फुलांची रचना सामान्यत: ⇨ग्रॅमिनी कुलात वर्णिल्याप्रमाणे. सु. तीस वर्षांत एका बेटात अदमासे ३०० खोडे (बांबू) बनतात व त्यातील फुलोऱ्यातून ५-१० किग्रॅ. बी मिळते. नवीन लागवड बियांपासून निसर्गत: होते. तथापि लागवडीस फुटवे किंवा कोवळे तुकडे वापरतात. फुलोरा येऊन जाण्यापूर्वी काढलेला बांबू अधिक उपयुक्त; त्यानंतर बेटात नवीन खोडे येणे थांबते. ही झाडे फार उपयोग आहेत. घरबांधणी, तराफे, शेतीची अवजारे, शिड्या, पूल बांधणी, कागद व रेयॉन-निर्मिती, जनावरास चारा इत्यादींकरिता वापरतात.

कोवळ्या कोंबाची  भाजी व लोणची करतात. त्यामुळे भूक व पचनक्रिया  सुधारते. दुष्काळात बी धान्याप्रमाणे खातात. पाने आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी) वरक्तवांतीवर गुणकारी; पाने जनावरांना मीठ व काळ्या मिरीबरोबर हगवणीवर देतात; घोड्यांच्यासर्दी-खोकल्यावर उपयुक्त. कांड्यातून मिळणारा पांढरा रस सुकून घट्ट झाला म्हणजे त्याला ‘तबशीर’,‘मॅन्ना’ किंवा ‘वंशलोचन’ म्हणतात. हा पौष्टिक आणि वाजीकर (कामोत्तेजक) असून ज्वरनाशक व कफनाशक असतो.

कळक : (१)फांदी, (२)फुलोरा, (३)कणिशक, (४)फूल, (५)बहुस्तुष, (६)अंतस्तुष, (७)लघुतुष (८)केसरदले, (९)किंज.

 

 

 

 

 

लेखक: म. वा. ठोंबरे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate