অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कवठ

कवठ

कवठ

(हिं. कविठ, कैठ, बिलिन; गु. कवीट, कोठु; क. बळुवल, मालुरा; सं. कपित्थ, दधिफल, कपिप्रिय; इं. एलेफंट ऑर वुड ऍपल, मंकी फ्रूट; लॅ. फेरोनिया एलेफंटम, फे. लिमोनम; कुल-रूटेसी). ह्या काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र, तसाच पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांतही आहे; याची फळांकरिता लागवड करतात.

उंची ६-९ मी. साल काळी खरबरीत, जाड व भेगाळलेली, पाने संयुक्त, विषमदली पिच्छाकृती (पिसासारखी), एकाआड एक, गुळगुळीत व चकचकीत; दले ३-९, बिनदेठांची, समोरासमोर, अखंड व गोल टोकांची; उन्हाळ्यात पाने गळतात.

फुले पंचभागी, बहुयुतिक, फिकट लाल, आखूड देठांची असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, विरळ परिमंजरीवर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पात व स्त्री-पुष्पांत काही फरक असतात [→ फल]. घनकवची मृदुफळ मोठे, ५-७.५ सेंमी. व्यासाचे, गोलसर, कठीण व करडे असून मगजात (गरात) अनेक बिया असतात.

कवठ : (१)पानेव फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) बी

फळातील मगज आंबटगोड व खाद्य असून त्याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबते करतात. तो स्तंभक (आकुंचन करणारा), उत्तेजक, दीपक (भूक वाढविणारा) असून अतिसार, आमांश इ. पोटाच्या तक्रारींवर चांगला; विषारी कीटकदंशावर बाहेरून लावतात. बियांतील तेल खाजेवर लावतात. साल पित्तावर उपयुक्त; पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात.

वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास वापरतात. ह्या झाडापासून पाझरणारा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असून चित्रकाराचे जलरंग व इतर रंग-रोगणे यांकरिता उपयुक्त; तो बाभळीच्या डिंकाऐवजी वापरतात. शेळ्या व मेंढ्या पाला खातात. फळाच्या कठीण कवचापासून काही शोभिवंत वस्तू (उदा., तपकिरीची डबी) बनवितात. लाकूड पिवळसर किंवा करडे पांढरे, कठीण, मजबूत व टिकाऊ असल्याने त्याचा उपयोग घरबांधणी, तेलाचे घाणे, चाकाचे आरे, शेतीची अवजारे इत्यादींसाठी होतो. नवीन लागवड बियांपासून करतात.

 

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate