অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कासीर

कासीर

कासीर

(लाकडी उडल; हिं. पाठिया, सिरन; क.बंगणा,कळबेगे, होटे; गु.शांबर; लॅ. अ‍ॅल्बिझिया बायनेन्सीस कुल-लेग्युमिनोजी). शिरीष, काळा शिरीष व लुलै ह्यांच्या वंशातील (व मिमोजॉइडी उपकुलातील) हा सदापर्णी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष कोकणात व उ.कारवारच्या दाट जंगलात सामान्यपणे आढळतो;

शिवाय द.महाराष्ट्र,हिमालयाचा उष्णकटिबंधातील भाग, ब्रह्मदेश, श्रीलंका इ. ठिकाणीही याचा प्रसार आहे. याचे शिरीषाशी बरेच साम्य असते; तथापि त्यापेक्षा हा बराच मोठा (१८ ते २४ मी. उंच) असून साल करडी, भेगाळ व सुरकुतलेली असते. कोवळे भाग लवदार असतात. पाने संयुक्त आणि मोठी; मुख्य देठ १५-३० सेंमी.; तळाशी मोठे प्रपिंड (ग्रंथी); दले १२-४० व दलके ४०-८० असून उपपर्णे दीर्घस्थायी (सतत), मोठी, हृदयाकार, पातळ व लवदार असतात [पान] .

फांद्यांच्या शेंडयांकडे, स्तबकांच्या परिमंजरीवर [पुष्पबंध] , शिरीषापेक्षा लहान, पिवळट फुले एप्रिल-जूनमध्ये येतात. केसरदले (पुंकेसर) लालसर व शिंबा (शेंग) लहान, १२.५-१५ X २-२.५ सेंमी., फिकट पिंगट, चपटी व न तडकणारी; बीजे ८-१०, गुळगुळीत गडद तपकिरी व अंडाकृती असतात.

याचे लाकूड मऊ व साधारण टिकाऊ असते; तथापि फळ्या, खांब, लहान होडगी, चहाच्या पेट्या, फण्या, खेळणी, कातीव वस्तू, किरकोळ सजावटी सामान इत्यादींकरिता वापरतात. खोडातून पाझरणारा डिंक सजावटी समान इत्यादींकरिता वापरतात. खोडातून पाझरणारा डिंक नेपाळात `डॅफ्ने' नावाच्या कागदाकरिता वापरतात. साधारण कोवळया फांद्यांचा चारा गुरांना खाऊ घालतात. ही झाडे चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता लावतात. जमिनीतील नायट्रोजनाच्या पुरवठ्यात यांच्या लागवडीने वाढ होते.

 

 

लेखक: शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate