অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुटकी

कुटकी

(कटकी, कोल्हाल; हिं. गादरतंबाखू; गु. कलहार; सं. कुलाहल, भुतकेशी; लॅ. सेल्शिया कॉरोमांडेलियाना; कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ही सरळ वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी भारतात सर्वत्र तणासारखी उगवलेली आढळते; शिवाय ही श्रीलंका, अफगाणिस्तान,चीन इ. देशांतही आढळते. खोड साधारण अर्धा ते एक मी. पर्यंत व केसाळ असून मूलज (मुळापासून निघालेली आहेत असे वाटणारी) व स्कंधेय (खोडापासून निघालेली पण जमिनीलगत न येणारी) अशी दोन प्रकारची केसाळ पाने त्यावर येतात. मूलज पाने लांब देठाची, मध्यम आकाराची, वीणाकृती, पिसासारखी, थोडीफार विभागलेली आणि दातेरी असतात; पानांचे खंड कमी जास्त आकाराचे असून लहान खंड तळाजवळ पण टोकास एक मोठा खंड असतो. स्कंधेय पाने एकाआड एक, तशीच पण टोकाकडे लहान व देठ कमी होत जाऊन शेवटी फुलोऱ्यात हिरवी लहान छदे (फुले व फुलोरा ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) दिसतात. फुले लहान, पिवळी, चक्राकृती असून लांब दांड्यावर साध्या वा फांद्या असलेल्या मंजरीवर जानेवारीमध्ये येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलातील वर्णनाप्रमाणे असतात. केसरतंतूवर जांभळे केस (फूल); बोंड गोलसर व लहान; बिया अनेक व त्यांवर पुटकुळ्या असतात.

पाने अतिसार व आमांश यांवर स्तंभक (आकुंचन करणारी) व शामक. वनस्पतीचा रस कातडीच्या रोगावर पिण्यास देतात व तेलातून बाहेरून चोळतात; त्यामुळे हातापायाची आग कमी होते. ज्वरात तहान कमी होण्यासाठी मूळ चावण्यास देतात. पानांचा रस साखर व पाणी घालून रक्ती मूळव्याधीवर देतात.

काळी कुटकी

(बाळकडू; हिं. कुरू; गु. कडू; सं. कटुकी; लॅ. पिक्रोऱ्हायझा कुरोआ; कुल स्क्रोफ्यूलॅरिएसी). हिमालयाच्या काश्मीर ते सिक्कीम प्रदेशात सु. २,७००-४,५०० मी. उंचीपर्यंत आढळणारी एक लहान केसाळ व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी. मूलक्षोड (जमिनीत असणारे खोड) काष्ठमय व सु. १५-२५ सेंमी. लांब; पाने साधारणत: ५-१० सेंमी. लांब, दातेरी व चमच्यासारखी; फुले पांढरी किंवा फिकट निळी, लहान व पर्णहीन दांड्यावरच्या कणिशात असून लांब व आखूड केसरतंतू असलेली अशी दोन प्रकारची असतात. फळ (बोंड) लहान, १.३ सेंमी. इतर सामान्य लक्षणेðस्क्रोफ्यूलॅरिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

मुळे व सुके खोड (मूलक्षोड) कडू, पौष्टिक, पित्तस्राव व जठररस वाढविणारी, ज्वरनाशक, क्षुधावर्धक असून रेचक आणि दीपक (भूक वाढविणाऱ्या) औषधांत घालतात. त्यांत प्रतिजैव (सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंधक किंवा त्यांचा नाश करण्याचे) गुणधर्म असतात.

'कुटकी' असे हिंदी नाव (इं. इंडियन जेन्शियन; लॅ. जेन्शियाना कुरोआ) असलेली निळसर फुलाची औषधी हिमालयात आढळते, तिचे व परदेशाहून आयात होणाऱ्या पिवळ्या जेन्शियन (लॅ. जेन्शियाना ल्यूटिया) जातीचे औषधी गुणधर्म वर वर्णन केलेल्या कुटकीप्रमाणे असल्याने ह्या सर्व जाती परस्परांऐवजी वापरणे शक्य आहे; त्या उचकी, कावीळ आणि पानथरी या विकारांवरही गुणकारी आहेत. कुटकीची अभिवृद्धी (लागवड) बीजे व मूलक्षोडे यांच्या साहाय्याने करतात. (चित्रपत्र ५२).

परांडेकर, शं. आ.

 

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate