অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केळ, जंगली

केळ, जंगली

(लॅ. हेलिकोनिया; कुल-म्यूझेसी). केळीसारख्या [कदली गण, →सिटॅमिनी] ह्या शोभिवंत, ओषधीय [→ ओषधि] वनस्पतींच्या वंशात सु. ३५ जाती असून त्यांच्या मूलस्थानाबद्दल एकमत नाही. काही जाती अमेरिकेतील उष्ण भागांतील व काही आशियातील उष्ण भागांतील असाव्यात.

थंड प्रदेशात त्यांच्यापैकी काहींची लागवड पानांच्या सौंदर्याकरिता उष्ण पादपगृहात (काचगृहात) अ‍ॅलोकेशिया [→माणक; हस्तिकर्णी], अँथूरियम व कॅलाथियम [→टोपीतांबू] या वंशातील वनस्पतींबरोबर करतात. ह्यांना भूमिस्थित (जमिनीतील) बळकट खोडापासून वायवी (हवेतील) खोड येते आणि त्यावर मोठी, आकर्षक व शोभिवंत पाने; त्यांखाली फुलांचे झुबके आणि शुष्क, तडकणारी तीन कप्प्यांची व तीन बीजांची फळे येतात. संदले तीन रेषाकृती व सुटी; पुष्पमुकुट आखूड आणि नळीसारखा; केसरदले पाच आणि वंध्य केसर एक असतो [→फूल;केळ; सिटॅमिनी].

(१) हेलिकोनिया अंगुस्टिफोलिया, (२) हे. बिहाई व (३) हे. मेटॅलिका या जाती महाराष्ट्रात शोभेसाठी लावतात. पहिली जाती मूळची ब्राधीलमधली; पाने लांब देठाची व कमानीसारखी; उंची १.२४ मी., खुजी; फुले पांढरी, टोकास हिरवी; छदे शेंदरी; फुलोरा सरळ. दुसरी जाती मूळची वेस्ट इंडीजमधली; उंची ४ - ५ मी.; छदे मोठी शेंदरी;फुले लाल किंवा नारिंगी, तिसरी जाती मूळची न्यू गिनीतील. तिची पाने आकर्षक व लोंबती; खालची बाजू, मध्यशीर, किनार व शिरा काशासारख्या तांबड्या; फुले शेंदरी. सर्वांची नवीन लागवड गड्डे विभागून लावून करतात.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate