অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चंदन

चंदन : (1) फुलाऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा उभा छेद, (४) फळ

चंद

(हिं. सफेद चंदन, चंदल; गु. सुखड, सुखेत; क. श्रीगंधा, गंधा, अगरूगंधा; सं. चंदन, आनंदितम, मल्यज, गंधसार; इं. व्हाइट सँडलवुड ट्री; सँडल ट्री, लॅ. सँटॅलम आल्बम; कुल-सँटॅलेसी). ह्या परिचित वनस्पतीच्या वंशातील अनेक जातींची (सु. २५) झुडपे व वृक्ष भारतातील द्वीपकल्पी भाग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॉलिनेशिया ते हवाई द्वीपसमूह आणि जुॲन फर्नांदिस बेटे (चिली) इ. प्रदेशांत आढळतात. या सर्व जाती दुसऱ्या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या साहाय्याने अन्नशोषण (नायट्रोजन आणि फॉस्फरस) करतात म्हणून त्यांना अर्धजीवोपजीवी [⟶ जीवोपजीवी] म्हणतात; त्यांपैकी चंदन (सँटॅलम आल्बम) ही जाती भारतात विपुल आढळते व विशेषतः द. भारतात (कर्नाटक) लागवडीत आहे, कारण तिचे सुगंधी लाकूड (ईस्ट इंडियन सँडलवुड) व त्यातील तेल (चंदन-तेल) यांना व्यापारी महत्त्व आहे.

चंदन हा भारतीय वृक्ष आहे असे मानण्यास भरपूर पुरावा आहे. भारतीय पौराणिक ग्रंथ, धर्मग्रंथ, संस्कृत वाङ्‌मय, काव्य व लोककथा यांमध्ये त्याचा भरपूर उल्लेख आला आहे. सामविधान ब्राह्मण ग्रंथ, रामायण, महाभारत, धम्मपद, जाकत, अंगुत्तरा, विनय पिटक (इ. स. पू. ४००-३००) कौटिलीय अर्थशास्त्र (इ. स. पू. २००), पतंजलीचे महाभाष्य (इ. स. पू. १००) वगैरेंमधून गेली तेवीस शतके भारतात चंदन लागवडीत असल्याबद्दल इतर काही पुरावेही उपलब्ध आहेत. तथापि तो वृक्ष फार पूर्वी इंडेनेशियातून (तिमोर) आयात झालेला आहे, असे काही शास्त्रज्ञ मानतात. हल्ली त्याचा प्रसार कर्नाटक, कूर्ग, कोईमतूर व महाराष्ट्र येथील जंगलांत (विंध्य पर्वतापासून दक्षिणेकडे) आहे. कर्नाटकात व तमिळनाडूत कमी पावसाच्या भागांत समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत विपुल आढळतो आणि लागवडीतही आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व ओरिसा येथेही त्याचा प्रवेश झाला असून तो तेथील निसर्गाशी समरस झाला आहे; मात्र त्याचे लाकूड कमी प्रतीचे असते. याशिवाय खासगी व सार्वजनिक उद्यानांतून तो लावला जातो.

चंदनाचा वृक्ष सदापर्णी असून सु. १५ मी. उंच वाढतो, तथापि अनुकूल परिस्थितीत सु. १८— २० मी. पर्यंतही वाढतो; त्याला काहीशा बारीक व लोंबत्या फांद्या असून साल गडद भुरी लालसर किंवा काळपट, खरबरीत आणि उभ्या, बारीक व खोल रेषांनी व्याप्त असते; अंतर्साल गडद रंगाची असते. त्याला गुळगुळीत, साधी, लहान (१·५ - ८ X १·६ - ३·२ सेंमी.), समोरासमोर, लांबट, भाल्यासारखी, पातळ, दोन्हीकडे टोकदार पाने असतात; मार्च ते ऑगस्टमध्ये शेंड्यावर किंवा पानांच्या बगलेत लहान परिमंजरीय वल्लरीवर [⟶ पुष्पबंध] लहान, गंधहीन, फिकट पिवळसर, भुरी जांभळट, लालसर जांभळट किंवा लालसर निळी फुले येतात. फळे (अश्मगर्भी अथवा आठळीयुक्त) गोलसर (१·३ सेंमी. व्यासाची), गर्द जांभळी असून बिया गोल किंवा एका टोकास निमुळत्या व दुसऱ्या टोकास गोलसर आणि कठीण व खरबरीत असतात. फुलाची संरचना आणि इतर शारीरिक लक्षणे चंदन कुलात [⟶ सँटॅलेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

जमीन व हवामान

या वृक्षाला लहान असताना सावली चालते, परंतु पुढे तो उघड्यावर चांगला वाढतो. तसेच कोवळेपणी तो तोडल्यावर राहिलेल्या खुंटापासून नवीन प्ररोहांची (धुमाऱ्यांची) वाढ होते, परंतु जून झाडांची तशी वाढ होत नाही. बराच काळ पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास तो जगत नाही, तसेच कोवळेपणी प्रखर सूर्यतापाने त्याची साल वाळून सोलून जाते, लाकूडही वाळते आणि झाड नाश पावते; अशा वेळी जवळच्या झाडांची सावली त्याचे संरक्षण करते. वनातील अग्नीच्या (वणव्याच्या) भक्ष्यस्थानी ही झाडे सहज पडतात; तथापि पुढे बुंध्यापासून नवीन धुमारे फुटतात. साधारणतः ६०० — १,०५० मी. उंचीपर्यंत ही झाडे चांगली वाढतात. सु. ६० — १६० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात त्यांची विपुलता दिसते. उत्तम मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन व बहुधा गर्द रंगाचे लाकूड) ६०० — ९०० मी. उच्चता व ८५ — १३५ सेंमी. पाऊस असलेल्या प्रदेशातील झाडात असते; थोडक्यात थंड हवा, मध्यम पर्जन्यमान, भरपूर सूर्यप्रकाश व बराच काळ कोरडी हवा त्यांच्या लागवडीस उत्तम असते. भोवताली घाणेरी, बांबू असलेल्या खुरट्या जंगलात किंवा शेतांच्या कडेने चंदनाची झाडे विशेषेकरून वाढल्याचे आढळते. चंदनाला काळ्या व खोल जमिनीपेक्षा खडकाळ, लाल, लोहयुक्त, उथळ रेताड, निचऱ्याची व निकस जमीन जास्त चांगली मानवते; ओलसर व सकस जमिनीत वाढ अधिक चांगली झाली, तरी लाकडाचा दर्जा तेलाच्या दृष्टीने कमी प्रतीचा ठरतो. कर्नाटकात चंदनाची नैसर्गिक वने पठारावर सु. १,६०,००० चौ. मी. च्या क्षेत्रात समुद्रसपाटीपासून ते १,२०० मी. उंचीपर्यंत व सु. ५० — १८० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात आढळतात. त्यापैकी १२,००० चौ. मी. चा एक संपन्न पट्टा कर्नाटकाच्या सदापर्णी वनांच्या पूर्वेस व दुसरा ईशान्येकडील कूर्गपासून ते आंध्र प्रदेशातील काही जिल्हांच्या सीमेपर्यंत आढळतो. याशिवाय धारवाड, शिमोगा चिकमंगळूर, तुमकूर, हसन, मरकारा, म्हैसूर, बंगलोर, कोलार इ. ठिकाणी चंदनाचे खासगी क्षेत्र पसरले आहे. तमिळनाडूत मुख्यतः कोईमतूर, निलगिरी, सालेम, वेल्लोर या ठिकाणी विपुल आणि तिरुनेलवेली व तिरुचारपल्ली येथे कमी प्रमाणात चंदनवने आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, छोटा नागपूर इ. ठिकाणी कमीजास्त प्रमाणात नैसर्गिक वने व मानवनिर्मित लागवडी आढळतात. पक्ष्यांनी प्रसार केलेल्या बियांपासून अनेक ठिकाणी बरीस झाडे इतरत्र उगवतात परंतु त्यांतील बरीच अनेक कारणांनी नाश पावतात. योग्य आश्रय वनस्पती मिळाल्याशिवाय चंदनाची वाढ चांगली होत नाही. ऐन, तामण, धावडा, शिसव, करंज शिरीष, बाभूळ इ. किंवा त्यांच्या वंशांतील किंवा काही इतर वनस्पती (अंकोल, साग, निंब, मोह, तरवड, पांगारा, निलगिरी, बकुळ, कुंकमवृक्ष, निर्गुडी, कुडा, बोर, कुचला, बारतोंडी इ.) हे आश्रय मानवतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate