অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाफा, भुई

चाफा, भुई

चाफा, भुई

(हीं. भुई चंपा; गु. भुईचंपो; क. नेल संपिगे; सं. भूमिचंपा, भूचंपक; लॅ.केंफेरिया रोटुंडा; गण-सिटॅमिनी; कुल-झिंजिबरेसी) ही आकर्षक, सुगंधी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी मलायात व भारतात सर्वत्र आढळते आणि शोभेकरिता बागेत सर्वत्र लावतात. हिला भूमिस्थित, आयत व गाठीसारखे खोड [मूलक्षोड, ग्रंथिक्षोड; ⟶ खोड] असून जाडसर शाखांपासून जमिनीत अनेक गड्डे (ग्रंथिक्षोड) बनतात. पाने दोन वा क्वचित अधिक, साधी, आखूड व पन्हळी देठाची, लांबट, मोठी (३०-४५ X ७ - ११ सेंमी.) उभी, अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी) असून त्यांचा वरचा पृष्ठभाग हिरवट व चित्रविचित्र आकृतिबंधाचा आणि खालचा पृष्ठभाग लालसर जांभळा असतो.

फुले सुगंधी, पांढरी, मोठी असून मोठी पाकळी (ओष्ठ) जांभळट असते; लहान कणिश प्रकारच्या फुलोऱ्यावर दाटीने ती एप्रिलमध्ये येतात; त्यावेळी पाने वाळून जात असतात व ती पुढे पावसाळ्यात येतात. द्‌यावृत (दोन आवरणांच्या) बोंडात अनेक बिया असतात; इतर सामान्य लक्षणे ⇨सिटॅमिनी वा कदली गणात वर्णिल्याप्रमाणे. फुलोरा जमिनीच्या पृष्ठभागाजवळ येत असल्याने 'भुईचाफा' नाव पडले असावे. या वनस्पतीचे गड्डे कडू व तिखट असून प्रथम त्यांना कापरासारखा व नंतर दवण्यासारखा वास येतो.

गळणे, सूज आणि जखमा यांवर गड्ड्यांचे पोटीस बांधतात व तेल मलमात घालतात. चूर्ण गालगुंडावर लावतात; गड्डे दीपक (भूक वाढविणारे) असून पोटातील तक्रारीवर देतात; त्यांचा रस हातापायांच्या सुजेवर देतात, परंतु तो वांतिकारक असतो त्यामुळे तोंडास फार पाणी सुटते. मूलक्षोड व पाने स्वादाकरिता उपयुक्त असून सुगंधी पदार्थात व सौंदर्यप्रसाधनांत मूलक्षोडातील फिकट पिवळे व उडून जाणारे तेल घालतात; तेलात सिबीओल व मिथिल शॅविकॉल असतात.

हलकी माती, कुजलेले शेणखत अगर पालापाचोळ्याचे खत कुंड्यात भरून त्यांत गड्डे लावतात. फुले येऊन गेल्यावर ओषधी पूर्णपणे वाळून गेल्यासारखी वाटते; परंतु गड्डे जमिनीत राहतात; त्यांना काही दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतर त्यांपैकी चांगल्या कळ्या (डोळे) असलेले गड्डे अभिवृद्धीसाठी (लागवडीसाठी) वापरतात. ते लावल्यापासून उगवून येईपर्यंत पाणी बेतानेच द्यावे; उगवल्यावर भरपूर द्यावे. शेणखत अगर अमोनियम सल्फेट पाण्यात मिसळून दिल्यास रोपे चांगली वाढतात.

 

 

लेखक: जमदाडे, ज. वि,चौधरी, रा. मो.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate