অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डुरांटा प्लुमेरी

डुरांटा प्लुमेरी

डुरांटा प्लुमेरी

(इं. गोल्डन ड्यू ड्रॉप, स्काय फ्लॉवर, पीजन बेरी; कुल-व्हर्बिनेसी). हे काटेरी, सदापर्णी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) झुडूप मूळचे द. अमेरिका (मेक्सिको ते ब्राझील), वेस्ट इंडीज येथील असून भारतात सर्वत्र बागेत शोभिवंत कुंपणाकरिता  लावले जाते. फांद्या बहुधा काटेरी, थोड्या वाकलेल्या व पसरट असतात. पाने साधी, लंबगोल, आयत, दातेरी किंवा अखंड, समोरासमोर; फांद्यांच्या टोकांकडे अगर पानांच्या बगलेत लोंबत्या मंजऱ्या बहुधा नेहमी येतात; परंतु विशेषतः जानेवारी-फेब्रुवारी या काळात येतात. फुले निळी, लहान व अनेक; पांढऱ्या फुलाचा एक स्वतंत्र प्रकार आहे. मृदुफळे पिवळी, गोलसर, मोठ्या वाटाण्याएवढी असतात.

इतर सामान्य लक्षणे साग कुलात [⟶ व्हर्बिनेसी ] वर्णिल्याप्रमाणे. ही झाडे विषारी आहेत असे मानतात. फळांचा रस डासांच्या अळ्यांना मारक असतो व तसा त्याचा उपयोग करतात. पानांत सॅपोनीन व फळात नार्कोटिनासारखे क्षाराभ (अल्कलॉइड) असते. ह्याचे लाकूड पिवळट किंवा फिकट तपकिरी. कठीण व जड असते. ते कातीव कामास उपयुक्त असते. पाला जनावरे खात नाहीत. नवीन लागवड कलमे लावून करतात.

 

 

लेखक: चौगले, द. सी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate