অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डेंड्रोबियम

डेंड्रोबियम

डेंड्रोबियम

(कुल-ऑर्किडेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, एकदलिकित)फार सुंदर फुलांबद्दल प्रसिद्ध आमर कुलातील [⟶ ऑर्किडेसी] एका वंशाचे नाव. विलिस यांच्या मते या वंशात नऊशे जाती असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधीय आशिया ते पॉलिनीशियापर्यंत व ऑस्ट्रेलियात आहे. बऱ्याच जातींची शोभेसाठी बागेत लागवड करतात. काही औषधी आहेत. सर्वच जाती ⇨अपिवनस्पती असून त्यांना आखूड व मांसल आभासी कंद असतात.

पाने साधी, बिनदेठाची असून त्यांच्या तळाशी आवरक (वेढणारा तळभाग) असतो. फुले मोठी व आकर्षक, एकेकटी किंवा मंजरीवर येतात. संदले व प्रदले सारखी असून ओठाला (मोठ्या पाकळीला) तळाशी कधी वृंतक (फार लहान देठ) असते व कधी नसते. परागकोश दोन कप्प्यांचा आणि परागपुंज चार व बहुधा काहीसे जुळलेले असतात [⟶ फूल]. भारतात टेकड्यांवरील जंगलांत व सुंदरबनातडेंड्रोबियमच्या अनेक जाती आढळतात. महाराष्ट्रात सु. वीस जाती आढळतात; त्यांपैकी निम्म्या बाहेरून आणून लावल्या आहेत.

डें. नोबिल ही जातीं हिमालयात व खासी टेकड्यांत आढळते; ती या वंशात सुंदर मानली आहे. चीनमध्ये हिचा उपयोग पौष्टिक व दीपक (भूक वाढविणारी) म्हणून करतात. हिची फुले पांढरी, मोठी व टोकास लालसर गुलाबी असून ओठाच्या तळाशी गर्द किरमिजी मखमली ठिपका असतो; ती सुगंधीही असतात. डे. क्रुमिनेटम अंदमान, मलाया, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. ठिकाणी सापडते. हिच्या पांढऱ्या फुलावर पिवळ्या खुणा असतात.

मलायात तिचा उपयोग मेंदू व तंत्रिका (मज्जातंतूच्या) विकारांवर करतात. फुले व पाने पटकीवर उपयुक्त असून पानांच्या चूर्णाचे पोटीस गळवे व मुरुमांवर लावतात; मध्यत्वचेपासून मिळणारा वाख हॅटमध्ये वापरतात. आभासी कंदाचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेल्या अर्क) कानदुखीवर देतात. डें. ओवॅटम (म. नागली) ही सुगंधी जाती सह्याद्रीवर व तमिळनाडूत आढळते. ती वेदनाहारक असून तिचा रस सारक, दीपक व पित्ताला चेतना देणारा असतो.


लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 11/4/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate