অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तामील

तामील

(हिं. सं. म. तमाल; क. हर्दला; इं. गँबोज ट्री; लॅ. गार्सीनिया भोरेला कुल–गटिफेरी). सु. १०–२० मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष बांगला देश, खासी टेकड्या, उत्तर कारवार, मलबार, श्रीलंका, सयाम, मलाक्का इ. प्रदेशातील दाट जंगलात आढळतो. तो कोकम व आमली यांच्या वंशातील आणि गटिफेरी अथवा कोकम कुलातील असल्याने त्यांचे याच्याशी अनेक शारीरिक लक्षणांत साम्य आहे. फांद्या पसरट व गुळगुळीत असून पाने कोकमासारखी पण थोडी मोठी असतात. स्त्री–पुष्पे एकाकी व पुं. पुष्पे २–५ च्या झुबक्यांनी पानांच्या बगलेत, नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. मृदुफळ लहान, गोलसर व तळाशी संवर्ताने वेढलेले; बिया चार, पिंगट, लांबट व साधारण चपट्या असतात. खोडावर पाडलेल्या खाचांतून पिवळट व चिकट द्राव स्रवतो, तो गँबोज राळ आणि डिंक यांचे मिश्रण असते. तो विलायती आमलीतून मिळणाऱ्या गँबोजसारखा असून रंगरोगणे, अन्न, मलमे इत्यादींत व प्रदीपक (दिव्यात वापरण्याकरिता) म्हणून वापरला जातो. तसेच हा तीव्र रेचक आणि कृमीनाशक असून जलशोथ (पाणी साचून आलेली सूज), अनार्तव (विटाळ बंद होणे), बद्धकोष्ठता यांवर उपयुक्त आहे; फीतकृमिनाशक औषधात तो वापरतात. लचकणे, खरचटणे व सूज यांवर लावतात. याला ‘रेवाचिनी’ असेही म्हणतात. याचे लाकूड कठीण असून त्यापासून पेट्या, कपाटे वगैरे बनवितात. बियांतील मेद साबणात वापरतात तसेच त्याचा तुपाऐवजीही उपयोग करतात.

हळदी

(ओंट; लॅ. गार्सीनिया स्पायकॅटा, प्रकार मायक्रँथा). या नावाचा मध्यम आकाराचा एक सयामी सदापर्णी वृक्ष तामीलच्या वंशातील असून त्याचा प्रसार भारतात कोकण, घाट व कारवारची जंगले ह्यांत बराच आहे. शारीरिक लक्षणे साधारणपणे तामीलसारखी; लाकूड कठीण पण चिंबण्याची शक्यता जास्त असते.

पहा : आमली (विलायती); कोकम; गटिफेरी.

 

महाजन, मु. का.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate