অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तिमरू

तिमरू

तिमरू

(टेंबुर्णी, हिं. लोहारी, तेंडू; क. बळकुनिकी, गोइंदु; इं. मौंटन पर्सिमॉन; लॅ. डायोस्पिरॉस माँटॅना कुल–एबेनेसी). सु. ६–९ मी. उंच वाढणाऱ्या या पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात सर्वत्र असून श्रीलंका, मलाया व ऑस्ट्रेलियातील उष्ण प्रदेश येथेही तो आढळतो.

उत्तर कारवारात सामान्य आहे. साल पातळ, करडी, खरबरीत व ढलप्यांनी सोलून निघणारी असून तीवर साधे किंवा शाखित काटे असतात. कोवळ्या फांद्या लवदार व पाने विविधाकृती, एकाआड एक, अंडाकृती–लांबट, दीर्घवृत्ताकृती, विशालकोनी व तळाशी हृदयाकृती; फुले विभक्त लिंगी, लहान, हिरवट पांढरी, चतुर्भागी असून फेब्रुवारी–एप्रिलमध्ये  येतात.

पुं–पुष्पे वल्लरीवर व स्त्री–पुष्पे एकेकटी असतात [→ फूल]. मृदुफळ गोलसर, लालसर पिंगट व कडू असून त्यातील चिकट गरात दोन ते आठ बिया असतात; इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ एबेनेसी अथवा टेंबुर्णी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ विषारी असून गळवावर बाहेरून लावतात; चुरलेली पाने व फळे माशांना आकृष्ट करण्यास वापरतात.

लाकूड करडे व त्यावर पिवळी किंवा भुरी झाक असते. ते मऊ अथवा साधारण कठीण, टिकाऊ व जड असते. ते जळणास चांगले परंतु किरकोळ लहान वस्तु, कोरीव काम, आगपेट्या व आगकाड्या, गाड्या व शेतीची अवजारे, तराफे इत्यादींसही उपयुक्त असते.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate