অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागीन

नागीन

नागीन

(मोरवा, घणसपात, मुरिया; हिं. मुर्वा; गु. मुरवेल; क. मुरुग; सं. मरुर; इं. द सीलोन बो-स्ट्रिंग हेंप; लॅ. सॅन्सेव्हेरिया झेलॅनिका; कुल-लिलिएसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी मूळची कॉरोमांडल किनाऱ्यावरील असून श्रीलंका, जावा, चीन व उष्ण कटिबंधीय आफ्रिका येथे आढळते. खोड जमिनीत (मूलक्षोड किंवा तिरश्चर) असून त्यापासून जमिनीवर सरळ  उभी, तलवारीसारखी चिवट, फिकट हिरवी, टोकदार, अंतर्गोल, रसाळ व ०·३–०·९ मी. लांब व २·५ सेंमी. रुंद सु. ८–१५ पाने येतात; त्यांवर गर्द हिरवे आडवे पट्टे असतात. फुलोऱ्याचा दांडा पानांच्या झुबक्यातून वर येतो व त्यावर हिरवट पांढऱ्या फुलांच्या मंजऱ्या येतात. सॅ. झेलॅनिका प्रकार लॉरेंटी यामध्ये पानांच्या दोन्ही कडांवर ०·६—१·२५ सेंमी. रुंदीचा पिवळट उभा पट्टा असतो. फुलांची संरचना सामान्यपणे ⇨ लिलिएसी कुलात (पलांडू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. सॅ. सिलिंड्रिका जातीत पाने शूलाकृती (टोकाकडे निमुळती होत गेलेली) व भरीव असतात.

 

सर्वच जाती बागेत शोभेकरिता लावतात. नागीनच्या पानांपासून फार बळकट, चिवट आणि रेशमासारखा पांढरा वाख मिळतो व तो अननसाच्या वाखासारखा असतो. त्याच्यापासून दोरा, सुतळी, दोरखंड, चटया, मासेमारीची जाळी व धनुष्याच्या प्रत्यंचा (दोऱ्या) इ. वस्तू बनवितात. तो रशियन हेंपपेक्षा अधिक बळकट असून कापड व कागद यांच्या निर्मितीत फार महत्त्वाचा समजतात. त्याचे मूळ रेचक, पौष्टिक व ज्वरनाशक असते. खोकल्यावर मुळाचा रस मधातून देतात. सॅन्सेव्हेरिया वंशाचा अंतर्भाव हल्ली हीमोडोरसी कुलात केलेला आढळतो.

 


लेखक -जमदाडे, ज. वि.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate