অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पांशी

पांशी

(पुंशी, फणशी, शेंगळी; क. अंदिपुनरू; इं. कॅरालिया वुड; लॅ. कॅरालिया इंटेजेरिमा. कॅ. ब्रॅकियाटा; कुल-ऱ्हायझोफोरेसी). सु. १२-१५ मी. उंची व १.५-१.८ मी. घेर असलेला हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र पण तुरळकपणे आढळतो; शिवाय अंदमान बेटे, आसाम, ब्रह्मदेश, श्रीलंका, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांतही आढळतो. खोडावरची साल गडद करडी पातळ; पाने साधी, समोरासमोर, गडद हिरवी, गुळगुळीत, चिवट व चकचकीत, ५-९ × २.५ -६ सेंमी. व साधारण अंडाकृती असतात. दोन देठांमधील उपपर्णे शीघ्रपाती (लवकर गळून पडणारी); फुले बिनदेठाची, फार लहान, अष्टभागी पिवळट, पांढरी, कक्षास्थ (बगलेतील) वल्लरीत [⟶ पुष्पबंध] फेब्रुवारी ते मार्चमध्ये येतात. मृदुफळे मांसल, खाद्य, गोलसर, वाटाण्याएवढी, लाल व एकबीजी असून एप्रिल ते जूनमध्ये येतात; बिया क्वचित दोन प ण सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ऱ्हायझोफोरेसी कुलात (कांदल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ह्या कुलातील बहुतेक झाडे कच्छ वनश्रीत [⟶वनश्री] आढळतात, परंतु हा अंतर्देशीय आहे. लाकूड लालसर किंवा पिंगट, जड व दर्शनीय असून त्याला चांगली झिलई होते. घरबांधणी, दारे, खिडक्या, जिने, मुसळे, सजावटी सामान, कपाटे, लाकडी जमीन, चित्रांच्या चौकटी, ब्रशांच्या पाठी इत्यादींसाठी वापरतात. बियांचे तेल कारवारात तुपाऐवजी वापरतात. फळे संसर्गजन्य जखमांवर व साल इंडोचायनात खाजेवर लावतात. तोंड आल्यास व घसा खवखवल्यास साल वापरतात. मलाक्कात पानांचा चहा पितात. जहाजांत इंधनाकरिताही याचे लाकूड वापरतात, कारण त्याचे उष्णता मूल्य जास्त असते.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate