অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पान

पान

पान हे अनेक वनस्पतींचे सर्वांत सहज दिसणारे, खोडावरचे, महत्त्वाचे, सपाट व बाजूचे (पार्श्विक) उपांग होय. वैदिक वाङ्मयात ‘पर्ण’ ही संज्ञा वनस्पतींच्या एका अवयवास (पानास) वापरलेली आहे. तसेच ही संज्ञा एका यज्ञीय वृक्षाला (पलाश) उद्देशून वापरली आहे. पानांतील हिरवे द्रव्य (हरितद्रव्य) व त्यांची बहुधा मोठी असलेली संख्या यांमुळे वनस्पती किंवा जंगल अथवा शेत यांसारखे वनस्पतींचे समूह यांचे स्वरूप दुरूनही सहज कळते. सर्वच पाने (पर्णसंभार) हिरवी, लालसर, पिवळी किंवा झडलेली असताना एखाद्या वनस्पतीचे किंवा वनश्रीचे दृश्य निरनिराळे दिसते. पाने व खोड यांचे कलिकावस्थेत व नंतर निकटचे संबंध ध्यानात घेऊन त्या दोन्हींना मिळून प्ररोह म्हणतात आणि त्याचा उगम बीजी वनस्पतीत [→ वनस्पती, बीजी विभाग ] बी रूजताना त्यातील आदिकोरकापासून (अंकुराच्या वर वाढणार्‍या भागापासून) होतो [→ अंकुरण ]. खोडावरची शेंड्याची ⇨कळी (अग्रस्थ कोरक) जसजशी वाढते तसतशी तीतून चिमुकली पाने व खोड हळूहळू साकार होतात; सर्वांत कोवळे भाग शेंड्याजवळ व जून भाग क्रमाने खाली तळाकडे याप्रमाणे अग्रवर्धी अनुक्रम दिसतो. गाजर, मुळा व बीट यांच्या मुळांवर दिसणारी पाने वस्तुतः मुळांच्या टोकावर असलेल्या संक्षिप्त खोडावरच आलेली असून प्रत्यक्ष मुळांवर पाने (कोरक) कधीही येत नाहीत (अपवाद – रताळे वगैरे). ती खोडावर विशिष्ट जागी (पेर्‍यांवर) विशिष्ट पद्धतीनुसार मांडलेली असतात [→ पर्णविन्यास ]. खोडाशी पानाने केलेल्या वरच्या कोनास बगल (कक्ष किंवा कक्षा) व त्यात आढळणार्‍या कळीस (कोरक किंवा मुकुल) बगलेतील (कक्षास्थ किंवा कक्षस्थ) कली म्हणतात. पान बहुधा सपाट व पातळ असून त्यातील कठीण शिरांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला आधार प्राप्त होऊन योग्य प्रकारे व प्रमाणात प्रकाश उपलब्ध व्हावा अशा स्थितीत ते खोडावर राहते. प्रकाशाच्या सान्निध्यात अन्ननिर्मिती करणे [→ प्रकाशसंश्लेषण] व नेहमी वनस्पतीतील वाजवीपेक्षा अधिक असलेला पाण्याचा अंश वाफेच्या रूपाने बाहेर टाकणे आणि गरजेप्रमाणे त्यावरील अतिलहान छिद्रातून म्हणजे ⇨त्वग्रंध्रांद्वारे ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकणे

[→ श्वसन, वनस्पतींचे ] इ. प्रक्रिया पानांच्याद्वारे चालतात व त्यांना अनुकूल अशी त्यांची अंतर्बाह्य संरचना, आकार व आकारमान असते. पानांचा उगम व विकास खोडावर (आ. १) किंवा फांदीवर शेंड्याकडे अतिसूक्ष्म आणि सतत विभाजन होत असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या [→ विभज्या] बाह्यस्तरावर (त्वचाजनक) प्रथम लहान उंचवटे बनून (आद्यपर्णे) होतो व पुढे त्यात मधली ऊतके (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांचे-पेशींचे-समूह) व शेवटी वाहक कोशिक किंवा वाहिन्या बनून ते पूर्ण बनते.

यामध्ये बहुधा पानाच्या टोकाचा भाग प्रथम पूर्ण होऊन नंतर मध्यभाग व शेवटी तळचा भाग पूर्ण होतो. याउलट क्रम काही नेचांत आढळतो. खोड व मूळ यांच्या विकासाशी तुलना केली असता पानांची वाढ सतत होणारी नसून पान हे फारच मर्यादित वाढीचे पार्श्विक उपांग होय, असे मानतात. काही ⇨शेवले व ⇨शेवाळी यांसारख्या साध्या वनस्पतींना पानासारखी व थोडीफार तशीच कार्ये करणारी उपांगे असतात; तथापि ती अत्यंत साधी असल्याने खरी पाने वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणार्‍या घटकांनी युक्त असलेल्या) वनस्पतींत (बीजुकधारी पिढीवर) आढळणारीच होत.

भाग

पानाचे मुख्यतः तीन भाग असतात : (१) खोडावर पेर्‍याशी सांधणारा भाग तो पर्णतल, (२) हिरवा, बहुधा सपाट व पसरट भाग ते पाते आणि (३) या दोन्हींना जोडणारा लांबट व


कठीण भाग तो देठ (वृंत) (आ.२). पात्याचे टोक (पर्णाग्र) आणि कडा (पर्णधारा) यांत विविधता असते. पात्यात एक मध्यशीर व तिच्या बाजूंस अनेक उपशिरा अथवा त्यात अनेक मध्यशिरा असतात. कधीकधी देठाचा तळभाग फुगीर असून पानाच्या हालचालीस मदत करतो [→ लाजाळू], तेव्हा त्यास पुलवृंत म्हणतात; कधी हा तळभाग पसरट व लांब असून तो खोडास अंशतः किंवा पूर्णतः वेढून टाकतो; त्यास आवरक म्हणतात [ आ. २ (आ) बांबू;

→ केळ; ताड; गवते इ.] व त्याचा खोडास व पानास आधार मिळतो; याच्य वरच्या टोकास पात्याजवळ पातळ पापुद्य्रासारखे किंवा केसाळ लहान उपांग असते, त्यास जिव्हिका (लहान जिभेसारखे) आणि पानास जिव्हिकावंत म्हणतात. पर्णतलाजवळ कधी देठाच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे तर कधी फक्त एक असे लहान हिरवट खवल्यासारखे उपांग असते, त्यास उपपर्ण म्हणतात. हे नसल्यास पानास अनुपपर्ण व असल्यास सोपपर्ण म्हणतात; जास्वंदाच्या पानास (आ. २ अ) बाजूस दोन साधी सुटी (मुख्त पार्श्विक) लहान उपपर्णे असतात. पानासारख्या हिरव्या उपपर्णास पर्णसम [→ वाटाणा; लाख-२] म्हणतात (आ. ३). गुलाबाच्या देठाच्या तळाशी दोन्ही बाजूंस एकेक उपपर्ण चिकटून वाढलेले (वृंतलग्न) असते. कॉफी व रईकुडा यांच्या दोन समोरासमोर असलेल्या पानांची उपपर्णे बाजूस जुळून (अंतरावृंतीय) वाढ़तात. डिकेमालीच्या पानांच्या बगलेत एकच उपपर्ण (अंतवृंती) दिसते; परंतु ते दोन्ही जुळून बनलेले असते. बोर व बाभूळ यांची उपपर्णे काटेरी (कटंक) असतात. वड, पिंपळ, फणस इत्यादींचे अग्रस्थ कोरक मोठ्या खवल्यांनी संरक्षिलेले असते व ते खवले उपपर्णेच होत. ⇨चोपचिनीची उपपर्णे ही आधारावर चढण्यास उपयुक्त (प्रतानरूप) असे तणावे असतात. पॉलिगोनम व चुका यांच्या पानांच्या तळाशी खोडाभोवती नळीसारखे (नलिकाकृती) उपपर्ण असते. देठ असलेल्या पानास (उदा., जास्वंद, आ. २ अ) सवृंत, नसलेल्यास (उदा., बांबू, आ. २ आ) अवृंत म्हणतात; फार

लहान देठ असल्यास अल्पवृंत (उदा., सुई) म्हणतात. कमळ आणि एरंड यांच्या पात्यास मागील बाजूस देठ चिकटलेला असतो (आ. ४) म्हणून त्यास छत्राकृती म्हणतात. लिंबू, पपनस इत्यादींच्या पानांच्या देठास दोन्ही बाजूंस पात्यासारखा (पंखासारखा) पसरट



भाग असतो; त्या देठास सपक्ष म्हणतात. ऑस्ट्रेलियातील एका बाभळीच्या जातीत देठाचे संपूर्णपणे पात्यात रूपांतर झालेले असते. कारण खरे व अनेक दलकांचे पाते लवकर गळून पडते (शीघ्रपाती) म्हणून त्यास वृंतपर्ण म्हणतात. बाष्पोच्छ्‍वास (वाफेच्या रूपात पाणी बाहेर टाकणे) कमी करून प्रकाशसंश्लेषण चालू ठेवण्यास हे रूपांतर खोडास समांतर राहते. देठाच्या अभावी कधीकधी पात्याचा तळभाग खोडाभोवती अंशतः किंवा पूर्णतः वेढून राहतो, त्यास अनुक्रमे सकर्णिक किंवा संवेष्टी (उदा., सदमंदी) म्हणतात. पाते खोडास पूर्णपणे वेढून टाकते व खोड जणू पात्यातून आरपार गेल्यासारखे दिसते, तेव्हा त्यास परिवेष्टी म्हणतात (उदा., शिया, सालीट व कोरफडीची एक जाती)

पाते हा पानाचा प्रमुख क्रियाशील भाग असून त्यामध्ये पाणी, लवणे किंवा तयार झालेला अन्नरस यांची ने-आण करणार्‍या शिरा (वाहक कोशिक व वाहिन्या असलेली ऊतके) बहुधा स्पष्ट दिसतात; त्यांच्या विविध प्रकारच्या मांडणीस ‘सिराविन्यास’ म्हणतात (आ. ५). पात्यात त्याच्या तळापासून एक अथवा अनेक प्रमुख शिरा निघून पुढे त्यांच्यापासून अनेक लहानमोठ्या उपशिरा निघतात व त्या सर्वांचे मिळून जाळे बनते, त्यास जाळीदार सिराविन्यास म्हणतात. उपशिरांचे दाट जाळे न बनता प्रमुख शिरा किंवा उपशिरा समांतर राहतात, त्यास समांतर सिराविन्यास म्हणतात; जाळीदार प्रकार व्दिदलिकित वनस्पतींत व समांतर प्रकार एकदलिकित वनस्पतींत बहुतांशी आढळतो. या दोन्ही प्रकारांत प्रमुख शीर एक (उदा., आंबा, केळ) किंवा अनेक (उदा., एरंड, ताड) असल्यास त्यास अनुक्रमे एकसिराल व बहुसिराल असे म्हणतात; बहुसिराल प्रकारात सर्व प्रमुख शिरा टोकाकडे जुळतात (उदा., कारंदा, गवते) अथवा परस्परांपासून दूरच राहतात (उदा., एरंड, ताड) व या उपप्रकारांस अनुक्रमे अभिमुख व परामुख म्हणतात. अनेक ⇨नेचांच्या व गिंकोच्या [→ गिंकोएलीझ] पानात उपशिरा प्रत्येकी पुनःपुन्हा व्दिभागलेल्या असल्याने याला व्दिशाखी सिराविन्यास म्हणतात. एकसिराल सिराविन्यास पिसासारखा दिसत असल्याने त्याला पिच्छाकृती व बहुसिरालास हातासारखा दिसत असल्याने हस्ताकृती म्हणतात. पानाचे

पाते कमीजास्त प्रमाणात निसर्गतःच विभागलेले (खंडित) आढळते. ते पूर्णपणे विभागल्याने त्याचे स्वतंत्र खंड (दल, दलक) झाल्यास मध्यशिरेवर अनेक पाती दिसतात म्हणून याला संयुक्त पान (पर्ण) (उदा., गुलाब, बेल इ.) व तसे नसून पाते अंशतः विभागलेले असल्यास किंवा अखंडित असल्यास त्यास साधे पान म्हणतात.

पानांचा (पात्यांच्या) आकार, कडा, टोके इत्यादी

पाने आकारमानाने अत्यंत लहानापासून (उदा., दुधी, नायटी, सिलाजिनेला इ.) ते अत्यंत मोठ्यापर्यंत (उदा., केळ, माड, वृक्षी नेचे इ.) असतात; परंतु त्यांच्या आकारांत फार भिन्नता आढळते; ही विविधता त्यांची रूपरेखा, घारा, टोके व छेदन (खंड पडणे) यांतील प्रकारावर अवलंबून असते. पर्णधारांचा विचार केला (आ. ६), तर ती अखंड (उदा., वड, पिंपळ इ.) ; दातेरी पण दात टोकाकडे वळलेले म्हणून दंतुर (उदा., निंब, जास्वंद) ; बाहेर टोके असलेले दात म्हणून प्रदंतुर (उदा., लाल कमळ, कलिंगड इ.) ; बोथट दात म्हणून स्थूलदंतुर (उदा., पानफुटी, ब्राह्मी) किंवा काटेरी म्हणून कंटकित (उदा., घायपात, काटेधोतरा) ; पाण्यावरच्या लाटांप्रमाणे तरंगित (उदा., हिरवा अशोक) ; लहानमोठे उंचवटे व खाचा असल्याने नतोन्नत (उदा., ओक) अशी विविध असते.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate