অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुंगळी

पुंगळी

(पुंगळवेल, पिवळी भोवरी, बोकडी; गु. गुंबडवेल; सं. वाचागंधा, वृषपत्रिका; लॅ. आयपोमिया ऑब्स्क्यूरा; कुल-कॉन्हॉसुल्व्ह्युलेसी).

ही बारीक , वर्षायू (एक वर्षापर्यंत जगणारी) वेल भारतात सु. ९३० मी. उंचीच्या प्रदेशापर्यंत गवताळ जमीन, कुंपण व ओसाड जागा इ. ठिकाणी सर्वत्र आढळते. शिवाय श्रीलंका, मलेशिया, आफ्रिका व मॅस्करीन बेटे यांमध्येही तिचा प्रसार झाला आहे. तिचे खोड बारीक व जांभळट असून पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती-हृदयाकृती व काहीशी टोकदार (लघुकोनी) असतात. फुले लहान, २.५ सेमी. व्यासाची असून १-३ फुलांच्या वल्लऱ्या पानांच्या

बगलेत सर्व ऋतूंत येतात. ती नसराळ्यासारखी, पिवळी किंवा पांढरी असून आत तळाशी जांभळा ठिपका व पाकळ्यांवर पिवळट पट्टे असतात.

बोंड लहान, अंडाकृती, सु. ०.८ सेमी. उंच, गवती रंगाचे व गुळगुळीत असून त्यात २-४ गर्द तपकिरी व मखमली बिया असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात (हरिणपदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

ही वनस्पती कडू, धातुवर्धक, शीतकर (थंडावा देणारी), गर्भोत्पत्तिकारक, कफनाशक इ. गुणयुक्त असते. पाने बुळबुळीत व सुवासिक असून ती विस्तवावर भाजून त्यांचे चूर्ण तुपात कढवून ते तोंड आल्यास लावतात. पाला वाटून लावल्यास सूज फुटते; पुळीवर तो लावल्यास आग कमी होऊन पुळी फुटते अगर बसते.

 

लेखक: जमदाडे, ज. वि

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate