অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोटेपो

पोटेपो

पोटेपो

(लॅ. हॉन्केनिया फिसिफोलिया; कुल - टिलिएसी). सु. एक मीटर उंचीचे काष्ठयुक्त झुडूप. ह्याच्या लॅटिन नावातील वंशवाचक भाग (हॉन्केनिया) जी. ए. हॉन्केन (१७२४–१८०५) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांच्या नावावरून घेतला आहे, कारण त्यांनी जर्मनीच्या पादपजातीविषयी (फ्लोऱ्याविषयी) ग्रंथ लिहिला आहे. प. आफ्रिकेतील उष्ण प्रदेशात, विशेषतः नायजेरिया, झाईरे (काँगो) व घाना येथे हे व इतर एक-दोन जाती विपुल आढळतात. ते एक वर्षभर जगते. त्याचे खोड व फांद्या जांभळट असून त्यांवर काळपट लाल, गोलसर, हृदयाकृती, ३–७खंडित (काहीशी अंजिराच्या पानासारखी), साधी, एकाआड एक पाने असतात. पानांवर व कोवळ्या फांद्यावर तारकाकृती पसरट केस असतात. त्यांच्या टोकावर पुष्कळ फुलांच्या अकुंठित वल्ली (→पुष्पबंध) येतात.

फुले निळसर जांभळी असून संदले ३–५ व आयत; पाकळ्या गोलसर व तळाशी बारीक देठासारख्या आणि संख्येने तितक्याच; केसरदले अनेक व परागकोशात दोन कप्पे; ऊर्ध्वस्थ किंजपुटात ४–८कप्पे व प्रत्येक कप्प्यात अनेक बीजके (फूल). बोंड २·५–५सेंमी. लांब असून त्याच्या शकलावर अनेक लवदार, पसरट व ताठर केस असतात. इतर सामान्य लक्षण टिलिएसी कुलात (परुषक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

या झाडाच्या खोडापासून काढलेला धागा तागाऐवजी वापरण्याइतका चांगला असतो. फुले येत असताना खोड कापून २८दिवस कुजत ठेवून नंतर धागा काढला असता तो उत्कृष्ट प्रतीचा असतो. ही झाडे पुष्कळ मोठ्या प्रमाणात आढळतात, तेथेच फक्त धाग्याचे उत्पादन व्यापारी दृष्ट्या सोयीचे असते.

छाट कलमे किंवा रोपे तयार करून यांची लागवड करतात. दोन रोपांत सु.१ मी. अंतर ठेवल्यास वाढ चांगली होते. शोभेकरिताही बागेत लावतात; याला क्लॅपर्टोनिया फिसिफोलिया हे दुसरे शास्त्रीय नाव आहे. बोलो-बोलो, नापुंटी, न्बुम्बिसी, बेकोन्गे इ. स्थानिक नावांनी ते ओळखले जाते.

आफ्रिकेतील प्रयोगान्ती असे आढळले आहे की, या वनस्पतींतील धागा वनभेंडीपेक्षा (→भेंडी) चांगला व  अंबाडीपेक्षा स्वस्त आणि तागा (ज्यूट) ऐवजी वापरण्यास योग्य असतो; त्याची लांबी सु. ०·९–३मी. असून तागापेक्षा तो अधिक बळकट व तलम असतो; तथापि त्याचे व्यापारी प्रमाणावर उत्पादन लागवडीचा खर्च, धाग्याचा उतारा व प्रत यांवर अवलंबून असल्याने फारसे यशस्वी झाल्याचा उल्लेख नाही. भारतात अद्याप हा वृक्ष आढळल्याचा उल्लेख नाही.

 

संदर्भ : 1. Kirby, R.H. Vegetable Fibres, New York, 1963.

2. MacMillan, H.F. Tropical Planting and Gardening, London, 1956.

लेखक - वासंती रा. चिन्मुळगुंद

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate