অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्युनिकेसी

प्युनिकेसी

(ग्रॅनेटेसी; दाडिम कुल). फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, द्विदलिकित) ⇨ मिर्टेलीझ गणातील (जंबुल गणातील) एक लहान कुल. यामध्ये प्युनिका हा एकच वंश अंतर्भूत असून जी. बेंथॅम आणि जे. डी. हुकर यांच्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे पूर्वी ⇨ लिथ्रेसी कुलात (मेंदी कुलात) तो समाविष्ट करण्यात आलेला होता. ह्या वंशात फक्त दोनच जाती (प्युनिका ग्रॅनॅटम = डाळिंब; सं. दाडिम व प्यु. प्रोटोप्युनिका) असून पहिलीचा प्रसार यूरोप ते हिमालयापर्यंत व दुसरीचा सोक्रोत्रात (द. येमेन) आहे. ⇨ डाळिंब फार पूर्वीपासून लागवडीत असून हल्ली उष्ण प्रदेशात त्याचा प्रसार झाला आहे. या कुलातील वनस्पती काष्ठयुक्त व बहुधा काटेरी क्षुपे (झुडपे) किंवा लहान वृक्ष असून त्यांच्या फांद्या शेंड्याकडे काटेरी व शूलाकृती असतात. पाने साधी, समोरासमोर, क्वचित काहीशी एकाआड एक व अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली); फुले द्विलिंगी, नियमित फांद्यांच्या टोकांस एकाकी किंवा पानांच्या बगलेत झुपक्यांनी येतात.

संदले व प्रदले (पाकळ्या) ५—८, सुटी व रंगीत (लालसर, शेंदरी), पाकळ्या कळीमध्ये अनियमितपणे दुमडलेल्या असतात; केसरदले अनेक व पुष्पासनाच्या आतील बाजूस, किंजपुटाच्या वरच्या पातळीत चिकटलेली; किंजदले अनेक, जुळलेली; किंजपुटपुष्पासनास चिकटलेला, अधःस्थ व अनेक कप्प्यांचा; बीजकविन्यास (बीजकांची मांडणी) प्रथम अक्षलग्न पण पुढे तटलग्न, एकंदरीत जटिल; बीजके अनेक व अधोमुख [→ फूल]; मृदुफळ रसाळ (दाडिमसम), गोलसर, चिवट सालीचे; फळावर सतत संवर्त असतो; बियांवरचे बाहेरचे आच्छादन रसाळ; बिया अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेल्या) असतात.

 

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate