অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्लवक

प्लवकप्लॅक्टन). समुद्र, तलाव, नद्या, नाले, ओढे इ. अतिशय खारट ते गोड अशा सर्व प्रकारच्या जलाशयांतील प्राण्यांच्या भिन्न थरांत राहून प्रवाहाच्या गतीबरोबर वाहत जाणाऱ्या वनस्पती व प्राणी यांच्या समूहांना ‘प्लवक’ म्हणतात. याउलट कित्येक प्राणी व काही थोड्या वनस्पती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किंवा संथ पाण्यात पोहत जाऊ शकतात, त्यांना ⇨तरणक (नेक्टन) म्हणतात. काही सजीव मात्र तळाशीच स्थिर राहतात किंवा तळावर सरकू शकतात, त्यांना ‘नितलवासी’ म्हणतात [→ नितल जीवसमूह]. प्लवकातील सजीव सर्वसाधारणपणे आकारमानाने सूक्ष्म असून त्यांनी स्वतःची अशी गती नसते. तथापि ⇨जेलीफिश व ⇨ ट्युनिकेटा उपसंघातील थॅलिॲसिया वर्गातील पायरोसोमा वंशाचे प्राणी यांसारख्या मोठ्या व शरीरापासून निघालेले प्रकेसल [चाबकाच्या दोरीसारख्या, लांब, नाजूक व बारीक जीवद्रव्यीय संरचना म्हणजे कशाभिका; → कशाभिका] असल्यामुळे मंद गती असलेल्या काही जलचरांचाही, प्लवकाच्या व्याख्येत ते बसत असल्याने, यात समावेश केला जातो. डोळ्यांना सहज दिसतील इतक्या मोठ्या प्लवक-जातींखेरीज त्यांचे फारसे प्रकार १८४५ पर्यंत माहीत नव्हते; परंतु १९७२-७६ या काळात केलेल्या समुद्री अन्वेषणात (संशोधनात) त्यांच्या अनेक बारीक-सारीक जाती व प्रकार यांचा शोध लागला. १८८९ मध्ये व्हिक्टोर हेन्झेन यांनी एक प्लवक-मोहीम काढली व त्यानंतर प्लवकांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासास सुरुवात झाली. ‘प्लँक्टन’ ही शास्त्रीय संज्ञा त्यांनीच प्रथम उपयोगात आणली.

स्थलवासीप्रमाणेच जलवासींचेही जीवन सूर्यप्रकाशावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असते. कार्बन डाय-ऑक्साइड वा वायूबरोबरच काही लवणेही पाण्यात विरघळलेली असतात. त्यांचा उपयोग करून वनस्पति-प्लवकातील घटकांत असलेल्या ⇨ हरितद्रव्यामुळे प्रकाशसंश्लेषण (सूर्यप्रकाशात पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांच्यापासून हरितद्रव्याच्या मदतीने केली जाणारी अन्ननिर्मिती) घडून येते व त्याचा त्यांना स्वतः च्या वाढीसाठी उपयोग करून घेता येतो. त्याकरिता वनस्पति-प्लवक हे साधारणतः सूर्यकिरण पाण्यात जितके खोलवर पोहोचू शकतील तितक्या खोलीवर मोठ्या संख्यने तरंगत असतात. आवश्यक ती लवणे, वायू, प्रकाश व तापमान उपलब्ध असेल त्या वेळी तर वनस्पति-प्लवकांची इतकी बेसुमार वाढ होते की, त्यामुळे पाणी गढूळ किंवा हिरवट रंगाचे दिसते [→ शैवले]. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश जसजसा प्रखर होऊ लागतो तसतसे वरच्या प्रकाशित भागात असलेले वनस्पति-प्लवक विभाजनाने वाढून अधिक खोलवर जाऊ लागतात. ढोबळपणे हे वनस्पति-प्लवक प्राण्यांचे खाद्य असून प्राणि-प्लवक हे माशांचे खाद्य आहे. काही मासे त्यांच्या जीवनात प्रथम सागरी वनस्पती व वनस्पती-प्लवक आणि जसजसे ते वाढतात तसतसे प्राणि-प्लवक व इतर जलचर यांवर निर्वाह करतात. काही मासे मात्र सर्व आयुष्यभर वनस्पति-प्लवकावरच जगतात. पाण्यातील जीवन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या प्लवकांवरच अवलंबून असल्याने हा एक गट फार महत्त्वाचा मानला जातो.

वनस्पति-प्लवक

प्लवकामध्ये प्राणि-कोटीतील माशांपेक्षा खालच्या दर्जातील बऱ्याच प्रकारचे जलचर येत असले, तरी वनस्पतींपैकी मुख्यतः शैवलेच प्रामुख्याने दिसून येतात. हिरवट तपकिरी रंगाच्या करंडक वनस्पती [→ डायाटम ] हा वनस्पति-प्लवकांचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा एककोशिक (सर्व शरीर एकाच पेशीचे बनलेल्या) वनस्पतींचा गट असून त्यांना सिलिकायुक्त पारदर्शक कवच असते. डोळ्यांना सहज दिसतील (उदा., ऱ्हायझोसोलेनिया) इतक्या मोठ्या आकारमानापासून तो अतिशय सूक्ष्म (उदा., निट्‌शिया) अशा सर्व आकारमानांत ते सापडतात. हे साधारणतः स्वतंत्रपणे जगत असले, तरी काही (उदा., कीटोसेरॉस, थॅलँसिओसिरा) एकमेंकाना जोडून साखळी करून सामूहिक जीवन घालवितात. ह्या करंडक वनस्पती मेल्यावर त्यांची सिलिकायुक्त कवचे पाण्याच्या तळाशी साठून मोठाले थर निर्माण झालेले काही ठिकाणी दिसून आले आहेत[→ डायाटमी माती].

बराच काळ करंडक वनस्पती हाच गट प्रामुख्याने जलचरांचे खाद्य आहे, असा गैरसमज होता; परंतु आता याहीपेक्षा संख्यने अधिकअसलेल्या इतर काही शैवलांचे सूक्ष्म प्रकारसुद्धा (डायनोफ्लॅजेलेटा, क्रिसोफायटा इ.) जलचरांचे एक खाद्य असल्याचे दिसून आले आहे. ह्या प्लवकातील वनस्पती एककोशिक असून त्यांत सिरेशियम, पेरिडिनियम व प्रोरोसेंट्रम वगैरे तपकिरी रंगाचे, स्वयंप्रकाशित व दोन प्रकेसले असलेल्या प्रकारांचाही समावेश होतो. या प्रकेसलांद्वारे त्यांना स्वतःची अशी गती मिळविता येते. अतिसूक्ष्म असे अन्नाचे कण खाऊन पाण्याचे तापमान कमीजास्त होईल त्याप्रमाणे ते आपल्या आकारमानात बदल करू शकतात. प्लवकांतील हिरव्या वनस्पतींनाही दोन प्रकेसले असून त्यांच्या साहाय्याने त्यांना गती मिळू शकते. यांशिवाय बाकीच्यांच्या बाबतीत जमिनीवरील वनस्पतिप्रमाणेच त्यांचे जीवनकार्य चालू असते. हिरवे वनस्पति-प्लवक [फायटोफ्लॅजेलेटा;→ प्रोटोझोआ] हे बहुशः स्वतंत्रपणे विहार करीत असले, तरी काही (उदा., फिओसिस्टिस) प्रकार सामूहिक रीत्या बुळबुळीत पदार्थांच्या पुंजक्यात राहतात. नील हरित शैवलांपैकी एक लाल प्रकार (ट्रायकोडेस्मियम एरिथ्रियम) तांबड्या समुद्रात सापडतो.पाँटोस्फीरा व डिस्टेफॅनस यांचाही अंतर्भाव वनस्पति-प्लवकांत होतो, ते क्रिसोफायटा शैवलांपैकी आहेत. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या प्लवक वनस्पतीत अॅनाबीना, नॉस्टॉक, मायक्रोसिस्टिस इ. नील हरित शैवले आणि व्हॉल्व्हॉक्स, पेडिअॅस्टम व क्लॅमिडोमोनस इ. हरित शैवले यांचा समावेश करतात[→ शैवले].

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate