অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बीच

बीच

बीच : (कुल - फॅगेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील, फॅगस या वंशातील प्रसिद्ध वृक्षांचे इंग्रजी नाव. ह्या वृक्षांच्या पातळ लाकडी फलकांचा उपयोग पूर्वी लेखनाकरिता केला जात असल्याने ‘पुस्तक’ या अर्थाचे बीच हे नाव पडले आहे. हे सर्व शोभिवंत व पानझडी वृक्ष मूळचे उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशातील असून यांच्या सु. दहा जाती व कित्येक उद्यान प्रकार उपलब्ध झाले आहेत. शोभेकरिता, तसेच लाकूड आणि फळे यांकरिता ही झाडे लावतात.

सामान्य वा यूरोपीय बीच (फॅगस सिल्व्हॅटिका) हा महत्त्वाचा व मूळचा इंग्लंडमधील वनवृक्ष द. नॉर्वे व स्वीडन ते भूमध्यसामुद्रिक प्रदेश, रशिया व आशिया मायनर, इराण व स्विस आल्प्समध्ये १,५५० मी. उंचीपर्यंत, भारत (कुलू व निलगिरी इ.) ठिकाणी आढळतो. याची उंची सु. २४ - ३१ मी. व घेर १.८ मी. आणि साल गुळगुळीत व करडी असते. पाने ५ - ९ सेंमी. लांब, साधी, लंबगोल, सोपपर्ण (तळाशी खवल्यासारखी लहान उपांग असलेली), एकाआड एक, चकचकीत व दातेरी; हिवाळी कळ्या लांबट व तपकिरी भुऱ्या; पुं - पुष्पे अनेक व लोंबत्या कुंठित (मर्यादित) दाट फुलोऱ्यांवर [⟶ पुष्पबंध] आणि स्त्री-पुष्पे जोडीने (परंतु दोन्ही प्रकारची फुले एकाच झाडावर) असून त्यासभोवार चार छदकांच्या मंडलाचा एकच पेला (चषिका) असतो; प्रत्येक स्त्री - पुष्पात परिदले सहा व किंजदले तीन असून किंजपुट अधःस्थ असतो; शिवाय दोन्ही स्त्री - पुष्पांभोवती मिळून पाच छदे (चार मोठी व एक बाहेरचे लहान) असतात [⟶ फूल]. चषिकांसह बनलेल्या संरचनेस सामान्यतः फळ म्हणतात; ते कठीण, शुष्क व बोंडासारखे दिसते व तडकल्यावर बाहेरची काटेरी चषिका उघडून तिच्यातील त्रिकोनी, तपकिरी व कठीण सालीची दोन एकबीजी खरी फळे [कपाली; ⟶ फळ] सुटी होतात. बिया अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेल्या); इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ फॅगेसीत (वंजू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. एकेकाळी फळे (बक वा बीचमास्ट) इंग्‍लंडमध्ये कपडे धुण्यास वापरीत व दुष्काळात त्यांचा अन्नासारखा उपयोग करीत. याच्या बिया खाद्य व गोड असून त्यांत १५ — २०% पिवळे, गोड व चिकट तेल असते; यूरोपात, तेल दिव्यात, स्वयंपाकात व साबणाकरिता वापरतात. बियांची पेंड कोंबड्या व डुकरे यांना खाऊ घालतात. फ्रान्समध्ये तितर पक्ष्यांना फळे खाऊ घालतात; तसेच तेलाचा उपयोग लोण्याऐवजी करतात. कच्ची फळे विषारी असल्याने भाजून किंवा शिजवून उपयोग करतात. कच्चेपणी त्यांत सॅपोनीन असते. या वृक्षांचे लाकूड फिकट तपकिरी असून मध्यम कठीण, बळकट व जड असते. यूरोपात व अमेरिकेत सजावटी सामान, हत्यारे, खेळणी, यंत्रांचे भाग, बुटांचे ठोकळे, कागद, धागे, जळण इत्यादींकरिता लाकूड वापरतात. लाकडातील डांबरापासून कफोत्सारक, जंतुनाशक व वेदनाहारक काष्ठतेल (क्रिओसोट) काढतात. जुनाट खोकला, वांत्या व मळमळ यांवरही ते उपयुक्त असते. इमारती टिकविण्यासाठी ते वापरतात. यूरोपीय बीचचे वीपिंग बीच (प्रकार पेंड्यूला), ब्राँझ किंवा कॉपर बीच (प्रकारअ‍ॅट्रोप्युनिसिया) व खंडित पानांचा कटलीफ बीच (प्रकार लॅसिनिअ‍ॅटा) हे प्रकार शोभेकरिता लावले जातात.

अमेरिकी बीच (फॅ. अमेरिकाना) चे लाकूड तक्ते, नवलपूर्ण कोरीव व कातीव वस्तू आणि सजावटी सामान इत्यादींकरिता वापरात असून त्यापासून कोळसा, मद्यार्क, लाइम अ‍ॅसिटेट वगैरेंचे उत्पादनही होते. ह्या वृक्षांचा प्रसार न्यू ब्रन्सविक ते मिनेसोटा, फ्लॉरिडा व टेक्ससमध्ये आहे. प्युबिसेन्स, कॅरोलिनियाना व पेरूजिनिया यांसारखे त्यांचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत.

अंटार्क्टिक बीच नोथोफॅगस वंशातील असून त्याच्या १७ जातींचा प्रसार ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व द. अमेरिका येथे झालेला आहे. फॅ. जॅपोनिका व फॅ. सीबोल्डी हे जपानी प्रकार प. गोलार्धात शोभेकरिता लावले जातात व जपानमध्ये त्यांच्या लाकडाचे विविध उपयोग करतात. फॅ. सायनेन्सिस ह्या चिनी जातीचे लाकूड नावा, नांगर, हत्यारांचे दांडे इत्यादींकरिता वापरतात. (चित्रपत्र ६०).

 

संदर्भ : Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

लेखक: ज. वि. जमदाडे,

शं. आ.परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate