অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बीजी नेचे

बीजी नेचे

बीजी नेचे(इ. सीड-फर्न्‌सलॅ. टेरिडोस्पर्मी, सायकॅडो-फिलिकेलीझ).नेचे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या घटकांनी युक्त असलेल्या) वनस्पती-सारख्या पण मोठ्या व संयुक्त पानांवर बीजे धारण करणाऱ्या विलुप्त (विद्यमान नसलेल्या) वनस्पतींचा गण. ह्या गणातील वनस्पतींची बीजे उघडी (प्रकट) असल्यामुळे सर्व वनस्पतींच्या वर्गीकरणात त्यांचा अंतर्भाव प्रकटबीज वनस्पतींत केला जातो. पूर्व नेचे व बीजी वनस्पतींचा काही संबंध असावा असे म्हणण्यास प्रत्यक्ष पुरावा नव्हता परंतु नेचासारख्या पानांवर⇨ सायकससारख्या वनस्पतींच्या [सायकॅडांच्या; ⟶ सायकॅडेलीझ] बियांसारखी प्रारंभिक प्रकारची बीजे ह्या वनस्पतींत आढळल्यामुळे नेचे व काही बीजधारी वनस्पती यांचा संबंध असावा, असा अंदाज व्यक्त केला गेला. आकारवैज्ञानिक दृष्ट्या (सजीवांच्या कार्याऐवजी त्यांची संरचना व आकार यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या दृष्ट्या) बीजी नेचांचे स्थान नेचे व सायकॅडे यांच्या मधे असावे, असे कित्येक शास्त्रज्ञ मानतात. १८७७ मध्ये ग्रँड यूरी या शास्त्रज्ञांनी नंतर ज्यांना म्येलोझायलॉन असे नाव दिले गेले त्या वनस्पतींचे जीवाश्म (शिलारूप अवशेष) अभ्यासले; तथापि त्यांचा नेचे आणि सायकॅडे यांच्याशी असलेला संबंध १८८७ मध्ये डब्ल्यू. सी. विल्यमसन यांनी दाखवून दिला. १८७७ — ९९ पर्यंतच्या काळात बीजांशिवाय इतर अवयवांचे जीवाश्म व त्यांचे नेचाशी व सायकॅडांशी साम्य ओळखून त्यांना ‘सायकॅडोफिलिसिस’ हे नाव एच्. पोटॉनी (१८९९) यांनी दिले व त्यांच्या मते हा गट नेचे व बीजी वनस्पती या दोन्हींमधील संक्रमणावस्था दर्शविणारा असावा. १९०३ मध्ये एफ्. डब्ल्यू. ऑलिव्हर व डी. एच्. स्कॉट ह्यांनी सध्या या गणात समाविष्ट केलेल्या एका वंशातील वनस्पतींच्या सुट्या बियांचे (लॅजिनो-स्टोमा लोमॅक्सी) व खोडांचे (लायजिनॉप्टेरीस ओल्डमिया) जीवाश्म यांचे साम्य दर्शविणारी लक्षणे लक्षात घेऊन, त्यांचा निकट संबंध ओळखला आणि ह्या वनस्पतींना ‘टेरिडोस्पर्मी’ हे सार्थ नाव दिले; १९०४ मध्ये रॉबर्ट किड्स्टन यांनीन्यूरॉप्टेरीस हेटेरोफायलाच्या बीजधारी पानांचे वर्णन देऊन ऑलिव्हर व स्कॉट यांच्या शोधाला आधार दिला. पुढे १९३० मध्ये वर आधी उल्लेख केलेल्या वंशाची पाने व बिया परस्परांस चिकटलेली असे जीवाश्म आढळले.

ह्या विलुप्त गणाचे फक्त जीवाश्म आढळतात. पुराजीव महाकल्पातील डेव्होनियन कल्पापासून ते मध्यजीव महाकल्पातील जुरासिक कल्पाच्या मध्यापर्यंतच्या म्हणजे सु. ४० कोटी वर्षांपूर्वीपासून (जास्तीत जास्त २६ कोटी वर्षांपूर्वीपासून) ते १७.५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात पृथ्वीवरच्या वनश्रीत बीजी नेचे समाविष्ट होते. भारतातील गोंडवनी खडकांत त्यांचे जीवाश्म आढळतात. कित्येक वंशांत [मेड्युलोजा; (आ. १)] हल्लीच्या ⇨ वृक्षी नेचांप्रमाणे सरळ वाढण्याइतके सबल खोड असावे, तर अनेक वंशांत दुर्बलत्वामुळे जवळच्या सबलांचा आधार घेणारे खोड असावे, कारण त्यांच्या खोडात आधार-ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे — पेशींचे — समूह) फार कमी आढळतात. बहुतेकांच्या खोडांवर फांद्यांचा अभाव असून ती खोडे ३ — ६ मी. उंच होती व त्यांचा व्यास सु. २० सेंमी. होता. खोडांच्या टोकांस मोठ्या व सु. १ — १.५५ मी. लांब, संयुक्त पानांचा झुबका व तळाशी अनेक बारीक आगंतुक मुळे होती. पर्णविन्यास सर्पिल (पाने एकाआड एक) होता. ह्या गणात तीन कुलांचा तात्पुरता समावेश केलेला आढळतो : (१) मेड्युलोजेसी, (२) लायजिनॉप्टेरिडेसी आणि (३) कॅलॅमोपिटिएसी; ह्यांपैकी पहिल्या दोन कुलांतील जातींची बरीच माहिती उपलब्ध आहे. अलीकडे एच्. अँड्रूज यांनी ‘टेरिडोस्पर्मोफायटा’ ह्या नवीन विभागवाचक नावाचा पुरस्कार केला असून त्यामध्ये एकूण चार कुले अंतर्भूत केली आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate