অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेलपटा

बेलपटा

बेलपटा: (बेलपठा; हिं. चेल्वा; क. बेलिपटा;इं. कोस्ट कॉटन ट्री, यलो मॅलो ट्री; लॅ. हिबिस्कस टिलीएसिस ; कुल-माल्व्हेसी). सुमारे ९ मी. उंचीचा व अनेक फांद्यांचा हा सदापर्णी वृक्ष अंदमान बेटे, भारतीय द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूंच्या किनारपट्‌ट्या, (बंगाल-सुंदरबन,कोकण,कारवारचा समुद्रकिनारा, नद्यांच्या मुखाजवळचा किनारा) इ. ठिकाणी आढळतो. कोवळे भाग लवदार, पाने साधी, एकाआड एक, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), गोलसर, हृदयाकृती, अखंड किंवा थोडीफार खंडीत, दातेरी व चिवट; फुले मोठी, ५-८ सेंमी. व्यासाची पिवळी मध्ये तळाशी किरमीजी असुन ती विशेषतः जानेवारीत पण वर्षातुन अनेकवेहा तुरळकपणे येतात; ती सकाळी पिवळी व सायंकाळी (कोमेजल्यावर) लाल दिसतात. अपिसंवर्त ७-१४ छदकांचा, साधारण संवर्ताइतका; सवर्त आणि पुष्पमुकुट साधारण घंटेसारखे; पाकळ्या जुळलेल्या व संदलांपेक्षा फार मोठ्या; किंजले ५ व तळाशी एकत्र जुळलेली [→फुल] बोंड (फळ) लहान, पंचकोणी, टोकदार, केसाळ असून ते तडकल्यावर पाच शकले होतात; त्यात १० कप्पे असतात; त्याभोवती संवर्ताचे वेष्टन असते. फळे मार्च ते एप्रिलमध्ये येतात. बह्या काळ्या व मूत्रपपिंडाकृती. इतर सामान्य लक्षणे ⇨माल्व्हेसीत (भेंडी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

सालीपासून मिळणाऱ्या मजबूत धाग्याचे बंगालमध्ये दोर व दोरखंडे बनवितात. डांबराच्या लेपामुळे ती दोरखंडे अधिक  बळकट व टिकाऊ

बेलपटा: (1) फुलाफळासह फांदी, (2) उघडलेले फूल (पाकळ्या व केसरमंडल यांशिवाय), (3) केसर मंडल, (4) केसरदल, (5) तडकलेले फळ, (6) किंजपुटाचा आडवा छेद, (7) फळाचे शकल, (8) बी.

बनतात. हे दोर जहाजांची शिडे, कोळ्यांची जाळी, जाड्याभरड्या पिशव्या यांकरिता वापरतात. तागापेक्षा हा धागा पाण्याच्या संपर्कात अधिक टिकून राहतो. या वृक्षाचे लाकूड भुरे, हलके, नरम व लवचिक असून ते खाऱ्या पाण्यात टिकून राहते. याच्या फळ्या काढतात व त्या हलक्या नावांकरिता वापरतात. तराफे, तरंड, घरगुती अवजारे, गाड्या, कुऱ्हाडीचे दांडे, फरशी, तावदान, जळण इ. करीता लाकूड उपयोगात आहे. शोभेकरीता ही झाडे बागेत लावतात; जमिनीचा धूप थांबविण्यासही  लागवड केलेली आढळते. पाने गुरांना खाऊ घालतात. पानांचा फांट [विशिष्ट प्रकारे तयार केलेला काढा; →औषधिकल्प] जख मा व व्रण धुण्यास वापरतात. ब्राझिलमध्ये बियांचा काढा वांतिकारक म्हणून देतात. पाने सारक व शोथनाशक (दाहयुक्त सुज कमी करणारी); मुळांचा उपयोग कटिशूल व संधिवात यांवर करतात. मुळे ज्वरनाशक, स्वेदकारक (घाम आणणारी), वेदनाहारक, सौम्य विरेचक, मूत्रल (लघवी साफ करणारी) असून ती मर्दनलेपात वापरतात. फुले दुधात शिजवून कानदुखीवर वापरतात. साल वांतीकारक; ताज्या सालीचा बुळबुहीत चीक आमाशांवर देतात.

 

संदर्भ : C.S.I.R. The Wealth of India,  Raw Materials; Vol.V . New Delhi, 1959.

लेखक - गो. वि जोशी / शं., आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate