অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मलायी पदौक

मलायी पदौक : (नारा; लॅ. टेरोकार्पस इंडिकस विल्ड; कुल-लेग्युमिनोजी). फुलझाडांपैकी वनस्पती, आवृतबीज उपविभाग] हा एक मोठा (सु ३६ मी. उंच व ३.६ मी. घेर असलेला) वृक्ष मूळचा मलायातील असून अंदमान, प. बंगाल, तमिळनाडू व महाराष्ट्र येथे रस्त्यांच्या दुतर्फा व उद्यानांतून लावलेला आढळतो. त्याला तळाशी आधारमुळे असतात. हा बिबळा व रक्तचंदन चंदन यांच्या टेरोकार्पस याच वंशातील असल्याने कित्येक लक्षणांत याचे त्यांच्याशी साम्य आढळते. खाली वर्णन केलेल्या ‘अंदमान पदौक’ वृक्षाशीही याचे साम्य आहे. तथापि याची काही लक्षणे भिन्न आहेत. कधीकधी बिबळा, रक्तचंदन यांचे कानडी नाव ‘होन्ने’ (व्हन्ने) मलायी पदौकलाही वापरलेले आढळते. त्यामुळे गोंधळ टाळण्यास ह्या तिन्ही जातींना भिन्न नावे दिली आहेत.

मलायी पदौक

याची पाने एकाआड एक, संयुक्त विषमदली पिसासारखी असून ५−९ दलेही एकाआड एक असतात; ती अंडाकृती, टोकास गोलसर असून त्यांतील शिरा ठळक नसतात; फुलोरा परिमंजरी; पुष्पबंध] पानांच्या बगलेत असून फुले लहान व पिवळी असतात. शिंबाफळे (शेंगा) गोलसर, पातळ व सपाट (सपक्ष) आणि त्यांची टोके किंजलाजवळ फूल गोलसर असतात; बी एकच असते. याची इतर सामान्य लक्षणे लेग्युमिनोजीमध्ये (शिंबावंत कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

ह्या वृक्षाला खोल, निचऱ्याची जमीन व उष्ण कटिबंधीय हवामान आवश्यक असते; वार्षिक पर्जन्य सु. १५० सेंमी. असावा लागतो. बिया किंवा छाटकलमे लावून नवीन लागवड करतात; हा फार जलद वाढतो. वनरोपण व शोभा यांकरिता हा फार उपयुक्त मानला जातो. याचे लाकूड मध्यम प्रतीचे, कठीण जड आणि पिवळट ते लाल असते. यातील काही प्रकारांना चंदनाचा वास येतो. जमिनीशी संपर्क आल्यास लाकूड टिकत नाही. रंधून व घासून ते उत्तम गुळगुळीत होते. ते सजावटी सामान व पेट्या-कपाटांस उपयुक्त असते. फिलिपीन्समध्ये त्यापासून काढलेल्या लाल रंगाचा वापर करून इतर फिकट लाकडांना रंग देतात. नारीन, सँटलीन व अँगोलेन्सिन ही यातील लाल द्रव्ये होत. लाकडाचा काढा मुतखड्यावर देतात. सालीपासून ‘कीनो’ (डिंक) मिळतो. कीनोचा वापर जखमांवर लावण्यास करतात; सालीचा किंवा कीनोचा काढा मुखापन व अतिसारावर देतात. बियांमुळे ओकारी होते. पानांचा फांट विशिष्ट प्रकारे बनविलेला काढा; औषधिकल्प केस धुण्यास वापरतात. पानांचा चुरा पित्ताने होणाऱ्या डोकेदुखीवर वापरतात. कोवळा  पाला व फुले खातात.

अंदमान पदौक

(अंदमान रेडवुड, पदौक, बर्मीज रोजवुड; लॅ. टे.दाल्बर्जिऑइडिस, टे. इंडिकस बेकर; कुल-लेग्युमिनोजी). हा मोठा अर्धवट पानझडी वृक्ष सु. ४५ मी. उंच व ५.५ मी. घेराचा असून फक्त अंदमानातच आढळतो; पं बंगालमध्ये व द. भारतात हा कोठे कोठे लावलेला आढळतो. ह्याला तळाशी काही आधारमुळे असून त्यावरचा खोडाचा सरळ व शाखाहीन सोटासारखा भाग (स्तंभ) सु. १५ मी. असतो. याला एकाआड एक, संयुक्त विषमदली पाने येतात व त्यांवर ५−९ अंडाकृती-भाल्यासारखी दले असतात; ती टोकाकडे अरुंद होत जातात व त्यांवरच्या शिरा खालून स्पष्ट दिसतात. फांद्यांच्या टोकांस फुलोरे येतात व त्यांवर सोनेरी पिवळी पतंगरूप फुले असतात. शिंबाफळे गोलसर, सपाट, पातळ, सपक्ष आणि न तडकणारी असून टोकांकडे (किंजलाजवळ) खोलगट असतात. बिया १−२, गुळगुळीत व चकचकीत असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे शिंबावंत कुलातील पॅपिलिऑनेटीत (पलाश उपकुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात लेग्युमिनोजी.

डोंगर उतारावरील उत्तम निचऱ्याच्या जमिनीत तो चांगला वाढतो. सुमारे २९५ सेमी. वार्षिक पर्जन्यमान असलेली दमट हवा व भरपूर सूर्यप्रकाश याला मानवतो; हिमतुषार याला सोसत नाहीत. बियांपासून नवीन झाडे वाढविता येतात. ह्या वृक्षांच्या लागवडीत अधून मधून मका व ऊस लावतात त्यामुळे तण फारसे वाढत नाही. याची वाढ मंद असते; सरासरीने दरवर्षी घेर २.८ सेंमी वाढतो. उ. बंगाल व आसाम येथील सपाटीवर असलेल्या आणि डोंगरांच्या पायथ्याशी केलेल्या चहाच्या मळ्यांत याची लागवड जळाऊ लाकडाकरिता करतात. काही कवक (हरितद्रव्य नसलेल्या बुरशीसारख्या वनस्पती) व भुंगे यांपासून याला उपद्रव होते.

याचे बाहेरचे लाकूड (रसकाष्ठ) करडे परंतु मध्यकाष्ठ विविध रंग छटांचे, बळकट, कठीण व जड असते. ते उघड्यावर किंवा सावलीत चांगले टिकते; पण समुद्राच्या पाण्याशी संपर्क आल्यास भोके पाडून पोखरणाऱ्या टेरेडो या प्राण्याचा त्याला उपद्रव होतो. शोभिवंत कामास या लाकडाचा फार उपयोग करतात. कठडे, चौकटी, जहाजांतील खोल्या इत्यादींकरिता ते वापरात आहे. तसेच बिलियर्डची टेबले, पियानो, वाद्ये, विनिमय फलक (काउंटर) व उच्च दर्जाचे सजावटी सामान इत्यादींकरिताही वापरण्यास हे उपयुक्त आहे. पेट्या, कपाटे, कातीवकाम, हत्यारांचे दांडे, तोफगाड्या, दारूगोळ्याच्या पेट्या, नावा, तुळ्या, प्लायवुड, लाकडी पूल इत्यादींसाठीही ते वापरले जाते.

 

संदर्भ : C.S.I.R. The Welth of India, Raw Materiales, Vol. VIII, New Delhi, 1969.

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/12/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate