অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मॅमे ॲपल

मॅमे ॲपल

(लॅ. मॅमिया अमेरिकाना; कुल–गटिफेरी). सुमारे १२–१८ मी. उंच (सु. १ मी. व्यासाचा) सरळ व मंदपणे वाढणारा हा मोठा आणि सुंदर वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजमधला असून आशिया, आफ्रिका व अमेरिका येथील उष्ण भागात त्याचा प्रसार झाला आहे. भारतात व इतर कित्येक देशांत तो लागवडीत आहे. पाने साधी (१०–२०X५–१० सेंमी.), समोरासमोर, दीर्घवृत्ताकृती, चिवट, अखंड, गोल टोकांची, गर्द हिरवी व चकचकीत असतात. फुले पांढरी, सुगंधी, बहुयुतिक, एकेकटी किंवा झुबक्यांनी कोवळ्या प्ररोहांच्या (पल्लवांच्या) बगलेत येतात. [⟶ फूल]. अश्मगर्भी फळ (आठळी फळ) गोलसर ९–१५ सेंमी. व्यासाचे , पिवळट किंवा अंजिरी असून त्यातील नारिंगी, गोडसर व सुगंधी मगजात (गरात) १–४ मोठ्या खरबरीत बिया असतात. फळाची साल चिवट, जाड व कडू असते. कच्च्या फळाची साल कापल्यास तीतून चिकट, पिवळट रस पाझरतो. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरी वा कोकम कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ कच्चे किंवा शिजवून खातात. पक्व फळातील मगज तसाच किंवा साखर घालून खातात; त्याला जरदाळूसारखा स्वाद असतो.त्याचे मुरंबा किंवा तत्सम साठवणीचे पदार्थ बनवितात. फुलांपासून सुगंधी द्रव्य काढतात, ते ‘ओ द क्रेओल’ नावाने ओळखतात; ते फक्त स्वादाकरिता वापरतात. बिया कडू व राळयुक्त असतात; त्यांतील स्थिर तेल सौंदर्यप्रसाधनांत व औषधीद्रव्यांत वापरतात.

झुरळे, डास, पिसवा, उवा, लिखा इत्यादींस बियांतील विष मारक ठरले आहे. पाण्यात काढलेल्या बियांच्या रसाने मनुष्याच्या व इतर प्राण्यांच्या अंगावरील उवा व पिसवा मरतात. बियांची पूड बरीच टिकते व ती तशीच कीटकांवर फवारणे फायद्याचे असते. सालीच्या चूर्णाचा पाण्यात केलेला रस गोचिडांचा नाश करण्यास उपयुक्त ठरला आहे. वेस्ट इंडीजमधल्या लोकांच्या उघड्या पावलांच्या कातडीत शिरून उपद्रव देणाऱ्या पिसवा (टूंगा पेनेट्रान्स) मारण्यास तिखट राळयुक्त डिंकाचा उपयोग होतो. मॅमे ॲपलचे लाकूड तपकिरी, कठीण व टिकाऊ असून त्याला चांगली झिलई होते. घरबांधणी, कपाटे, पेट्या इत्यादींस ते चांगले असते. नवीन लागवड बियांपासून करतात; बिया लागलीच रुजतात. जमीन खोल. सकस व निचऱ्याची असावी लागते. फळे येण्यास सहासात वर्षे लागतात. कलकत्त्यात याची लागवड केली असून त्यांपासून फळांचे पीक भरपूर येते. फळातील (६२%) मगजाचे रासायनिक विश्लेषण करून त्यात पुढील द्रव्ये प्रतिशत आढळली आहेत : जलांश ८६·५, प्रथिन ०·६१, मेद ०·३, कार्बोहायड्रेटे १२·३, धागा १·५,राख ०·३, शिवाय १०० ग्रॅ. मगजात १३ मिग्रॅ. कॅल्शियम, ०·४ मिग्रॅ. लोह तसेच त्यात अ जीवनसत्त्व, रिबोफ्लाविन, थायामीन, निॲसिन, ॲल्कॉर्बिक अग्ल, सायट्रिक अम्ल, सुक्रोज इ. आढळतात.

भारतात आढळणारा ⇨ सुरंगी (गोडी उंडी, पुन्नाग) हा वृक्ष हल्ली ⇨ मॅमिया प्रजातीत घातलेला आढळतो; परंतु त्याचा ऑक्रोकार्पस हा जुना व मॅमिया ह्या नव्या प्रजाती एकत्र गणल्या जाव्यात, असे कित्येक शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यावरून सुरंगीचे (नागकेशर) शास्त्रीय नाव मॅ. लाँगिफोलिया असे आहे. मॅमिया प्रजातीतील भारतातील तिसरी जाती मॅ. सयामेन्सिस (ऑक्रोकार्पस सयामेन्सिस) ही असून ती मूळची ब्रह्मदेश, द. व्हिएटनाम आणि थायलंड येथील आहे; ती भारतात लुशाई टेकड्यांत आढळते. हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष सुरंगीसारखा असून त्याला पांढरी सुगंधी फुले व सु. ३ सेंमी. लांब लंबगोल फळे येतात. फुलांतून व्हायोलेटसारख्या वासाचे सुगंधी व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते. सयामी लोक याच्या फुलांतील परागांचा उपयोग सुगंधी द्रव्यांत (सौंदर्यप्रसाधनांत) करतात. याच्या बियांत ७% तिखट राळ असते. याचे लाकूड मॅमे ॲपल व सुरंगीच्या लाकडांशी तुल्य असते.

 

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

2. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, New York, 1960.

3. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

लेखक - जमदाडे ज. वि. / परांडेकर शं. आ.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate