অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यूफोर्बिएसी

यूफोर्बिएसी

यूफोर्बिएसी : (एरंड कुल). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील यूफोर्बिएलीझ गणात जे. हचिन्सन या शास्त्रज्ञांनी अंतर्भूत केलेल्या ह्या कुलात सु. २८३ प्रजाती व ७,३०० जाती आहेत. एच्‌. हॅलियर यांनी या कुलाचा समावेश पॅशनेलीझ गणात व आर्‌. फोन वेट्श्टाइन आणि ए. बी. रेंडेल यांनी ट्रायकोकी यूफोर्बिएलीझ गणात केला; ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या वर्गीकरण पद्धतीत जिरॅनिएलीझ गणात, तर बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत मोनोक्लॅमिडी (इनकंप्लीटी) गटात (अपूर्ण फुले असलेल्या आठ श्रेणींपैकी एकीत) केला आहे. पॅक्स व होफमान यांनी यूफोर्बिएसी कुलाची चार उपकुले बनविली असून त्यांच्या मते हे कुल प्रारंभिक नसून ऱ्हास पावलेले आहे. जिरॅनिएलीझ व माल्व्हेलीझ माल्व्हेसी या गणांशी यूफोर्बिएलीझ गणाचे आप्तभाव आहेत. पॅक्स यांनी यूफोर्बिएसी कुलाचा उगम जिरॅनिएलीझ किंवा माल्व्हेलीझ गणापासून झाला असावा असे मानले असून त्याला हचिन्सन यांची मान्यता आहे; इतकेच नव्हे, तर हे कुल अनेक स्रोतोद्‌भव (अनेक प्रजाती किंवा उपकुले यांपासून उगम झालेले) असावे, असे ते मानतात.

यूफोर्बिएसीतील वनस्पती चिकाळ चीक, एकत्रलिंगी किंवा विभक्तलिंगी, ओषधी, क्षुपे (झुडुपे), वृक्ष आणि वेली आहेत व त्यांचा प्रसार साधारणपणे सर्वत्र आहे; तथापि त्यांची संख्या उष्ण कटिबंधात अधिक आणि समशीतोष्ण प्रदेशात कमी आहे. अमेरिका आणि आफ्रिका या खंडांतील उष्ण भागांतून त्यांचा इतरत्र प्रसार झाला आहे. काही वनस्पती निवडुंगांसारख्या मांसल व काटेरी असतात कॅक्टेसी. पाने बहुधा एकाआड एक, क्वचित समोरासमोर किंवा वर्तुळाकृती झुबक्यात, साधी, अखंड किंवा कमीजास्त विभागलेली अथवा संयुक्त, बहुधा सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) असून ही उपपर्णे केस, ग्रंथी किंवा काटे असतात. फुले एकलिंगी, अनेक जातींत काही अवयवांचा ऱ्हास असलेली, बहुधा नियमित व मर्यादित फुलोऱ्यावर येतात पुष्पबंध; परिदले (पाकळ्या व त्याखालची संदले) स्पष्ट व पंचभागी किंवा दोन्हींपैकी एक मंडल यांचा अथवा कधी दोन्हींचाही अभाव असतो. फुलोरा कधी पेल्यासारखा असतो. पुं - पुष्पातील केसरदले (पुं - केसर) पाकळ्या असल्यास त्यांच्या इतकी किंवा त्यांच्या दुप्पट, क्वचित फक्त एकच असते, उदा., यूफोर्बिया. ती सुटी किंवा एकत्र जुळलेली (उदा., एरंड) असून त्या सर्वांच्या तळात एक प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) बिंब व मधे कधी कधी वंध्य किंजदल (स्त्री - केसर) असते. स्त्री - पुष्पात वंध्य केसरदले असतातच असे नाही; किंजदले बहुधा ३; किंजपुट ऊर्ध्वस्थ आणि तीन कप्प्यांचा असून बीजके (अपक्वी) अक्षलग्न (मधल्या सूक्ष्म अक्षास चिकटलेली) व प्रत्येक कप्प्यात १ - २, लोंबती व अधोमुख; किंजले ३, सुटी किंवा तळाशी जुळलेली व प्रत्येक पुन्हा विभागलेले; किंजल्क ३ किंवा ६ असतात फूल. फळ बहुधा शुष्क असून ते फुटून त्याचे तडकणारे एक बीजी तीन भाग (फलांश) होतात; कधी ते मृदुफळ किंवा आठळीयुक्त असते. बी सपुष्क (गर्भाभोवती अन्नसाठा असलेले) असते; त्यावर कधी (बीजरंध्राजवळ) ‘नाभिजात’ नावाची संरचना असते बीज.

व्यावहारिक दृष्ट्या ह्या कुलातील वनस्पती महत्त्वाच्या आहेत. रबर (हेविया), एरंड, आवळी, टॅपिओका, रायआवळा, जमालगोटा, शेंड, कुंकुम वृक्ष, जंगली अक्रोड, भोमा, निवडुंग, जट्रोफा पोडॅग्रिका, खाजकोलती, खोकली, गोवर्धन, पानचेटी या स्वतंत्र नोंदी पहाव्यात.

यूफोर्बिएलीझ या गणात (एरंड गणात) यूफोर्बिएसी कुलाखेरीज आणखी चार कुले घातलेली असून तो एक नैसर्गिक गट मानला आहे. एकलिंगता, एकमंडलित परिदले (परिदलाचे एक मंडल असणे) व बीजकावर औदर पार्श्वरेषा ही प्रमुख वैशिष्ट्ये त्यात आढळतात. यांपैकी एकलिंगता द्विलिंगी पूर्वभागातून आलेली असून ऱ्हसित अवस्थेत आढळते. फुले कधीकधी द्विलिंगी, तसेच कित्येकांत फुले परिदलहीन आणि काहींत परिदलाची दोन मंडले असतात. किंजमंडल तीन ऊर्ध्वस्थ किंजदलांचे असून अधोमुखी व नत बीजकांची समान संख्या कायम असते. इतर लक्षणे वर वर्णन केल्याप्रमाणे असतात.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Mitra, J. N. Systematic botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate