অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानलिंबू

रानलिंबू

रानलिंबू : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) फळाचा आडवा छेद, (५) बी.

रानलिंबू : (जंगली वा काळी मिरची, लिमडी; हिं. कांज, देहान; क. कडु मेनासू, मासिमुल्लू; सं. कंचना, दहान; इं. लोपेझ रूट ट्री, फॉरेस्ट पेपर, वाइल्ड ऑरेंज ट्री; लॅ. टोडॅलिया अ‍ॅक्युलियाटा; टो. एशिअ‍ॅटिका; कुल-रूटेसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग सु. १५ मी. उंचीचे व सु. १० सेंमी घेर असलेले हे काटेरी व सदापर्णी आरोही (वर चढणारे) झुडूप भारतात सर्वत्र मोसमी जंगलात आढळते; शिवाय श्रीलंका, सुमात्रा, जावा, चीन, फिलिपीन्स व उष्ण कटिबंधीय आफ्रिका येथही आढळते. दक्षिण भारतात निलगिरी व पळणी टेकड्यांत आणि ओरिसातील खुरट्या जंगलात हे सामान्यपणे आढळते. पाने एकाआड एक, संयुक्त व त्रिदली (तीन दले अथवा सुटे भाग असलेली) असतात. दले दातेरी, बिनदेठाची, आयत, चिवट, गर्द हिरवी (५ –१० X १·८ –३·८ सेंमी.) व चकचकीत असून काटे वाकडे व लहान असतात.

फुले एकलिंगी, पिवळट पांढरी, पानांच्या बगलेत वल्लरी प्रकारच्या फुलोऱ्यावर पुष्पबंध सप्टेंबर ते ऑक्टोबरात येतात. पुं-पुष्पाच्या कळ्या गोलसर असून स्त्री-पुष्पाच्या कळ्या लांबट असतात. काही फुले द्विलिंगी असतात. मृदु फळ गोलसर, मोठ्या वाटाण्याएवढे व नारिंगी रंगाचे असून सालीवर ३ – ५ उभ्या, उथळ व असंख्य बारीक खाचा असतात. फळात गुळगुळीत, मूत्रपिंडासारख्या ३ –७ बिया असतात. फळ काळ्या मिरीइतके तिखट असून त्यांचे लोणचे घालतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे रुटेसी अथवा सताप कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वनस्पतीची कुंपणे करतात. मुळांपासून पिवळा रंग काढतात; त्यात विषारी राळ असते. पाने व मुळे यांपासून टोडॅलिन नावाचे अल्कलॉइड मिळते; ते विषारी असून हृदयक्रिया मंद करते. मुळांची साल कडू, सुगंधी, शक्तिवर्धक, उत्तेजक, आवर्ती ज्वररोधक (पाळीचा ताप थांबविणारी) असून तापांनंतर झीजभरून काढते. झाडाचे सर्व भाग तापनाशक आहेत; पानांत पिवळट हिरवे बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असून त्यात व मुळाच्या सालीत बरबेरीन हे अल्कलॉइड असते.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol I, New Delhi, 1975.

 

लेखक -  म. वा. ठोंबरे  / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate