অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रिठा

रिठा

रिठा : (सॅपिंडस ट्रायफोलिएटस प्रकार इमार्जिनेटस): (१) पानाफुलांसह फांदी, (२) फूल, (३) फूल (केसरमंजल व किंजमंडल), (४) त्रिखंडी फळ, (५) अर्धे फळ, (६) सॅ. मकोरोसीचे फळ

रिठा : (रिंगिंन, पिठा; हिं. रिठा; गु. अरिठा; क. अंतवला, कुगटेमर; सं. अरिष्ट, फेनिल; इं. सोनपट ट्री ऑफ साउथ इंडिया; लॅ. सॅपिंडस ट्रायफोलिएटस; कुल-सॅपिंडेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति. आवृतबीज उपविभाग] मध्यम आकाराचा पानझडी व सु.१८ मी. उंच व १·५ मी. घेर असलेला वृक्ष. सॅपिंडस या त्याच्या प्रजातीत एकूण १५ जाती असून भारतात त्यांपैकी ७ आढळतात. भारतातील जातींच्या नावाबद्दल आणि त्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जातींच्याबद्ल एकमत नाही. सॅपिडस ट्रायफोलिएटस आणि सॅ. लॉरिफोलियस ही दोन नावे एकाच वनस्पतीची आहेत, असे येथे मानले आहे. भारतात सॅ. इमार्जिनेटस ही एक सामान्य महत्त्वाची जाती आहे, असे ⇨हरमेनगिल्ड सांतापाव यांचे मत आहे. रॅडकोफर यांच्या मते हा सॅ. ट्रायफोलिएटसचा प्रकार आहे.

रिठा मूळचा द. भारतीय असून त्याचा प्रसार समुद्रकिनाऱ्यावर व डोंगरांच्या उतरणीवर खालच्या भागातील विरळ जंगलात झालेला आढळतो. तो शोभेकरिता लावतात आणि प. बंगाल, बिहार, म. प्रदेश आणि उ. प्रदेश येथील खेड्यांत त्याची लागवड करतात. याची साल करडी, चकचकीत असून तीवर खरबरीत व गळून पडणारे खवले असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, समदली, पिसासारखी आणि १२−१३ सेंमी. लांब असून दलांच्या जोड्या २−३ असतात : प्रत्येक दल भाल्यासारखे, लंबगोल किंवा आयत, लांबट टोकाचे अथवा सॅ. इमार्जिनेटस प्रकारात टोकास निम्नमध्य (खाचदार) असते. या वृक्षाला लहान, नियमित, पांढरी द्विलिंगी व एकलिंगी फुले परिमंजरीवर [⟶ पुष्पबंध] ऑक्टोबर ते डिसेंबरात येतात; एकलिंगी फुले संख्येने बरीच असतात. संवर्त तांबूस, लोमश आणि प्रदले केसाळ असतात [⟶ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे कोवळेपणी केसाळ, १·३−२·० व्यासाची आणि २-३ एकत्र जुळलेली असतात; पिकल्यावर ती मऊ व भुरकट होतात आणि वाळल्यावर आतील मगज सालीशी एकरूप होईन ती साल कडक व सुरकुतलेल्या दिसते. बिया २−३, काळपट, कठीण व वाटाण्याएवढा असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सॅपिडेसी कुलात (अरिष्ट कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

रिठ्याची लागवड बिया, फुडवे अथवा मुनवे लावून करतात. रिठा बागेत शोभेकरिताही लावतात. याच्या प्रजातीचे सॅपिंडस हे नाव साबण व भारतीय (इंडियन) या अर्थाच्या लॅटिन शब्दांवरून आले आहे कारण भारतात याचा साबणाप्रमाणे उपयोग करतात. लॉरिफोलियस हे जातिवाचक नाव याची पाने लॉरेलच्या पानांसारखी असल्याने आले आहे. सॅ. मकेरोसी जातीचा प्रसार उत्तम भारतात व आसामात १,५०० मी. उंचीपर्यंत झाला आहे. इतर भागात त्याची फळांसाठी लागवड केलेली आढळते.

रिठ्यांचा म्हणजे फळांचा उपयोग मुख्यतः मलशुद्धीकरिता होतो कारण त्यात सॅपोनीन हे द्रव्य असते. अशा प्रकारे रेशमी, लोकरी व इतर प्रकारचे तलम कापड धुण्यासाठी तसेच सोने, मोती, हिरे व केस स्वच्छ करण्यासाठी रिठे वापरतात. याचे लाकूड जड व कठीण असून ते गाड्या व इतर किरकोळ वस्तूंसाठी वापरतात. मूळ व साल कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), बियांचे तेल औषधी तर फूल पौष्टिक, विषबाधा कमी करणारे, स्तंभक (आकुंचन करणारे), ओकारी आणणारे, रेचक व भोवळ आणणारे असून त्याची पूड तपकिरीप्रमाणे ओढल्यास दमा, उन्माद, अर्धशिशी इत्यादींवर गुणकारी ठरते

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi,

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate