অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रूटेसी

रूटेसी

रूटेसी : (सताप कुल). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींचे एक कुल. याचा अंतर्भाव रूटेलीझमध्ये (सताप गणात) सिमॅरूबेसी (महानिंब कुल), हर्सेरेसी (गुग्गळ कुल) आणि मेलिएसी (निंब कुल) या तीन कुलांबरोबर करतात. ए. एंग्लर व एल्. डील्स यांनी जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) सहा उपगण व एकवीस कुले घातली असून त्यांतील भांड उपगणात (जिरॅनिनीमध्ये) रूटेसी कुल अंतर्भूत केले आहे. सी. ई. बेसी यांच्या वर्गीकरणातही हीच एकवीस कुले याच गणात ठेवली आहेत; परंतु ए. बी. रेंडेल व एच्. हॅलियर यांनी त्या कुलांचा समावेश तीन स्वतंत्र गणांत आणि जे. हचिन्सन यांनी एकूण नऊ गणांत केला आहे. रूटेलीझ आणि जिरॅनिएलीझ यांचे आप्तसंबंध निकटचे आहेत; त्या दोन्हींचा उगम साल्व्हेलीझ गणातून झाला असावा, असे एंग्लर व वेसी यांचे मत आहे. एंग्लर यांनी मेलिएसी, बर्सेरेसी आणि सिमॅरूबेसी ही तिन्ही कुले प्रत्यक्ष झायगोफायलेसीपासून किंवा अप्रत्यक्षपणे रूटेसीद्वारे विकसित झाली असावीत, असा विचार मांडला आहे.

रूटेसी कुलातील वनस्पती क्वचित ओषधीय ओषधि परंतु बहुतेक सर्व झुडुपे किंवा वृक्ष असून त्यांचा प्रसार उष्ण व समशातोष्ण कटिबंधांत आहे. ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका येथील अनेक मरू वनस्पती या कुलातील आहेत. सिट्रस प्रजातीतील वनस्पती इंडो-मलायी व मूळच्या चीनमधील आहेत. स्किम्मिया ही प्रजाती हिमालयातील आहे. रूटेसी कुलात एकूण १०० प्रजाती आणि ८०० जाती आहेत. पाने संयुक्त किंवा साधी असून त्यांतील बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलाचे सूक्ष्म ठिपके (प्रपिंडे) पान उजेडाकडे धरल्यास दिसतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, अरसमात्र (केंद्रातून जाणाऱ्या कोणत्याही उभ्या पातळीने सारखे अर्ध होण्याजोगी), क्वचित एकसमात्र (फक्त एकाच उभ्या पातळीने दोन सारखे अर्ध होण्यासारखी) असून ती कधी एकेकटी व बहुधा मंजरीवर किंवा वल्लरीवर पुष्पबंध येतात.

संदले व प्रदल ४-५, सुटी, फार क्वचित खाली जुळलेली; केसरदले व किंजपुट यांमध्ये वलयासारखे बिंब असते. केसरदले पाकळ्यांइतकी किंवा दुप्पट, कधी अनेक आणि त्यांचे तंतू बहुधा सुटे पण क्वचित जुळलेले, एकत्र किंवा अनेक गटांत व पाकळ्यांसमोर असतात. कधी वंध्य केसरदले आढळतात. किंजदले ४-५ व जुळलेली क्वचित कमी जास्त प्रमाणात सुटी असून किंजपुटात ४-५, क्वचित २-३ कप्पे असतात व प्रत्येक कप्प्यात बहुधा १-२ बीजके असतात फूल. मृदुफळ (लिंबू, संत्री किंवा शुध्क फळ बोंडासारखे किंवा पालभेदी (म्हणजे तुटून तुकडे पडणारे) व बिया सपुष्क किंवा अपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या वा नसलेल्या) असतात.

काही वनस्पतींना रूपांतरित काटे असतात (उदा., लिंबू, बेल इ.); तसेच या कुलातील वनस्पतींत नाशोदभव (काही कोशिकांच्या−पेशींच्या−नाशामुळे बनलेल्या) अथवा मेदोदभव (काही कोशिकांच्या भिंती विभागातून व परस्परांपासून अलग होऊन बनलेल्या) तेलयुक्त पोकळ्या (तैल प्रपिंडे) असतात. अनेक वनस्पती उपयुक्त आहेत; उदा., लिंबू गटातील फळे खाद्य आहेत; सताप सुवासिक व औषधी आहे; तसेच बेल, कवठ, माकडलिंबू, किरमिरा, रान लिंबू इ. औषधी आहेत; कवठ खाद्य असल्याने लागवडूत आहे; तिरफळ व कढी लिंब सवयंपाकात वापरतात; तसेच कुंती शोभेकरिता व सुगंधी फुलांकरिता बागेत लावतात.

 

लेखक - गो. वि. जोशी /  शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate