অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाख वनस्पती

लाखेरी; हिं.खेसरी, कसारी; गु. लांग; सं. सदिका (त्रिपुटी); इं. चिकलिंग-व्हाइट-व्हेच, ग्रास पी; लॅ. लॅथिरस सॅटिव्हस; कुल-लेग्युमिनोजी. फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग वाटाण्याच्या कुलातील व उपकुलातील ही नाजूक वेल मूळची द. यूरोप व प. आशिया येथील असून भारत, इराण, मध्यपूर्व, द. यूरोप व द. अमेरिका येथे पिकविली जाते. एक वर्षायू (एक वर्षभर जगणारे) तण म्हणूनही या वनस्पतीचा भारतभर प्रसार आहे. खोड सु. १. मी. उंच व त्यावर प्रत्येक पेऱ्यावर एक लांबट हिरव्या उपपर्णांची (पानाच्या तळाशी असलेल्या उपांगांची) जोडी व एक संयुक्त पिसासारखे पान असते; पानाच्या टोकाची दोन दले प्रतानरूप (तणाव्यासारखी) व इतर रेषाकृती–भाल्यासारखी असतात.

लाख : (१) फांदी, (२) उपपर्णे, (३) पान, (४) दले, (५) प्रतान, (६) फूल, (७) शिंबा, (८) बिया.
फुले द्विलिंगी एकाकी पानांच्या बगलेत, लालसर, जांभळी, निळी अथवा पांढरी अशा रंगांची भिन्न प्रकारांत आढळतात; फुलाची संरचना पतंगरूप फूल असते (अगस्ता, गोकर्ण इत्यादींप्रमाणे); केसरदले ९ + १ असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) आणि पॅपिलिऑनेटी उपकुलात (पलाश उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे (शिंबा किंवा शेंगा) चपटी २·५–३·८ सेंमी. लांब. काहीशी वाकडी व तडकणारी असून त्यांत ४–५ तपकिरी किंवा पिवळट, बहुधा ठिपकेदार व वाटाण्यापेक्षा लहान साधारण त्रिकोणी बिया असतात. बियांची डाळ खाद्य असून सोयाबीनच्या खालोखाल पौष्टिक आहे; परंतु सतत खाण्यामुळे पायाला असाध्य पक्षाघाताचा विकार जडतो. मनुष्याप्रमाणे जनावरांनाही हा विकार जडतो. होमिओपॅथिक औषधात ही वापरतात; प्लायवुडाचे तक्ते चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोंदात लाखेच्या बियांची पूड वापरतात. बियांचे तेल जहाल विरेचक असते. वनस्पति, विषारी.

लेखक: परांडेकर, शं. आ.

लागवडीचे क्षेत्र

या पिकाची लागवड मुख्यत्वेकरून जनावरांच्या चाऱ्यासाठी केली जाते. ही वनस्पती तणाच्या स्वरूपात भारतात सर्वत्र आढळून येते. चाऱ्याखेरीज डाळीसाठीही हे पीक घेतात; परंतु हे कमी महत्त्वाचे डाळीचे पीक आहे. गरीब लोक लाखी डाळीचा वापर विशेषतः दुष्काळी परिस्थितीत करतात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, मध्य प्रदेश, गुजरातचा मध्यभाग व दख्खनचा काही भाग या प्रदेशांत लाखेची विस्तृत प्रमाणावर लागवड होते. भारतातील द्विदल धान्याखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ४% क्षेत्र या पिकाखाली असून डाळींच्या एकूण उत्पादनापैकी सु. ३% उत्पादन लाखी डाळीचे असते. महाराष्ट्रात मुख्यत: चंद्रपूर, भंडारा व परभणी या जिल्ह्यांत या पिकाची लागवड होते.

जमीन

खोलगट भागातील पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत हे पीक चांगले येते. तसेच भारी काळ्या जमिनीतही हे उत्तम येते. हे रूक्षताविरोधी पीक असल्याने गहू, कापूस, भात व सामान्यपणे वापरात असलेल्या डाळीच्या पिकांसाठी योग्य नसलेल्या हलक्या जमिनीतही वाढते. त्यामुळे हे दुष्काळी प्रदेशातील महत्त्वाचे पीक मानले जाते.

पीक पद्धती

स्वतंत्र अथवा मिश्र पीक म्हणून या पिकाची लागवड करतात. पश्चिम बंगालमध्ये पावसाळा संपण्याच्या सुमारास उभ्या भाताच्या शेतात लाख पेरतात. भाताची कापणी झाल्यावर प्रथम जनावरे चरावयास सोडतात. नंतर जनावरे चारणे बंद करून दाण्यासाठी पीक वाढू देतात. बिहारमध्ये पिकाची पेरणी न करता मागील पिकाच्या शेतात गळलेल्या दाण्यांपासून उगवलेले पीक वाढू देतात. उत्तर भारतात हे गहू, सातू व हरभरा यांच्या बरोबर मिश्र पीक म्हणून घेतात.

हंगाम, मशागत व पेरणी

हे हिवाळी हंगामातील पीक असून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरणी करून फेब्रुवारी-मार्चमध्ये कापणीस येते. पुष्कळ वेळा खरीप हंगामात काही काळ पाण्याखाली असलेल्या जमिनीत हे पीक घेण्यात येते. पावसाळा संपल्यावर २ -३ वेळा जमीन नांगरून बी पाभरीने ओळीत अथवा फोकून पेरतात. त्यासाठी हेक्टरी अनुक्रमे ९ ते ११ किग्रॅ. व ३२ ते ४५ किग्रॅ. बी लागते. मध्य प्रदेशासाठी क्र. ९ व महाराष्ट्राच्या नागपूर विभागासाठी क्र. ११ या सुधारित प्रकारांची शिफारस करण्यात येते.

चांगली मेहनत केलेल्या जमिनीत लाखेचे पीक पसरते व जमीन झाकून टाकते. त्यामुळे तणे वाढत नाहीत; परंतु आपोआप उगवून आलेल्या पिकात अथवा तण काढण्यात दुर्लक्ष झालेल्या पिकात शिंबावंत कुलातील व्हिक्सिया व लॅथिरस या प्रजातींतील अनेक तणे लाखेच्या झाडांबरोबर वाढतात. ही तणे लाखेच्या झाडांपासून वेगळी असून ती सहज ओळखता येतात; परंतु पीक लहान असतानाच ती न काढल्यास पुढे मुख्य पिकास त्यांची गुंतागुंत होते व ती वेगळी करणे फार कठीण असते. यामुळे बाजारात मिळणाऱ्या लाखी डाळीमध्ये शिंबावंत कुलातील तणाच्या डाळीची मिसळ असते. आकटा (व्हिक्सिया सटिव्हा ) नावाच्या तणाच्या बियांतील विषारी घटकामुळे बाजारातील लाखेच्या डाळीच्या वापराने होणारी लॅथिरस रूग्णता होते. शुद्ध लाखेच्या डाळीच्या वापरामुळे ही रूग्णता होत नाही, असे एक मत मांडण्यात आलेले आहे. यासाठी तण काढतेवेळी आकटा काळजीपूर्वक काढणे आवश्यक आहे.

पीक तयार झाल्यावर ( पेरणीनंतर ४–५ महिन्यांनी ) शेंगा तडकण्याच्या अगोदर झाडे कापून घेतात अथवा उपटतात. झाडे ८ दिवस शेतात वाळू दिल्यावर काठीने बडवून दाणे मोकळे करतात.

उत्पादन

पेरणीसाठी हेक्टरी वापरलेल्या बियांच्या प्रमाणात उत्पादन मिळते. १० ते १५ किग्रॅ. बी पेरल्यास हेक्टरी सु. २७० किग्रॅ. दाणे व सु. ३६० किग्रॅ. वाळलेला चारा मिळतो. ४० किग्रॅ. बी पेरल्यास हेक्टरी ८५० किग्रॅ. दाणे व १,२०० किग्रॅ. वाळलेला चारा मिळतो.

व्यापारी प्रकार

बाजारात येणाऱ्या लाख दाण्यांचे आकारमान (लहान, मध्यम व मोठे) आणि त्यांचा रंग (भुरकट, काळा अथवा विविध रंगांचे ठिपके) यांवर आधारित अनेक (सु. ५६) प्रकार ओळखण्यात येतात. १०० दाण्यांचे वजन ७० ते १०८ ग्रॅम असलेल्या लहान दाण्यांना लाखोरी व ११० ते २२५ ग्रँम वजन असलेल्या मोठ्या दाण्यांना ‘लाख’ या नावाने ओळखण्यात येते.

उपयोग

दुष्काळाच्या दिवसांत गरीब लोक लाखेचा रोजच्या आहारात चपाती अगर उसळीच्या रूपात वापर करतात. पेंड आणि मिठाबरोबर मिसळून जनावरांचे पौष्टिक खाद्य तयार करतात. ओला अगर वाळलेला चारा जनावरांना खाऊ घालतात. काही ठिकाणी उभ्या पिकात जनावरे चरावयास सोडतात. हिरवा चारा खाण्यात आल्यामुळे गुराढोरांना अपाय होत नाही; परंतु घोड्यांना हिरवा चारा इतर चाऱ्यात न मिसळता खाऊ घातल्यास त्यांचे सांधे लुळे पडतात.

या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी वापर केला जातो. हेक्टरी ६० किग्रॅ. बी पेरून पिकाचे हिरवळीचे खत केल्यास त्यापासून हेक्टरी सु. ६२ किग्रॅ. नायट्रोजन जमिनीला मिळतो.

या पिकाची लागवड सुलभ व कमी खर्चाची असल्यामुळे त्याच्या डाळीचा इतर डाळींमध्ये (विशेषतः हरभऱ्याच्या व तुरीच्या डाळींमध्ये) मिसळण्यासाठी उपयोग करतात. हरभऱ्याच्या डाळीच्या पिठातही (बेसनात) लाखी डाळीच्या पिठाची भेसळ करण्यात येते.

लॅथिरस रूग्णता

(लॅथिरिझम). लाखी डाळीचा आहारातील एक प्रमुख घटक म्हणून दीर्घ काळ वापर केल्याने मनुष्याला लॅथिरस रूग्णता नावाचा विकार होतो. थोड्या प्रमाणात प्रासंगिक वापर केल्यास त्यापासून अपाय होत नाही. या रोगात कंबरेखालील भाग लुळा पडतो. कंबरेच्या वरील भागावर व सर्वसाधारण प्रकृतीवर परिणाम होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव बहुधा पावसाळी हंगामात आणि आकस्मिक रीत्या होतो. काही वेळा रोगाची सुरूवात इतकी तीव्र नसते. रोग्याला दीर्घ पाठदुखी जाणवते व पायांना १० ते १५ दिवस मुंग्या येतात आणि मग रोगी चालण्यास असमर्थ होतो. लाखी डाळीतील बीटा–अँमिनो प्रोपिओनायट्राइल (बीटा-एन-ऑक्झॅलिल-आल्फा-बीटा-डायअँमिनो प्रोपिऑनिक अम्‍ल अथवा बीटा–एन–ऑक्झॅलिल अ‍ॅमिनो-एल-अ‍ॅलॅनीन) हे विषारी द्रव्य या रोगात मेंदूत निर्माण होणाऱ्या दोषांना कारणीभूत असल्याचे अनेक प्रयोगांवरून दाखविण्यात आलेले आहे. मात्र हे द्रव्य शरीरात कशा प्रकारे कार्य करते हे स्पष्ट झालेले नाही. हा रोग अद्याप असाध्य आहे.

लॅथिरिझम ही संज्ञा आर्नोल्दो कॅंतानी या इटालियन वैद्यांनी १८७४ मध्ये प्रचारात आणली असली, तरी या रोगाची लक्षणे प्राचीन ग्रीकांना माहीत होती, असे दिसते. ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०–३७७) यांच्या लेखनात या लक्षणांचा उल्लेख आहे. इ. स. १५५० मधील आयुर्वेदावरील एका ग्रंथात या रोगाचा ‘कलायखंज’ या नावाने उल्लेख असून त्रिपुटी (त्रिकोणी) डाळ खाण्याच्या त्याच्याशी संबंध जोडलेला आहे. हा रोग ग्रीस, फ्रान्स, जर्मनी, सिरिया, इटली, स्पेन, अ‍ॅबिसिनिया, अल्जिरिया, इथिओपिया, रशिया, भारत, पाकिस्तान व बांगला देश या देशांत आढळलेला आहे. यूरोपीय देशांत लाखेच्या पिकाच्या लागवडीस बंदी घालून या रोगाचे उच्चाटन करण्यात आलेले आहे. इथिओपिया, बांगला देश व भारत या देशांत त्याचे अद्यापही प्राबल्य आहे. बांगला देशातील कुश्तिया, राजशाही व पाबना या जिल्ह्यांत तो प्रदेशनिष्ठ रूपात आढळतो. भारतातील जम्मू व काश्मीर, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र वगैरे राज्यांत तो आढळला आहे.

मध्य प्रदेश (विशेषत: रेवा व सटणा या जिल्ह्यांत), उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत या रोगाचे प्राबल्य सर्वांत मोठ्या प्रमाणावर आहे. स्त्रियांपेक्षा पुरूषांत त्यांचे प्रमाण (१ : १०) जास्त आहे. १९६० पासून लाखी डाळीला बंदी घालण्याचे केंद्र व राज्य सरकारांनी प्रयत्‍न केलेले आहेत. १९६१ मध्ये केंद्रीय आरोग्य खात्याने या डाळीच्या विक्रीवर व व्यापारावर तसेच इतर खाद्यपदार्थात मिसळण्यावर बंदी घातली. १९६३ मध्ये मध्य प्रदेशाने लाखेच्या लागवडीवर आणि त्याच वर्षी उत्तर प्रदेशाने वितरणावर व नंतर लागवडीवर बंदी घातली. तथापि या बंदीची फारशी गंभीरपणे अंमलबजावणी झाली नाही. शेतमजूरांना लाखी डाळीच्या स्वरूपात वेतन देण्याची तेथील जमीनदारांची दीर्घ परंपरा आहे. मध्य प्रदेशातील बंदी उठविण्यात आली व तेथे १९८०–८१ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६,३२,८०० हेक्टर जमीन या पिकाच्या लागवडीखाली होती.

उकड्या तांदळाप्रमाणे लाखी डाळीवर दाबाखालील वाफेची प्रक्रिया केल्यास तिच्यातील ८०% हून अधिक विषारी द्रव्य निघून जाते, असे सांगण्यात येते. तथापि या पद्धतीने विषारी द्रव्य काढून टाकता येत असले, तरी ती गरीब लोकांना परवडणे शक्य होणार नाही. विषारी द्रव्याचे प्रमाण कमी असलेले या वनस्पतीचे प्रकार विकसित करण्याचे प्रयत्‍न करण्यात येत आहेत. इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या पी–२४ या सर्वांत यशस्वी प्रकारात विषारी द्रव्याचे प्रमाण ०·२३% आढळले आहे; परंतु या प्रकाराचे बी कमी उत्पादन देत असल्याने तो प्रचारात आलेला नाही.

 

लेखक -    रा. मो. चौधरी  / वा. ना. जोशी

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials,Vol. VI, New Delhi, 1962.

2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi,1966.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate