অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लेसिथिडेसी

लेसिथिडेसी

(समुद्रफल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतीबीज उपविभाग] एक लहान कुल. याचा अंतर्भाव⇨मिर्टेलीझ (मिर्टिफ्लोरी) अथवा जंबुल गणात ए.एंग्लर, सी. प्रांट्ल. ए. तख्तजान व ए.बी रेंडेल करतात. जी. बेंथॅम व जे.डी. हूकर यांनी हे मिट्रेसी कुलात समाविष्ट केले आहे; जे हचिन्सन यांनी मिर्टेलीझमध्ये घातले आहे; परंतु त्यातील एकूण कुलसंख्या कमी केली आह. या कुलात एकूण वीस प्रजाती व दीडशे जाती (जे.सी विलिस : पंधरा प्रजाती व तीनशे पंचवीस जाती) समाविष्ट केल्या असून त्यांचा प्रसार विशेषतः उष्ण कटिबंधीय अमेरिकेत आहे. भारतात तीन प्रजाती (वॅरिंग्टोनिया. प्लँकोनिया व कॅरिया) व सु. अकरा जाती आढळतात. या कुलातील बहुतेक वनस्पती वृक्ष असून त्यांना साधी उपपर्णहीन (तळाशी उपांगे नसलेली), एकाआड एक, मोठी व फांद्यांच्या टोकांस गर्दीने वाढणारी पाने असतात; त्यांना द्विलिंगी, एकाकी किंवा अकुंठित (दीर्घकाल टोकाकडे वाढत राहणाऱ्या) फुलोऱ्यावर फुले येतात; ती नियमित किंवा परिदलमंडलात एकसमात्र (एका उभ्या पातळीत दोन सारखे भाग होणारी), परिकिंज अथवा अपिकिंज असून पुष्पस्थली व किंजमंडल यांचा संयोग असतो. बिंब संवर्तावर असून ते पाकळ्याखाली असते; शिवाय त्याचा विस्तार केसर मंडलाच्या मध्ये व तळाशीही आढळतो. संदले चार ते सहा व सुटी आणि प्रदले (पाकळ्या) तितकीच पण क्वचित जुळलेली असतात. फळावर संवर्त दीर्घकाल राहतो,परंतु पुष्पमुकुट केसरदलांबरोबर पडून जातो. केसरदले अनेक व तळाशी कमी जास्त प्रमाणात जुळलेली असून परागकोश कळीमध्ये आत वळलेले व चंचल असतात. कधी कधी केसरमंडलाचा आकार ते एकांगीपणे जुळल्याने व काही परागकोश वांझ झाल्याने विचित्र बनतो (उदा., तोफगोळा वृक्ष); काहींत (नॅपोलिओना) केसरदलाचे बाह्यमंडल तोरणास रूपांतरित झालेले आढळते व तेथे पाकळ्या नसतात. बहुधा दोन ते सहा किंवा अधिक किंजदले जुळलेली असून अधःस्थ किंजपुटात तितकेच अनेक कप्पे व प्रत्येकात एक ते अनेक अधोमुखी बीजुके असतात [⟶ फूल]. फळ मृदू किंवा कठीण तडकणारे बोंड किंवा न तडकणारे आठळीसारखे फळ व त्यात अपुष्क (दलिकाबाहेरील अन्नांश नसलेल्या) बिया असतात. कीटक किंवा पक्षी परागण (पराग नेण्याचे कार्य) घडवून आणतात. यातील कोरोपिटा,लेसिथिस, बर्थोलेशिया, गुस्ताव्हिया व वर उल्लेख केलेल भारतीय प्रजाती प्रमुख आहेत.

लेसिथिस ग्रँडिफ्लोरा व ले. लाँगिसेप्स या जातींचे लाकूड उत्तम असून अनेक प्रकारे उपयुक्त असते; ले. ओलॅरियाचे बोंड (इं.मंकीपॉट) तडकताना, भांड्याची गोलसर झाकणी दूर करावी त्याप्रमाणे आपोआप तडकते; त्यात (भांड्यात) साखर घालून बाहेर ठेवल्यास माकडे त्यात हात घालतात. परंतु त्यातून हात बाहेर काढणे त्यांना कठीण जाते यामुळे माकडे पकडणे सोपे जाते. याच प्रजातीतील काही जातींत (ले. झाबुकाजो) व बर्थोलेशियातील जातींत फळांत तेलकट बिया आढळतात व त्या खाद्य असतात; त्यांना अनुक्रमे सापुकिया नट व ⇨ब्राझील नट म्हणतात. ⇨तोफगोळा वृक्ष भारतात बागेत शोभेकरिता लावलेला आढळतो. याच्या तोफेच्या गोळ्याएवढा मोठ्या फळातील आंबूस मगज निग्रो लोक खातात; त्याचे रुचकर पेय बनवितात व फळाच्या करवंटीची भांडी बनवितात. कॅरिया प्रजातीतील नऊ जाती इंडोमलायात असून त्यांपैकी एक ⇨कुंभालाकूड, औषधे, टॅनीन इत्यादींकरिता फार उपयुक्त आहे व हा वृक्ष भारतात सह्याद्रीवर आढळतो. ⇨बॅरिंग्टोनिया प्रजातीतील इंगळी अथवा हिज्जल आणि ⇨निवर (समुद्रफळ) उपयुक्त वृक्ष आहेत. प्लँकेनियाची एक जाती प्लँ. लिटोरॅलिस अंदमानात आढळते; हा मोठा वृक्ष असून याचे लाकूड अनेक दृष्ट्या उपयुक्त असते; याची कोवळी पाने जावामध्ये भाताबरोबर खातात. याच्या इतर सु. सात जाती ऑस्ट्रेलियात आढळतात. बॅरिंग्टोनिया, कॅरिया व प्लँकोनिया ह्या प्रजातींचा समावेश हल्ली‘बॅरिंग्टोनिएसी’ या स्वतंत्र कुलात करतात. समुद्रफल हे संस्कृत नाव निवर व इंगळी या दोन्हीस वापरल्याचे आढळते.

 

 

संदर्भ : 1. Bor, N. L. Manual of Indian Forest Botany, Cambridge, 1955

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vols.1, 2 and 8, New Delhi, 1948, 1950  and 1969

3.  Rendle, A. B. The Clasiification of Flowerting Plants, Vol. II, Cambridge, 1963

4. Takhtajan, A. Flowering Plants, Origin and Dispersal, Edinburg, 1969.

लेखक  - शं. आ. परांडेकर

स्त्रोत -मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate