অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साल–२

साल

(राळ; हिं. सखुया, कार्श्य; गु. राल; क. कब्बा; सं. अश्वकर्ण, साल, शाल; इं. साल; लॅ.शोरिया रोबस्टा; कुल-डिप्टेरोकार्पेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा मोठा, १८–३० मी. उंच वाढणारा, अर्धवट पानझडी व फार उपयुक्त वृक्ष आहे. तो पंजाब ते आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कोरोमंडल किनारा इ. ठिकाणी आढळतो व अनेक ठिकाणी याचे लहान-मोठे समूह आढळतात [⟶ वनश्री]. व्यापारात हा ‘साल’ नावानेच ओळखला जातो. त्याचा घेर १·८–२·१ मी. असतो. अनुकूल परिसरात तो सु. ४५ मी. उंच वाढतो व त्याचा घेर सु. ३·६ मी. होतो. खोडावरची साल लालसर तपकिरी किंवा करडी आणि गुळगुळीत किंवा भेगाळ असते. त्याचा सोट (फांद्या नसलेला खालचा भाग) सरळ १८–२४ मी. पर्यंत उंच असतो व त्यावरच्या भागात शाखा व पाने यांची गर्दी असते. याची पाने साधी, सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली), एकाआड एक, चिवट, गुळगुळीत, चकचकीत १०–३० × ५–१८ सेंमी. अंडाकृती-आयतासारखी; फुले लहान, नियमित, द्विलिंगी व पिवळट असून ती परिमंजरी [⟶ पुष्पबंध] प्रकारच्या फुलोऱ्यात येतात; संवर्त व पुष्पमुकुट बाहेरून लवदार व पाकळ्या (प्रदले) आतून नारिंगी; केसरदले १५ ते अनेक; ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके असतात [⟶ फूल]. फळे शुष्क, लंबगोल, एकबीजी, लालसर ते फिकट पिवळसर हिरवी; १०–१५ मिमी. लांब व १० मिमी. व्यासाची असून प्रत्येकावर तीन किंवा अधिक पंख आणि प्रत्येक पंख (संदलाच्या रूपांतराने बनलेला) ५–७ सेंमी. लांब असतो. बीज अंडाकृती व त्यात दोन विषम आकाराच्या दलिका असतात; पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨डिप्टेरोकार्पेसी (शाल) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. भारत, श्रीलंका व म्यानमार येथे शोरिया प्रजातीतील नऊ जाती आढळतात, त्यांपैकी साल या जातीचे महत्त्व अधिक आहे. शोरियाच्या सु. १८० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त सहा जाती आढळतात, असे काहींचे मत आहे. शो.आसामिका ही आसामातील जातीही उपयुक्त आहे. कारवारच्या जंगलात शो.टालूरा(जलरंदा) ही जाती आढळते; तिच्यापासून रेझीन मिळते. मलायातील शो.हायपोक्रा जातीपासून ‘डामर’ हे ओलिओरेझीन [ राळेसारखा किंवा राळयुक्त विशिष्ट रासायनिक पदार्थ; ⟶ रेझिने] काढतात.

उपयोग सालाचे लाकूड फार कठीण, मजबूत, मध्यम जड, भरड व फार टिकाऊ असून त्याला वाळवीपासून हानी पोहोचत नाही. मध्यकाष्ठ प्रथम फिकट तपकिरी व नंतर गर्द पिंगट होते. रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) प्रथम फिकट, परंतु नंतर काळपट होऊ लागते; मध्यकाष्ठ फार टिकाऊ असते. योग्य खबरदारी घेतल्यास त्याचे खांब २५–४० वर्षे टिकतात. उ. व पू. भारतात व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे लाकूड म्हणून ते प्रसिद्घ आहे; मात्र कापण्यास व रंधण्यास ते अवघड जाते. पूलबांधणी, घरबांधणी, खाणकाम, हत्यारांचे दांडे, नावा, वल्ही, खांब, सजावटी सामान, शेतीची अवजारे, पिपे, जळण इ. विविध प्रकारे ते उपयोगात असते. खोडावरची साल तिच्यातील सु.९०% टॅनिनामुळे कातडी कमविण्यास वापरतात. पानांत सु. २०%, पानांसह डहाळ्यांत २२ % आणि भुशात जवळपास १२% टॅनीन असते. खोडापासून फळ्या, पट्ट्या इत्यादींकरिता तासणी, कापणी इ. होत असताना साल व भुसा भरपूर मिळतो. त्यामुळे पाने, डहाळ्या व भुसा यांचा टॅनिनाकरिता बराच उपयोग होतो. टॅनीनमिश्रित अर्क काढून घेतल्यावर उरलेल्या चोथ्यातून तूलीर (सेल्युलोज) वेगळा करून उरलेला भाग तक्ते करण्यास वापरतात. भुसा मिसळूनही चोथा तक्त्यासाठी वापरतात. पानांत सु. ०·९४% नायट्रोजन व २·७९% राख (खनिजे) असल्याने गुरांना खाद्य (चारा) म्हणून ती उपयोगाची नाहीत.

खोडापासून काढलेले ‘साल-डामर’ नावाचे ओलिओरेझीन बूटाचे पॉलिश, कार्बन कागद, टंकलेखनाच्या फिती, हलके रंगलेप, रोगण, धूप इत्यादींत वापरतात. प्रत्येक वृक्षापासून दरवर्षी साधारणतः ४ ते ५ किग्रॅ. रेझीन मिळते. रसकाष्ठातील गुहारुधांमुळे (वाहक नलिकांत बाहेरून वाढणाऱ्या अनेक कोशिकांमुळे) रेझिनाचा प्रवाह निर्बंधित होतो. तसेच साल-डामरापासून ऊर्ध्वपातनाने ‘चुआ तेल’ (४१–६८%) मिळते; ते सुगंधी द्रव्यात वापरतात तसेच नावा व गलबते यांतील भेगा बुजविण्यास व धूपाकरिता हे तेल वापरतात. ते स्तंभक (आकुंचन करणारे) व निरोधक असल्याने आमांशात देतात; शिवाय धुरी देण्यास वापरतात. मंद पचनक्रिया व परमा यांवर ते देतात. ते वाजीकर (कामवासना वाढविणारे) आहे. ते जड अत्तरात स्थिरत्व आणण्यास घालतात आणि स्वादाकरिता तंबाखूत वापरतात. चर्मरोगांवर व कानदुखीवरच्या औषधांत ते घालतात.

बिया व त्यांचे तेल

रुचीच्या दृष्टीने बिया साधारणच असल्या, तरी विशेषतः अन्नतुटवडा असताना, गरीब लोक त्या भाजून खातात. त्यांची टरफले काढून सु. ५%मक्याबरोबर मिसळून त्या कोंबड्यांच्या खाद्यात समाविष्ट करतात. सुक्या बियांत प्रतिशत प्रमाणात पाणी ५·२३, प्रथिने ६·१३, ईथर अर्क १६·७७, भरड धागा ४·८१, नायट्रोजन विहित अर्क ६३·२५, कॅल्शियम ०·१८, राख ३·७८ व अम्लात न विरघळणारी राख ०·९५ हे घटक असतात. बियांत १९-२०% स्थिर तेल (साल-लोणी) असते. बिनटरफलाच्या बिया पाण्यात उकळल्यास तेल वेगळे होते. थंड हवेत त्यापासून घन स्वरूपात लोणी मिळते. ते हिरवट किंवा नितळ दिसते. दिव्यांकरिता किंवा स्वयंपाकात ते उपयोगात येते; तुपात त्याची भेसळ करतात. इतर काही तेलांबरोबर त्याचा साबणांत वापर करतात, तसेच कोको बटरऐवजी चॉकोलेट बनविण्यातही त्याचा वापर करतात. तेल काढून घेतल्यावर सालाच्या पेंडीचा उपयोग गुरे व कोंबड्या यांच्या खाद्याकरिता करतात; त्यात १०–१२% प्रथिने व सु. ५०% स्टार्च असतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate