অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणसाप : दिवड

पाणसाप : दिवड

पाणसाप : दिवड

भारतात अगदी सर्वत्र आणि सहज दिसणाऱ्या सापांपैकी हा एक साप. गोड्या पाण्यात रहाणारा हा साप नद्या, तलाव आणि मोठ्या पाणथळीच्या जागी दिसतो. पाउस पडायला सुरवात झाली आणि सगळीकडे पाणी भरायला लागले की हे साप आपल्याला सहज दिसतात. २ ते ५ फूट वाढणारा हा साप काळसर, हिरवट, पिवळसर रंगाचा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही नक्षी काहीशी बुद्धीबळाच्या पटासारखी दिसते म्हणूनच याचे इंग्रजी नाव “checkered keelback”. याचे डोळे बटबटीत आणि बुबुळे गोलाकार असतात. डोळ्यामागे एक तिरकी काळी रेघ असते. हा साप दिवसा आणि रात्रीसुद्धा कार्यरत असतो. याच्या खाण्यामधे प्रामुख्याने मासे, बेडूक, पाण्यातले किटक असतात. हा साप लहान असताना माश्यांची पिल्ले किंबा बेडकाची पाण्यातली लहान पिल्ले खाउन वाढतो. याचा स्वभाव प्रचंड तापट असतो आणि तो दंश करण्यात पटाईत आहे. याचा दंशसुद्धा जोरदार आणि वेदनादायक असतो. पण हा साप पुर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याच्या चाव्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. हा साप चिडला की डोके वर काढतो आणि मानेकडचा भाग रूंदावतो. यामुळे पटकन याने फणा काढला की काय असे वाटून हा नाग आहे असा समज होतो. या सापाला हाताळले असताना अतिशय घाण वासाचा स्त्राव तो सोडतो. याच्या बद्दल मात्र बरेच गैरसमज आहेत. हा पाण्याच्या आत चावला तर विष चढत नाही पण जर का हा पाण्याच्या बाहेर येउन चावला तर आपण काही जगू शकत नाही. अर्थात या साऱ्या कल्पना आहेत आणि प्रत्यक्षात हा साप कुठेही चावला तरी दाहक वेदनांच्या पलीकडे त्याचा काहीही त्रास आपल्याला होत नाही. हिवाळ्यात या सापाची मादी अंदाजे ३० ते ९० अंडी घालते. साधारणत: दोन महिन्यांच्या आसपास ती अंड्याच्या बाजूला राहून त्यांचे रक्षण करते.

सापाला नाकपुड्या असल्यामुळे तो सहज श्वसन करू शकतो पण त्याला वास ओळखता येन नाहित. हे गंधज्ञान होण्यासाठी तो आपली जीभ सतत आत बाहेर करत असतो. यासाठी त्याला त्याचे तोंड उघडावे लागत नाही. त्याचा वरचा जबडा आणि खालचा जबडा जिथे मिळतो तिथे एक फट असते त्यातून त्यांची जिभ आत बाहेर होऊ शकते. जेव्हा साप त्याची दूभंगलेली जिभ बाहेर काढतो तेव्हा हवेतील सूक्ष्म कण त्या जिभेवर घेउन जबड्याच्या आत असलेल्या एका खास अवयवापर्य़ंत पोहोचवतो आणि मग त्याला त्या पदार्थाचे ज्ञान होते. सापाची नजर तिक्ष्ण नसाते, त्याला विशिष्ट्य अंतरापर्य़ंत व्यवस्थित दिसते त्यानंतरच्या गोष्टीचे मात्र त्याला ज्ञान होत नाही.

हा साप बऱयाच वेळेला तळ्यात बघितला होता पण याचे छायाचित्रण काही शक्य झाले नव्हते. शहरात जेंव्हा साप पकडले जातात तेंव्हा त्यात नाग, अजगर, घोणस, मण्यार असे मोठे किंवा विषारी साप असले की त्यांचे छायाचित्रण सहसा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र हा साप एवढा सहस दिसणारा आहे की कायमच छायाचित्रणासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. नुकताच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती तेंव्हा जंगलाच्या आत बरेच छायाचित्रण झाले होते पन त्या तिथे MTDC च्या आवाराच्या मागे, मोहर्ली गावामागे मोठा तलाव आहे. मागच्या ऑगस्ट महिन्यात तो तलान पाण्याने काठोकाठ भरला होता आणि त्यात छान गुलाबी कमळाची फुले फुलली होती. आता मे महिन्यात मात्र पाणी अगदी आत खोलवर गेले होते. सगळीकडे चिखल सुकला होता आणि पाण्याची काही मोजकी डबकी उरली होती. या डबक्यांमधे उघड्या चोचीचे करकोचे मोठ्या संख्येने उतरले होते त्यांचे निरिक्षण करयला गेलो असताना एका डबक्याच्या काठाला हा दिवड आम्हाला दिसला.

त्याचे अर्धे शरीर चिखलाच्या आत फटीत होते आणि तोंडाचा काही भागच बाहेर दिसत होता. आमची जाणिव अर्थातच त्याला झाली असावी कारण तो सारखी त्याची दूभंगलेली जिभ आत बाहेर करू लागला. मी आधी त्याच्या गोलाकार बूबूळ असलेल्या बटबटीत डोळ्यांचे छायाचित्रण केले आणि मग त्याच्या दूभंगलेल्या जिभेचे छायाचित्रण करू लागलो. त्याची जिभ सारखी आत बाहेर होत असली तरी ती बरोबर बाहेर मिळणे कठिण होते. एक दोनदा तशी बाहेर आलेली जिभ मला टिपताही आली पण बाजूने छायाचित्र घेतल्यामुळे त्यात एवढी मजा येत नव्हती. आता मी त्याच्या अगदी तोंडासमोर जाउन झोपलो आणि त्याच्या बाहेर येणाऱ्या जिभेची वाट बघू लागलो. दोन तिन वेळा प्रयत्न केल्याबर मात्र मला त्याची अगदी दूभंगलेली जिभ बरोबर टिपता आली.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate