অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य व्हायचेय ?

महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य व्हायचेय ?

राज्यात दि. १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागातून २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता तो उत्स्फुर्त लोकसहभागातून पूर्ण झाला एवढेच नाही तर या एकाच दिवशी राज्यात २ कोटी ८३ लाख झाडं लागली. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये घेण्यात आली. सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील लोकांच्या प्रामाणिक आणि स्वयंस्फुर्त सहभागाने हे यश संपादन करता आले.

जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल यामुळे आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. कधी अचानक गारांचा पाऊस पडत आहे. पर्यावरण समतोल राखण्यात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे लक्षात घेऊन वन विभागाने राज्याचं वनाच्छादन २० टक्क्यांहून वाढवून ३३ टक्के इतके करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार राज्यात लोकसहभाग तसेच विविध शासकीय विभागांच्या सहकार्यातून येत्या ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लावले जाणार आहेत. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढावा, त्याचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे म्हणून वन विभागाने ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. एवढेच नाही तर या हरित सेनेत सहभागी होऊन नोंदणी करण्यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in हे संकेतस्थळही विकसित केले आहे. या संकेतस्थळावर दि. ३१ मार्च २०१७ पर्यंत किमान १ कोटी लोक स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक होतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊनही हरितसेनेचे सदस्य होता येते. वन विभागाच्या या संकेतस्थळावर हरितसेनेचे सदस्य होण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वन विभागाने दि. १८ जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र हरितसेनेचे संकेतस्थळ विकसित केले आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. १८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत या संकेतस्थळाच्या माध्यमातून दुपारी ३ वाजेपर्यंत १ लाख ५६ हजार २६७ सदस्यांनी हरित सेनेसाठी आपले नाव नोंदवले आहे. त्यापैकी १ लाख ४३ हजार ७८७ व्यक्ती-संस्थांना हरित सेनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रधारकांमध्ये वैयक्तिक सदस्यांची संख्या १ लाख ३७ हजार ६३६ इतकी आहे तर संघटनात्मक नोंदणीधारकांची संख्या ६१५१ इतकी आहे. हरित सेनेच्या सदस्यांची जिल्हानिहाय आकडेवारी ही यातून लक्षात येत असून जिल्ह्या-जिल्ह्यात आता कोणता जिल्हा हरित सेनेच्या नोंदणीत प्रथम क्रमांकावर येतो यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. त्यातून एक निकोप स्पर्धा आणि एक सुंदर वातावरणनिर्मितीही होताना दिसत आहे.

हरित सेनेत सहभागी होण्याची संधी राज्यातील प्रत्येक व्यक्तीस, संस्थेस, संघटनेस मिळणार असून ज्यांना वृक्ष लागवड, संरक्षण आणि संवर्धन या कामाबरोबर वन, वन्यजीव, वनीकरण, निसर्ग, पर्यावरण, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या क्षेत्रात विशेष आवड आहे त्यांना वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात आपला सहभाग येथे नोंदवता येईल. यात शासकीय-निमशासकीय विभाग, अधिकारी-कर्मचारी, विविध अशासकीय संस्था, स्वयंसेवी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, खाजगी संस्थांचे कर्मचारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, शालेय - महाविद्यालयीन व विद्यापीठांमधील विद्यार्थी, एन.सी.सी/ एन.एस.एस/स्काऊट गाईड अशा सर्व गटांचा आणि व्यक्तींचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.

कसं होणार हरित सेनेचे सदस्य?

अशा प्रकारे काम करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्ती आणि समाजघटकांनी, संस्थांनी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी नमुन्यात आपली माहिती भरताना सोबतच्या शपथपत्रासही स्वीकृती द्यायची आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याना ईमेलने एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हरित सेनेचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेने आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, शालेय-महाविद्यालयीन ओळखपत्र, पारपत्र, शासकीय/निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र यापैकी एक दस्तऐवज ओळखपत्र म्हणून जमा करावयाचा आहे. हे ओळखपत्र पाठवल्यानंतर इच्छुक व्यक्तीचे हरित सेनेचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र तयार होऊन त्यांना ते ईमेलद्वारे पाठविले जाईल अशी व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.

सदस्य तर झालो पुढे काय?


हरित सेनेचे सदस्य तर झालो, पुढे काय? हा सर्वांना पडणारा प्रश्नही वन विभागाने सोडवला आहे. यात विभागाने हरित सेनेच्या स्वंयसेवकांची भूमिका स्पष्ट करताना त्यांचा सहभाग अपेक्षित असलेली क्षेत्रं निश्चित करून दिली आहेत. जसे वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरिता सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात वन वणवा विझवण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग, वन्य प्राण्यांच्या गणनेत सहभाग, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासारख्या दिन विशेषांच्या कार्यक्रमात, वनमहोत्सव, वन्यजीव सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात हरित सेनेच्या सदस्याना सहभागी होता येणार आहे. हरित सेनेच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर या सर्व विषयांची सविस्तर माहिती मिळते. शिवाय याठिकाणी वन विभागाची दिनदर्शिकाही देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेप्रमाणेही हरित सेनेचे सदस्य कार्यक्रम घेऊन पर्यावरण-वन रक्षणात आणि संवर्धनात आपले योगदान देऊ शकतात. गरज आहे सर्वांनी पुढं येऊन या वसुंधरेला अजून सुंदर करण्याची, स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण राखण्याची. चला तर मग मी हरित सेनेचे सदस्य होण्यासाठी नोंदणी केलीय, तुम्हीही करणार ना ?

लेखक - डॉ. सुरेखा मधुकर मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate