অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्ष्यांचे नंदनवन

पक्ष्यांचे नंदनवन

इच्छाशक्ती असेल तर आपल्या घरासोबतच कार्यालय परिसरात नंदनवन कसे फुलू शकते हे औरंगाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील कर्मचारी रमेश राऊत यांनी दाखवून दिले आहे. स्वत:च्या जबाबदाऱ्या पार पाडत कार्यालयीन वेळेआधी सकाळी 6 ते 8 व सुट्टीचा पूर्ण दिवस पक्षी अन्नछत्रासाठी देऊन, त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पक्षिविहार साकारले आहे. शहरात चुकूनही न दिसणाऱ्या पक्षांची येथे मांदियाळी असते.

दुष्काळ आणि उन्हाच्या काहिलीत सर्वात जास्त आबाळ होते ती पक्षी आणि जनावरे यांची. ग्रामीण भागासोबतच शहरातही ही स्थिती काहीशी वेगळी नसते. त्यामुळे पक्ष्यांसाठी भांड्यात पाणी ठेवण्याचे आवाहन विविध संस्था व पक्षिमित्रांकडून केले जाते. औरंगाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मात्र केवळ पाण्याची भांडी ठेवली गेली नाहीत तर त्यांच्यासाठी नंदनवन तयार केले गेले.

पक्ष्यांसाठी पाणपोई

औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतनचा परिसर खूप मोठा आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा वावर बऱ्यापैकी असतो. 2010 मध्ये उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे पक्षी झाडाखाली बेशुद्धावस्थेत पडलेले आढळल्यानंतर कर्मचारी रमेश राऊत यांनी त्यांना कर्मशाळेत नेऊन पाणी पाजले. दोन तासांनी त्या पक्ष्यांनी उडाण भरली. पाण्याच्या अभावामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू ओढवत असल्याने अस्वस्थ झालेल्या श्री.राऊत यांनी त्यावर काहीतरी उपाय काढण्यासाठी पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली. संस्थेत रिकाम्या पडलेल्या छोट्या प्लास्टिकच्या कॅन गोळा केल्या. त्यास मधोमध कापून पाणी भरले व दोरीने झाडाला लटकवले. काही झाडांना मातीचे छोटे चाळीस माठ बांधले. यामुळे परिसरातील पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले.

पक्ष्यांचा चिवचिवाट

परिसरात पक्ष्यांचा वावर वाढला. त्यांच्या विष्टेतून पडणाऱ्या बियांचे बीजारोपण होऊन वृक्षवल्ली फुलण्यास मदत झाली. संस्थेकडून काही औषधी गुण असलेली झाडे लावली गेली. ज्यामुळे मुलांना वेगवेगळ्या झाडांची ओळख होऊ लागली. पक्ष्यांच्या चिवचिवाटामुळे अभ्यासाचा ताण कमी झाल्यासारखा वाटत असल्याचे येथील विद्यार्थी सांगतात.

पक्षी अन्नछत्रांची मालिका

संस्थेच्या परिसरात जागोजागी प्रत्येक झाडावर पक्ष्यांसाठी केलेल्या पाण्याच्या व्यवस्थेमुळे पक्ष्यांची संख्या वाढली. विद्यार्थी रिकाम्या वेळेत किंवा घरी जाताना माठात पाणी टाकून काळजी घेऊ लागले. लहान पिलाना व वृद्ध पक्ष्यांना खाद्यासाठी दूरवर उडून जाता येत नाही. त्यामुळे पक्ष्यांसाठी खानावळ उघडण्याची कल्पना श्री.राऊत यांच्या डोक्यात आली. त्यासाठी कर्मशाळेतील सहकारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

संस्थेतील टाकाऊ वस्तूंपासून सुंदर पक्षी अन्नस्टॅण्ड बनवले गेले व त्यावर धान्य टाकण्यात आले. पक्ष्यांचा वावर वाढू लागला. प्राचार्यांना हा उपक्रम खूप आवडला. सहकारी व संस्था आपल्या पाठीशी असल्याने श्री.राऊत यांनी मग मागे फिरून पाहिलेच नाही. पक्ष्यांसाठी जे काही शक्य होईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या पक्षी अन्नछत्रावर पक्षांची गर्दी वाढायला लागली. दाण्यांसाठी पक्षी एकमेकांना मारू लागले. त्यामुळे या परिसरात दुसरे पक्षी अन्नछत्र उभे केले गेले. दरम्यान श्री.राऊत यांची शासकीय तंत्रनिकेतन येथून मे 2016 रोजी, शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर येथे बदली झाली. वडलांची प्रकृती ठीक नसल्याने विनंतीवरून तीन महिन्यांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे प्रतिनियुक्ती मिळाली. याच काळात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या सहकार्याने दिवाळीत निराधारांना फराळ व ब्लँकेट वाटण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमातील उरलेल्या पैशांतून त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसरा पक्षीविहार तयार केला.

शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथून जिंतूर येथे बदली झाल्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेला संस्थेच्या परिसरातही प्राचार्य डॉ.हेमंत तासकर व कर्मशाळा सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षी अन्नछत्र तयार केले. त्यानंतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी आणखी सात अन्नछत्रे बनवून पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय केली.

दिनक्रम

कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त सकाळी या अन्नछत्रावर पक्ष्यांसाठी धान्य टाकणे, माठात पाणी ठेवणे. परिसरात एखादा इजा झालेला पक्षी दिसल्यास त्याच्यावर औषधोपचार व देखभाल करण्याचे काम श्री.राऊत करतात. सकाळी 6 ते 7.30, सायंकाळी 6 ते 7 व सुटीचा पूर्ण दिवस खंड न पडू देता पक्षी अन्नछत्रासाठी मेहनत घेतात. सहकारी सुभाष काकडेही त्यांच्या सोबतीला असतात. परिसरात टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी जाळीचे कुंपण केले, पाण्यासाठी हौद केला, हौदातील पाण्यावर मोटारीच्या साह्याने धबधबा तयार केला. तेच पाणी रिसायकल केले. पक्ष्यांना येथे डुबकी मारण्याची सोय उपलब्ध झाली. परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले. या कामी पत्नी संगीता, मुलगा व मुलीनेही त्यांना सुटीत खूप मदत केली. पक्षी अन्नछत्रासाठी श्री.राऊत वेळोवेळी आपल्या मानधनातून पदरमोड करतात.

पक्षिसंवर्धनाचे काम करताना जगात कुठेही विकत न मिळणारा आनंद मिळतो. आपण पुढाकार घेतला तर एकमेकांबद्दल विश्वासाचे वातावरण तयार होते. परिसर फुलून दिसतो. आपणही समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवली तर आपोआप आपल्या हातून विधायक कार्ये घडतात.

- रमेश राऊत

सहकार्याची वेल

श्री.राऊत यांच्या या स्तुत्य उपक्रमाला कार्यालयातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वांचीच साथ मिळाली आहे. शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व सहकार्यांच्या सहकार्यामुळेच येथे नंदनवन फुलवता आल्याचे श्री. राऊत आवर्जून सांगतात.

- संतोष देशमुख, (लोकराज्य)

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate