অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनौषधी पिंपळीच्या उत्पादनातून एकरी सहा लाखाचे उत्पन्न

वनौषधी पिंपळीच्या उत्पादनातून एकरी सहा लाखाचे उत्पन्न

आयुर्वेदात निरामय आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले गेलेल्या वनौषधी पिंपळीचे उत्पादन घेऊन अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी एकरी सहा लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.

पिंपळीला काही ठिकाणी पान पिंपळी नावानेही ओळखले जाते. इंडियन लॉन पेपर अशीही संज्ञा आहे. पान पिंपळी या वनौषधीत प्रामुख्याने पिपेरियन व पिल्पर्टिन अल्कलॉइन मोठ्या प्रमाणात आढळते. या औषधी गुणधर्मामुळे अनेक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. सर्दी, खोकला, सांधेदुखी व कफ नाशक म्हणून युनानी व आयुर्वेदात हे औषध महत्वपूर्ण मानले जाते. रातांधळेपणा व विषावरील उतारा म्हणूनही उपयोग करण्यात येतो. दिल्ली, कोलकाता, सुरत येथील बाजारपेठांत या उत्पादनाला मागणी आहे.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यातील गणेश हेंड व महेश सुरंजे या दोन शेतकरी मित्रांनी भागीदारीने श्री. सुरंजे यांच्या शेतामध्ये पिंपळी उत्पादनाचा निर्णय घेतला. पारंपरिक पिकांकडून अधिक फायदेशीर ठरणाऱ्या औषधी पिकाची लागवड करण्याचा हा निर्णय त्यांच्यासाठी योग्यच ठरला. परस्परसहकार्य, चर्चा व एकत्रित मेहनत यामुळे एकरी सहा लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळाले.

पिकाविषयी बोलताना महेश सुरंजे म्हणाले की, पिंपळी या वनौषधीची लागवड मुख्यत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येते. त्यासाठी जमीन 2-3 वेळा नांगरुन त्यानंतर सपाट करणे आवश्यक आहे. 60 बाय 60 सेंमी अंतरावर खड्डे करुन कुजलेल्या शेणखताच्या साहाय्याने ऊस लागवडीच्या धर्तीवर पान पिंपरीच्या कंदांची लागवड केली जाते. या पिकाला आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे लागते. हे पीक साधारण 11 महिन्यांचे आहे. पिकाला उष्ण दमट, हवामान उपयुक्त ठरते. नैसर्गिकरीत्या ही वनस्पती म्हणजे खुरटे झुडूप आहे.

पिकाचा पहिला बहर लावणीनंतर सहा महिन्यांनी मिळतो, असे गणेश हेंड यांनी सांगितले. ते म्हणाले की, पिकाची वाढ झाल्यावर साधारणत: दोन महिन्यात शेंगेसारखे दिसणारे अर्ध्या इंचाचे फळ तयार होते. या फळाने काळपट हिरवा रंग धारण केल्यावर काढणी करण्यात येते. फळतोडणीच्या मजुरीवर साधारणत: 10 रुपये प्रतिकिलो इतका खर्च येतो. पिंपळीला साधारणत: 600 ते 850 रुपये प्रति किलो भाव मिळतो. एकरी 95 हजार ते सव्वा लाखापर्यत खर्च येतो. आम्हाला 6 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे, असे हेंड म्हणाले.

पिंपळीच्या पेरणीसह आंतरपीक म्हणून पपई, हेट्यांची फुले, मिरची यांचेही उत्पादन घेतले. या पिकाची खोडवा पीक पद्धतीने लागवड केल्यास दुसऱ्या वर्षी उत्पन्न अधिक वाढते असा अनुभव श्री. सुरंजे सांगतात. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून नव्या पिकांकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा इतरांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.

-जयंत सोनोने

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate