অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टसर सिल्कच्या करवतकाठी साडीला मिळाली आंतरराष्ट्रीय जीआय टॅगिंग नामांकनाची मोहर

टसर सिल्कच्या करवतकाठी साडीला मिळाली आंतरराष्ट्रीय जीआय टॅगिंग नामांकनाची मोहर

विदर्भातील टसर सिल्क पासून तयार करण्यात येत असलेल्या टसर करवतकाठी साडीला भौगोलिक उपदर्शक (जिओग्राफिकल इंडिकेशन) ची मोहर मिळाल्यामुळे ही साडी आता जागतिक बाजारेपठेतून पारंपरिक दर्जेदार उत्पादन म्हणून ओळखली जाणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पैठणी, तसेच कांजीवरम साड्याप्रमाणेच विक्रीसाठी या नामाकंनामुळे सहज व सुलभपणे उपलब्ध होणार आहे.

भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात आजन झाडाची शेती करुन त्यावर टसर सिल्क तयार करणाऱ्या अळीचे पालन करण्यात येते व त्यापासून टसर कोष तयार करुन टसर धागा रिलिंग करण्याची फार जुनी परंपरा आहे. टसर धाग्यापासून टसर कापड व साड्यांचे विणकाम या भागातून विणकर फार पूर्वीपासून करतात. परंतु त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ तसेच भौगोलिक ओळखीसंदर्भातील मोहर नसल्यामुळे विक्रीवर अनेक अडचणी निर्माण होत होत्या.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या पुढाकाराने टसर सिल्कपासून तयार झालेल्या साड्यांना केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाने सिल्कसाठी असलेले आंतरराष्ट्रीय मानक उपलब्ध करुन दिल्यामुळे भंडाऱ्याचा कोसा आता राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यास मदत झाली आहे. करवतकाठी साडी व कापड तयार करण्याची कला याची जोपासना व्हावी तसेच विणकरांच्या या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महामंडळातर्फे सातत्याने प्रयत्न सुरु होते. भौगोलिक उपदर्शक रजिस्ट्री मिळाल्यामुळे विदर्भातील ही पारंपरिक कला आता नव्या स्वरुपात बाजारपेठेत पदार्पण करणार आहे. या कलेचे संवर्धन होईल आणि सोबतच या साडीला मागणीही वाढेल.

भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विणकर पिढीदार करवतकाठी साडीचे, करवती उपरण, करवती धोती या वाणाचे विणकाम करतात. या साडीचे विणकाम करतेवेळी तीनधोठे (शटल) याचा उपयोग प्रत्येक आडवणाच्या धागा टाकून विणकाम करण्यात येते. त्यामुळेच या साडीच्या विणकामासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील सुमारे दोनशे कारागीर ही कला जोपासत असून आठवड्यातून सरासरी दोन ते तीन साड्या तयार करतात. पूर्वी कोषापासून नैसर्गिक कापड तयार करण्यात येत होते पण ग्राहकांची तसेच बाजारपेठेची रंगसंगतीची मागणी वाढत असल्यामुळे या साडीमध्ये परिवर्तन करण्यात येत आहे. कलकत्ता, दिल्ली, तसेच भारताच्या विविध भागात या हातमागावरील साडीला भरपूर मागणी आहे. मुळ साडी आठ हजार रुपयापर्यंत असली तरी यावर आकर्षक कलाकृती व रंगसंगती केल्यानंतर ती चौदा हजार रुपयापर्यंत उपलब्ध होत आहे.

करवतकाठी साडीला जीआय टॅगींग मिळाल्यामुळे या साडीची आता नकल करणे अथवा डुप्लीकेट तयार करणे शक्य होणार नाही. या साडीसाठी लागणारा धागा (यार्न) आता कोणीही तयार करणार नाही. कारण भंडारा या भौगोलिक वातावरणातील होणारे उत्पादन हे एकमेव ठरणार आहे. या साडीला केंद्र शासनाने विविध चार मानांकने दिली असून इंडिया हॅण्डलूम ब्रँड म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यासोबतच पिवर सिल्क असल्याचे मानाकंन, शुध्दतेबद्दल हॅण्डलूम मार्क, टसर सिल्कच्या करवतकाठी साडीला मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, तसेच नागपूर व उमरेड या तालुक्यातील १५ ते २० गावातच हे उत्पादन होत आहे.

पैठणी साडीप्रमाणे करवतकाठी साडीची जोपासना व्हावी यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग विभाग तसेच राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागातर्फे सातत्याने प्रयत्न होत आहेत. नवी दिल्ली येथील जीआय टॅगिंग प्रमाणपत्र मिळाल्याने भंडाऱ्याची पारंपरिक कला आता राष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. या कलेची जोपासना व्हावी यासाठी वस्त्रोद्योग विभागासह हातमाग महामंडळाचे विशेष प्रयत्न असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक विजय लिमजे यांनी दिली.

लेखक: अनिल गडेकर

मो.9890157788

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate